"एकनाथ पांडुरंग रेंदाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ए.पां. रेंदाळकर, पूर्ण नाव - एकनाथ पांडुरंग रॆंदाळकर, टोपणनाव -मंदा...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

११:२८, ३० एप्रिल २०१५ ची आवृत्ती

ए.पां. रेंदाळकर, पूर्ण नाव - एकनाथ पांडुरंग रॆंदाळकर, टोपणनाव -मंदार (जन्म : रेंदाळे, १ जुलै, १८८७, मृत्यू : २२ नोव्हेंबर १९२०) हे एक मराठी कवी होते. कोल्हापूरजवळच्या रेंदाळे या अतिशय छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. या अशा गावाचे 'कुलकर्णी'पण रेंदाळकरांच्या वाडवडिलांकडे होते. सुरुवातीच्या काळातील रेंदाळकरांच्या कवितांवर 'रेंदाळकर' या आडनावाऐवजी 'कुलकर्णी' असे आडनाव आढळते, त्याचे कारण हेच होय.

बालपण

रेंदाळकरांचे बालपण रेंदाळ आणि कुरुंदवाड येथे गेले. रेंदाळ येथे केवळ प्राथमिक शिक्षणापर्यंतचीच सोय त्या काळी असल्याने चौथीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी रेंदाळकर कागलला गेले. कागल येथे रेंदाळकरांचे वास्तव्य असतानाच्याच काळात त्यांचे वडील वारले. पंधराव्या-सोळाव्या वर्षी झालेला हा आघात रेंदाळकरांना सोसणे फार जड गेले.

नोकरी

१९०५ मध्ये रेंदाळकरांनी बेळगाव जिल्ह्यातील कुन्नूर (तालुका चिकोडी) या गावी शिक्षकाची नोकरी केली. रेंदाळकरांना वाचनाचा दांडगा छंद होता. कुन्नूरसारख्या खेड्यात तो भागेना व एकंदरीतच तेथील नीरस जीवनालाही ते कंटाळून गेले व त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

संस्कृतचा अभ्यास

रेंदाळकरांना उत्तम कविता करायची फार इच्छा होती, परंतु अक्षरगण वृत्तांत कविता लिहायची तर संस्कृत भाषेत प्रावीण्य हवे, असे त्यांच्या मनाने घेतले व संस्कृत शिकण्याचा निश्चय करून ते सांगलीत आले. तेथे ते संस्कृत पाठशाळेत जाऊ लागले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातील विख्यात संस्कृतज्ञ बाळशास्त्री हुपरीकर हे त्यांचे आप्त होते. 'सिद्धान्त कौमुदी'चे अध्ययन करण्याचीही रेंदाळकरांची इच्छा होती. ती त्यानी हुपरीकरांना कळविली व होकार येताच, १९०९ च्या सुमारास सांगलीतील मुक्काम हलवून रेंदाळकर कोल्हापूरला आले. तेथे त्यांनी दोन वर्षे सिद्धान्त कौमुदीचे अध्ययन केले.

कवितालेखन

कोल्हापूरच्या मुक्कामात रेंदाळकरांमधील कवित्व बाळशास्त्री हुपरीकरांच्या ध्यानी आले. त्यांनी रेंदाळकरांना प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात त्या काळी 'विजयी मराठा' हे साप्ताहिक निघत असे. याच साप्ताहिकात रेंदाळकरांच्या सुरवातीच्या काळातील कविता प्रसिद्ध झाल्या. मात्र, 'मंदार' या टोपणनावाने त्या प्रसिद्ध होत असत.

पहिली कविता

इ.स. १९०८ साली 'वरिवरी जळे बाळे! डोळे अहा भरले किती!' ही रेंदाळकरांची अगदी पहिली कविता 'केरळ कोकिळा'मध्य़े प्रसिद्ध झाली. या मासिकाचे विख्यात संपादक कृष्णाजी नारायण आठवले हे चोखंदळ व चिकित्सक म्हणूनच प्रसिद्ध होते. रेंदाळकरांच्या काव्यगुणांची आठवले यांनी त्यांच्या कवितेखालीच मनमोकळी स्तुती केली होती.

कवितासंग्रह

पुढे कोल्हापुरातील जगद्गुरू मठातर्फे 'धर्मविचार' हे मासिक सुरू झाले. रेंदाळकर त्याचे सहसंपादक झाले. हे काम एकीकडे सुरू असताना रेंदाळकरांचे कवितालेखनही जोमात होते. याच काळात 'मंदारमजरी' या शीर्षकाने १९१० रोजी रेंदाळकरांनी निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. 'सुधारक', 'विविधज्ञानविस्तार', 'मनोरंजन', 'प्रगती' इत्यादी त्या वेळच्या नियतकालिकांत या पुस्तकाची प्रशंसापर परीक्षणे प्रसिद्ध झाली. 'मंदारमंजरी'मुळे महाराष्ट्रातील मान्यवर कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली.