विकिपीडिया:सद्य घटना/डिसेंबर २००७
वेळ: १७:५७ UTC | तारीख: नोव्हेंबर २१ |
<< | डिसेंबर २००७ | >> | ||||
र | सो | मं | बु | गु | शु | श |
१ | ||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
३० | ३१ | |||||
हे सुद्धा पहा |
दि. १३.१२.२००७
[संपादन]उच्च न्यायालयात मराठीसाठी वकिलांची ’वकिली’
उच्च न्यायालयात दाखल होणार्या याचिका आणि अपील मराठीतून दाखल करता येत नाहीत, मराठीतून युक्तिवाद करता येत नाही, म्हणून उच्च न्यायालयातील कामकाजाची भाषा मराठी व्हावी, यासाठी महाराष्ट्र आणि गोवा परिषद, मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था; तसेच विविध ठिकाणच्या वकील संघटनांनी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. केवळ न्यायव्यवहारच नव्हे, तर राज्यातील सर्व कामकाज, व्यवहार, अभ्यास, ज्ञानसाधना मराठीतूनच व्हावी, अशी ठाम मागणीही या आंदोलनात करण्यात आली.
सरकारी कामकाजाची भाषा मराठी असावी यासाठी कायदा होऊन ४३ वर्षे झाली. विधिमंडळाचे कामकाज या कायद्याने सुरू होऊन १२ वर्षे झाली. १९९८ मध्ये तालुका व जिल्हा न्यायालयांच्या कामकाजाची भाषा मराठी झाली, तरी मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत भाषा इंग्रजीच राहिली आहे. त्यामुळे याचिका व अपिलांसोबत दाखल करावी लागणारी कागदपत्रे मराठीत असली, तर त्यांचे इंग्रजीत भाषांतर करावे लागते. त्यासाठी जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. राज्यातील वकिलांची सर्वोच्च संस्था असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद; तसेच मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेने सरकार दरबारी अनेक वेळा प्रयत्न केले, चळवळी केल्या; पण त्याला हवे तेवढे यश आले नाही. त्याच चळवळीचा एक भाग म्हणून वकिलांनी आज आंदोलन केले. साहित्य संमेलने, साहित्यिक पुरस्कार यामुळे जरी मराठी जिवंत राहिली असली, तरी ती सारस्वतांच्या कोंडाळ्यात राहिली. मनोरंजनासाठी मराठीचा वापर होत असला, तरी सर्वसामान्यांच्या कामकाजाची, व्यवहाराची आणि नोकरीधंद्याची भाषा पूर्णतः मराठी झालेली नाही. सर्वसामान्यांना ती आपली भाषा व्हावी अशी परिस्थिती निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही या वकिलांनी व्यक्त केली.
(बातमी दुवा - सकाळ)
दि. १४.१२.२००७
[संपादन]मराठी शाळांमधील ’एज्यूकेशन इन्स्पेक्टर्स’ना इंग्रजीत पेपर देण्याची सक्ती
मराठीप्रेमासाठी आंदोलने करणार्या शिवसेनेचा भगवा ज्या मुंबई महापालिकेवर डौलाने फडकत आहे, त्याच महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून येत्या रविवारी (दि. १६.१२.२००७) मराठीसह विविध भाषिक शाळांमधील ’एज्यूकेशन इन्स्पेक्टर’ या पदाकरिता होणार्या परिक्षेकरिता इंग्रजी भाषेतून पेपर देण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या परिक्षा वेगवेगळ्या भाषेतून घेतल्या जात होत्या, परंतु एका खासगी संस्थेकडे परीक्षांचे आयोजन सोपविल्याने इंग्रजीचा दुराग्रह धरला गेलेला आहे, असे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.
(बातमी दुवा - लोकसत्ता)
दि. १५.१२.२००७
[संपादन]अंगठेबहाद्दरांचेही जुळणार ’एटीएम’शी सख्य! महाराष्ट्र बॅंकेचे बायोमेट्रीक कार्ड!
