विवेकबुद्धी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिन्सेंट व्हॅन गॉग, 1890. क्रोलर-म्युलर संग्रहालय . द गुड समारिटन (डेलाक्रोक्स नंतर).

विवेकबुद्धी किंवा सदसद्विवेकबुद्धी ही एक संज्ञानात्मक प्रक्रिया असते जी एखाद्या व्यक्तीच्या नैतिक तत्त्वज्ञान किंवा मूल्य प्रणालीवर आधारित भावना आणि तर्कसंगत विचार निर्माण करते. ‘सत्’ म्हणजे चांगले आणि ‘असत्’ म्हणजे वाईट, यांत विवेक करणारी बुद्धी'. सामान्यतः व्यक्ती सामाजिक-राजकीय नियम, रूढी व रीतिरिवाज, नीतितत्त्वे, धार्मिक विधि-निषेध यांच्यानुसार वर्तन करते. परंतु जेव्हा उपलब्ध पर्यायांपैकी कोणता निवडावा असा संभ्रम पडतो, तेव्हा शास्त्र व उपदेशक यांचा कितीही सल्ला घेतला, तरी शेवटी व्यक्तीला स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यावा लागतो. असा निर्णय घेताना प्रिय, उपयुक्त व लाभदायक यांचा विचार नैतिकतेच्या विचारावर मात करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी नैतिकेतर बाबींची दखल घेणारी पण त्यांच्या आहारी न जाता अचूक नैतिक निवाडा करणारी बुद्धी म्हणजे सदसद्विवेकबुद्धी. “सतां ही संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्त-करणप्रवृत्तयः!” ही कालिदासाची उक्ती प्रसिद्धच आहे. दोन नैतिक तत्त्वे किंवा श्रेयस् आणि प्रेयस्, कर्तव्य आणि उपयुक्त यांतील काय निवडावे असा संदेह पडतो, तेव्हा सज्जन व सत्प्रवृत्त व्यक्ती आपली अंतःकरणप्रवृत्ती म्हणजेच सदसद्विवेकबुद्धी प्रमाण मानते.

सहानुभूतीशील मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या प्रतिसादांप्रमाणे, तत्काळ संवेदनात्मक धारणा तसेच प्रतिक्षेपी प्रतिसादांवर आधारित सहवासामुळे विवेकबुद्धी उत्तेजित भावना व विचारांच्या विरुद्ध असते. सामान्य शब्दात, विवेकाचे वर्णन अनेकदा केले जाते, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या नैतिक मूल्यांशी विरोध करणारे कृत्य करते तेव्हा पश्चातापाची भावना निर्माण होते. एखाद्या कृतीपूर्वी नैतिक निर्णयाची विवेकबुद्धी कितपत माहिती देते आणि असे नैतिक निर्णय कारणावर आधारित असावेत किंवा नसावेत यावरून आधुनिक इतिहासाच्या बहुतेक भागांतून मानवी जीवनाच्या नैतिकतेच्या मूलभूत सिद्धांतांमधील रोमँटिसिझम आणि इतर प्रतिगामी सिद्धांत यांच्यात वाद झाला आहे.

सद्सद्विवेकबुद्धीची धार्मिक दृश्ये सामान्यतः सर्व मानवांमध्ये अंतर्भूत असलेल्या नैतिकतेशी, हितकारक विश्वाशी आणि/किंवा देवत्वाशी जोडलेली दिसतात. धर्माची वैविध्यपूर्ण, पौराणिक, सैद्धांतिक, कायदेशीर, संस्थात्मक आणि भौतिक वैशिष्ट्ये विवेकाच्या उत्पत्ती आणि कार्याविषयी अनुभवात्मक, भावनिक, आध्यात्मिक किंवा चिंतनशील विचारांशी सुसंगत असू शकत नाहीत. [१] सामान्य धर्मनिरपेक्ष किंवा वैज्ञानिक दृश्ये विवेकाची क्षमता कदाचित अनुवांशिकरित्या निर्धारित मानतात, त्याचा विषय कदाचित संस्कृतीचा भाग म्हणून शिकलेला किंवा अंकित केलेला आहे. [२]

विवेकासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या रुपकांमध्ये "आतला आवाज", "आतला प्रकाश", [३] किंवा सॉक्रेटिसचे ग्रीक लोक ज्याला त्याचे " डेमोनिक चिन्ह" म्हणत त्यावर अवलंबून राहणे, एक टाळणारा आतला आवाज तेव्हाच ऐकला जातो. चूक करणार आहे. विवेक, खालील विभागांमध्ये तपशीलवार सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यातील एक संकल्पना आहे, [४] संपूर्ण जगाला लागू होईल अशी संकल्पना वाढत्या प्रमाणात केली जात आहे, [५] सार्वजनिक भल्यासाठी असंख्य उल्लेखनीय कृतींना प्रेरित केले आहे [६] आणि साहित्य, संगीत आणि चित्रपटाच्या अनेक प्रमुख कलाकृतींचा विषय आहे. [७]

चार प्रमुख अंगे[संपादन]

(१) कृतीच्या किंवा हेतूच्या नैतिक गुणात्मकतेच्या संदर्भात सर्व बाबींचा साधकबाधक विचार करून योग्यायोग्यतेबाबत निवाडा करणारे विमर्शात्मक किंवा वैचारिक अंग. ही न्यायाधीशाची भूमिका आहे.