आता अक्षरओळख नसली तरी ’आकडे ओळख’ असलेल्या अंगठेबहाद्दरांना एटीएम कार्ड सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मराठी माणसाची आपली बॅंक असलेल्या महाराष्ट्र बॅंकेने ’बायोमेट्रीक एटीएम’ बसविण्याचा निर्णय घेतलेला आहे. खेडूतांसाठी येत्या मार्च अखेरीपर्यंत तीस शाखांमध्ये ’बायोमेट्रीक एटीएम’ बसविण्यात येणार आहेत.
(बातमी दुवा - लोकसत्ता)
दि. २१.१२.२००७
[संपादन]मुंबई महापालिकेचे १०० टक्के मराठीकरण
मुंबई महापालिकेच्या कारभाराचे शुद्ध मराठीकरण करण्याचा कार्यक्रम आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी हाती घेतला आहे. विविध निर्णयांचे, मसुद्यांचे आणि पत्रव्यव्हारांचे भाषांतर करणारा पालिकेच्या चिटणीस विभागातील इंग्रजी विभाग कायमचा बंद होणार आहे. पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर शिवसेनेने वारंवार मराठी भाषेचा आग्रह धरला आहे. १९७५ मध्ये तसा ठरावही करण्यात आला होता. मात्र नुकतेच पालिकेने जाहिरात आणि जाहिरात फलक याबाबतचे धोरण विशद करणारे पुस्तक छापले. ते पुस्तक इंग्रजीतच आहे. यावर शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी आक्षेप घेतला आहे. पालिका मराठी भाषेच्या वापरापासून शंभर टक्के दूर असल्याची खंत व्यक्त करणारे पत्र त्यांनी पालिकेला पाठवले आहे. येत्या गटनेत्यांच्या सभेत शंभर टक्के मराठी भाषेचा वापर करण्यासाठीचा हा विषय चर्चेला येणार आहे. याला लेखी उत्तर देताना आयुक्त डॉ. फाटक यांनी मराठीतूनच कारभार होणे सक्तीचे करण्यासाठी मसुदा पत्रे, प्रस्ताव यांचे इंग्रजीत भाषांतर करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या सभेत फक्त मराठीतून कामकाज चालते. त्याचप्रमाणेच पालिकेमध्ये देखील मराठीतून कामकाज करावे. त्यामुळे वेळ व साधनांचा अपव्ययही टळेल, असे मत त्यांनी मांडले आहे.
मात्र नगरसेवकांना मराठी बोलता येत असले, तरी मराठी वाचता येत नसल्याचे पालिका चिटणीस कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. कॉंग्रेसचे नगरसेवक समीर देसाई यांनी देखील याला विरोध केला आहे. ते म्हणाले, "मी माझी सर्व भाषणं मराठीत करतो. मात्र प्रशासकीय भाषेतील मसुदा इंग्रजीत वाचल्यावरच कळतो. मला प्रशासकीय मराठी भाषा समजणे कठीण जाते. मराठीच्या आग्रहाबरोबरच इंग्रजीचा पर्याय बंद केला जाऊ नये, ही भूमिका पक्षाकडे मी मांडणार आहे."
(बातमी दुवा - सकाळ)
दि. २३.१२.२००७
[संपादन]नाट्यकलावंत प्रकाश इनामदार यांचे निधन
गाढवाचं लग्न या जबरदस्त लोकनाट्याला तमाम महाराष्ट्रात नेणारे, लोकनाट्यापासून ते संगीत-ऐतिहासीक-विनोदी नाट्यापर्यंतचा प्रवास लीलया करणारे आणि त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवणारे कलावंत प्रकाश इनामदार यांचे आज निधन झाले. त्यांच्या नाट्यप्रवासात अखंड साथ करणार्या त्यांच्या पत्नी जयमाला, ध्वनिनियोजक चिरंजीव अभिजित आणि नृत्यांगना मुलगी धनलक्ष्मी असा परिवार त्यांच्या मागे आहे.
(बातमी दुवा -लोकसत्ता)
दि. २५.१२.२००७
[संपादन]मराठीची कास सोडून मनोहर जोशी हिंदुत्वाकडे?
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ६१ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनाला खुद्द स्वागताध्यक्ष मनोहर जोशी यांची गैरहजेरी उपस्थितांच्या टीकेचे लक्ष्य ठरली. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मनोहर जोशी हा कार्यक्रम डावलून गुजरातचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी गुजरातला गेले आहेत. त्याबाबत नाराजी व्यक्त करीत, "त्यांनी आता मराठीची कास सोडून हिंदुत्वाकडे धाव घेतली काय', असा परखड सवाल उपस्थित मराठी भाषकांनी केला.