(२) अशा निवाड्यानंतरही तसे वागण्यास प्रवृत्त न होता उलट नीतीने वागण्याचा फायदा काय? असे विचारून नैतिक निवाडा धुडकावून लावणाऱ्या व्यक्तीस सदसद्विवेकबुद्धी नाही, असेच म्हणावे लागते. म्हणून नैतिक निवाड्यानुसार जे सत् हितकर, योग्य आहे, ते करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करणारे प्रेरक अंग. ‘जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः!’ हे वचन ह्या प्रेरक अंगाचा अभाव दाखविते.

(३) व्यक्ती नैतिक आचरण करण्यास प्रवृत्त झाली, तरी कित्येकदा कामक्रोधलोभमोहादी विकार प्रबल शत्रू ठरतात. म्हणून विकारांवर ताबा मिळवून निर्णय कार्यान्वित करण्याची प्रबल शक्ती हे तिसरे नियमनात्मक किंवा शासनात्मक अंग आणि

(४) निर्णय कार्यान्वित करण्यात अपयश आल्यास सत्प्रवृत्त व्यक्तीला वाटणारी खंत, टोचणी किंवा पश्चात्ताप हे भावनात्मक चौथे अंग. अशी वैचारिक किंवा विमर्शात्मक, प्रेरक किंवा प्रवृत्त्यात्मक, शासनात्मक किंवा नियमनात्मक आणि भावनात्मक, ही चार अंगे आहेत.

या चार अंगांतील कोणतेही एक अंग सर्वांत महत्त्वाचे मानणे गैर होईल. परंतु कृतीच्या नैतिक समर्थनाच्या दृष्टीने वैचारिक अंग महत्त्वाचे; नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने व्यक्तीचे निर्णयस्वातंत्र्य महत्त्वाचे; सद्गुण किंवा चारित्र्याच्या दृष्टीने शासनात्मक अंग महत्त्वाचे आणि पतन झाल्यास चारित्र्य सुधारण्याच्या दृष्टीने टोचणी लावणारे भावनात्मक अंग महत्त्वाचे असे ढोबळपणे म्हणता येईल.

तीन दृष्टिकोन[संपादन]

विविध क्षेत्रांतील ज्ञानाचे प्रामाण्य ठरविण्यासाठी प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इ. प्रमाणे स्वीकारली जातात. त्याप्रमाणे नैतिक दृष्ट्या चांगले-वाईट ठरविण्याचे सदसद्विवेकबुद्धी हे स्वतंत्र व स्वायत्त प्रमाण आहे का? व ते कितपत विश्वसनीय आहे? या प्रश्नाचे उत्तर सदसद्विवेकबुद्धीकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. अशा दृष्टिकोनांपैकी धार्मिक दृष्टिकोन असा : प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ईश्वरी तत्त्व किंवा अंश असतो, असे मानणारे ईश्वरवादी धर्म सदसद्विवेकबुद्धीला दिव्य ईश्वरी आवाज मानतात. त्यामुळे ती स्वतः प्रमाण ठरते. मानसशास्त्र, समाजशास्त्र अशा शास्त्रांच्या दृष्टिकोनांतून सदसद्विवेकबुद्धी व्यक्तीच्या जन्मापासून तिच्यावर होणाऱ्या धार्मिक, नैतिक, सांस्कृतिक संस्कार, राजकीय-सामाजिक कायदे, रूढी व रीतिरिवाज यांचा सामूहिक परिपाक आहे. वडिलांच्या आज्ञेची जरब व आज्ञा मोडल्यास मिळणाऱ्या कडक शिक्षेची भीती याचेच हे मानसिक भूत असल्याचे फ्रॉइड मानतो. बाह्य नियमपालनाचे आंतरिकरण (Internlization) म्हणजेच ‘आतला आवाज’ (Inner Voice) म्हणून सदसद्विवेकबुद्धी ही समाजसापेक्ष, संस्कृतिसापेक्ष असते. नरमांसभक्षक जमात माणसाचे मांस खाणे घृणास्पद मानीत नाही; परंतु अन्य मांसाहारी समाज ते घृणास्पद मानतो आणि शुद्ध शाकाहारी समाज तर सर्व मांसाशन निषिद्ध मानतो. यांतील कोणाची सदसद्विवेकबुद्धी प्रमाण मानायची हे ठरविण्याला निकष नाही. म्हणून सदसद्विवेकबुद्धी व्यक्ती-समाज-संस्कृती सापेक्ष आहे. नैतिक दृष्टिकोनानुसार सदसद्विवेकबुद्धी ही व्यक्तीच्या चारित्र्याची, विशिष्ट आदर्श व तत्त्वे यांना तिच्या असलेल्या बांधिलकीची अभिव्यक्ती असते. व्यक्तीचे निर्णयस्वातंत्र्य, परिपक्वता, चारित्र्य आणि एकूण नैतिक सचोटी यांची सदसद्विवेकबुद्धी कसोटी असते.

जोसेफ बटलर (१६९२−१७५२) यांनी आपल्या नीतिशास्त्रीय उपपत्तीत सदसद्विवेकबुद्धीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले. व्यक्ती नैसर्गिक प्रेरणांमुळे विशिष्ट गोष्टी साध्य करण्यासाठी कृती करते. या सर्व कृती आत्मप्रेम आणि परहित या दोन तत्त्वांखाली मोडतात. परंतु या दोन तत्त्वांपेक्षा श्रेष्ठ असे योग्यायोग्याचा निर्णय घेणारे तत्त्व म्हणजे सदसद्विवेकबुद्धी असे बटलर मानतात. निर्णय, प्रेरकत्व आणि नियमन (Judgement, Direction आणि Superintendency) ही तीन तिची घटकतत्त्वे असल्यामुळे ती सर्वश्रेष्ठ आहे. मानवी प्रकृतीचे नियमन करणे आणि सत्ता चालविणे, हा तिचा अधिकार आहे. जर तिच्यात अधिकारानुरूप सामर्थ्य आणि सत्तेनुरूप शक्ती असती, तर तिने विश्वावर निरंकुश सत्ता चालविली असती, असे बटलर यांना वाटते.

सदसद्विवेकबुद्धी ही गूढ आंतरिक शक्ती आहे की, जिच्या निर्णयांचे व आदेशांचे विचारविमर्शाद्वारा आकलन व समर्थन करता येते अशी बौद्धिक शक्ती आहे, याविषयी दुमत आहे. परंतु नैतिक जीवनात तिचे अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते.

पी. एच. नोअल-स्मिथच्या मते सदसद्विवेकबुद्धी अनेक पर्यायांपैकी एका पर्यायाचे समर्थन करणारी फक्त वकील आहे. तिला ‘आंतरिक न्यायाधीश’ मानल्यामुळे तिचा निर्णय अंतिम मानण्याचा दोष घडतो आणि व्यक्ती तिचा गुलाम होण्याचा धोका संभवतो. यामुळे कर्तव्यपालनाला ऐकान्तिक महत्त्व प्राप्त होते. कर्तव्यपालनाचा हेतू हा एकमेव सद्हेतू नाही, तसेच केवळ कर्तव्यपालनाला नेहमीच नैतिकता असते असे नाही. कारण त्याग, परोपकार इ. कित्येक उदात्त कृती कर्तव्यपालनाहून श्रेष्ठ असतात आणि कर्तव्यपालनाचा हेतू कित्येकदा व्यक्तीला क्रूरकर्माही बनवतो. अशा तृहेने नोअल-स्मिथ सदसद्विवेकबुद्धीच्या मर्यादा दाखवतो.

  1. ^ Ninian Smart. The World's Religions: Old Traditions and Modern Transformations. Cambridge University Press. 1989. pp. 10–21.
  2. ^ Peter Winch. Moral Integrity. Basil Blackwell. Oxford. 1968
  3. ^ Rosemary Moore. The Light in Their Consciences: The Early Quakers in Britain 1646–1666. Pennsylvania State University Press, University Park, PA. 2000. आयएसबीएन 978-0-271-01988-8,
  4. ^ United Nations. Universal Declaration of Human Rights, G.A. res. 217A (III), U.N. Doc A/810 at 71 (1948). http://www.un.org/en/documents/udhr/ accessed 22 October 2009.
  5. ^ Booth K, Dunne T and Cox M (eds). How Might We Live? Global Ethics in the New Century. Cambridge University Press. Cambridge 2001 p. 1.
  6. ^ Amnesty International. Ambassador of Conscience Award Archived 2014-04-26 at the Wayback Machine.. Retrieved 31 December 2013.
  7. ^ Wayne C Booth. The Company We Keep: An Ethics of Fiction. University of California Press. Berkeley. 1988. p. 11 and Ch. 2.