मराठी माणसांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याच्या आणाभाका घेणार्यांनी देशातील तमाम मराठी माणसांची एकजूट करण्याचा प्रमुख उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेल्या अधिवेशनाला स्वागताध्यक्ष असतानाही मनोहर जोशी यांनी या कार्यक्रमाला दुय्यम दर्जा दिला काय, असा सूरही परराज्यांतून येथे आलेल्या मराठी भाषकांनी लावला.
महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत राहणार्या मराठी भाषकांचे ६१ वे दोनदिवसीय अधिवेशन मुंबईत सुरू झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्राबाहेरील राज्यांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्ती आणि संस्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष संजय पांडे यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात, स्वागताध्यक्ष मनोहर जोशी गुजरातमध्ये गेले असून सायंकाळपर्यंत येथे उपस्थित राहतील, असे सांगताच उपस्थितांनी नाराजीचा सूर लावत परखड प्रतिक्रिया व्यक्त केली.
(बातमी दुवा - सकाळ)
दि. २६.१२.२००७
[संपादन]मराठी शुद्धलेखनाच्या नव्या नियमावलीसाठी कृती आराखडा
मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून, वर्षभरात नियमावली तयार होईल, अशी अपेक्षा आहे. ...... १९६० पर्यंत संस्कृत भाषा तालुका पातळीवरील शाळेत अभ्यासक्रमाचा एक भाग होती. संस्कृतमधील अनेक शब्द मराठीमध्ये समाविष्ट होते. त्यामुळे संस्कृतच्या आधारेच मराठीतील लेखन केले जात होते, परंतु त्यासाठी कोणतीही नियमावली नव्हती. १९६१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला मूळ आधार मानूनच करण्यात आले होते, मात्र गेल्या ४७ वर्षांत संस्कृतचे प्रमाण कमी झाले. विद्यार्थ्यांचा केवळ गुण मिळविण्यापुरता संस्कृतशी संबंध राहिला असून, हिंदी, इंग्रजी शब्दांच्या वापरांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांच्या लेखनासाठी कोणतीही नियमावली नाही.
त्यामुळे काळाच्या प्रवाहात मराठी भाषेचा शुद्धपणा कायम ठेवण्यासाठी नवी नियमावली करणे आवश्यक झाले आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या संदर्भात सांगितले, की संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यांसमोर ठेवून नियमावली तयार केली जाईल. त्यासाठी आखलेल्या कृती आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागांतील भाषातज्ज्ञांची एक बैठकही झाली. दुसर्या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. र्हस्व, दीर्घ शब्दांसाठी कोणते नियम असावेत, लेखन उच्चारानुसार असावे का, दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्ह वापरावे का, कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्हे असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावेत का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होतील आणि त्यानंतर नियमावली अंतिम करून शासनाकडे पाठविण्यात येईल.
(बातमी दुवा - सकाळ)
दि. २८.१२.२००७
[संपादन]पुणेकर भाषाशास्त्रज्ञाच्या कोशाला जपानमधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार
मराठी भाषक विद्यार्थ्यांना जपानी भाषेचा अभ्यास सुलभ होण्याकरिता मूळच्या पुणेकर असलेल्या भाषाशास्त्रज्ञाने शब्दकोशाची निर्मिती केली असून, या प्रकल्पाला जपानमधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. ....... पुण्याचे डॉ. प्रशांत परदेशी यांनी तयार केलेल्या ’जपानी-मराठी मूलभूत क्रियापद व्यवहार शब्दकोशा'ला तेथील ’हाकुहो फाउंडेशन'चा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. परदेशी जपानमध्ये कोबे विद्यापीठात आहेत. तेथील ’हाकुहो बालशिक्षण संवर्धन समिती'च्या वतीने, जपानी भाषेचा जगभरात प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजिण्यात येतात. त्यामध्ये या प्रकल्पासाठी अनुदान देण्यात आले होते. डॉ. परदेशी यांच्यासह काही जपानी संशोधकही यात सहभागी झाले होते. नुकताच हा शब्दकोश पूर्ण झाला आहे. १०३ प्रकल्पांमधून डॉ. परदेशी यांच्या शब्दकोश प्रकल्पाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झाली आहे. जपानमधील या उपक्रमात सहभागी झालेल्या जपानी अभ्यासकांमध्ये ते एकमेव परदेशी होते.
कोणत्याही पाठ्यपुस्तकाचा आधार न घेता जपानी भाषेचे शिक्षण आणि क्रियापदे, व्याकरण आणि लिपी यांचा एकत्रित अभ्यास या शब्दकोशाद्वारे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या रोजगाराच्या नव्या संधी पाहता, अनेक जण जपानी भाषेच्या अभ्यासाकडे वळत असून, त्यांना हा कोश उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.
(बातमी दुवा - सकाळ)
दि. २९.१२.२००७
[संपादन]मराठी बुद्धिमत्तेची आणखी एक ’उज्ज्वल’ पताका जागतिक क्षितिजावर!
सिटीग्रुप च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवडल्या गेलेल्या विक्रम पंडितांच्या रूपाने मराठी बुद्धिमत्तेची ध्वजा सातासमुद्रापार फडकत असतानाच आणखी एक मराठी पताका ’उज्ज्वल निरगुडकर’ यांनी जागतिक क्षितिजावर उंचावून धरली आहे. मोशन पिक्चर टेक्नॉलॉजी संदर्भात दोन अमेरिकन पेटंट मिळविणारे निरगुडकर पहिले भारतीय ठरले असून ’सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अॅण्ड टेलिव्हिजन इंजिनिअर्स’ या न्यूयॉर्क च्या जगद्विख्यात संस्थेने ’फेलो’ म्हणून गौरविलेले ते पहिले भारतीय अभियंता आहेत.
(बातमी दुवा - लोकसत्ता)
दि. ३०.१२.२००७
[संपादन]दिल्लीत ’यशवंतराव चव्हाण स्मृती’ महोत्सव
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सार्वजनिक उत्सव समिती, नवी दिल्ली आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे ’यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह’ आयोजित करण्यात आला होता. समारोहाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांचे ’दिल्ली आणि महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान झाले. आपल्या भाषणात साधू यांनी स्वातंत्र्योत्तर दिल्लीच्या राजकारणात महत्वाची भूमिका अदा करणार्या मराठी नेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते प्रकाश जावडेकर होते.
(बातमी दुवा - लोकसत्ता)
मराठी चित्रपट दाखविणार नाही, परवान्यांचे नूतनीकरणही नाही!
वर्षातून किमान चार आठवडे मराठी चित्रपट न दाखविणार्या मुंबईतील चित्रपटगृहांच्या परवान्यांचे नूतनीकरण बंद करावे, असा आदेश गृहविभागाने जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुंबईच्या पोलिस आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. .....
मराठी चित्रपट न दाखविणार्या मुंबईतील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी १८ डिसेंबर रोजी मंत्रालयातील चित्रपट निर्मात्यांच्या बैठकीत दिला होता. त्याची अंमलबजावणी करणारा आदेश दहा दिवसांतच काल गृहविभागाने काढला आहे.
मुंबईत १०१ चित्रपटगृहे असून त्यात १६ मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांचा समावेश आहे. या मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट दाखविण्यासाठी ८१ स्क्रीन आहेत; मात्र १०१ चित्रपटगृहांपैकी ८० चित्रपटगृहांनी २००६-०७ मध्ये मराठी चित्रपट दाखविले नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य सरकारने याआधीच राज्यातील सर्व चित्रपटगृहांनी एका वर्षात किमान चार आठवडे मराठी चित्रपट दाखविले पाहिजेत, असे बंधन घातले आहे; परंतु या अटीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे गृहविभागाने काल एक आदेश काढून या निर्णयाचे व अटीचे पालन न करणार्या चित्रपटगृहांच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये, असे स्पष्ट केले आहे.
(बातमी दुवा - सकाळ)
दि. ३१.१२.२००७
[संपादन]जाधवराव गढी बनली जगातील पहिले "हेरिटेज हॉटेल”
इतिहास आणि राजकीय खलबतांची साक्षीदार ठरलेली सासवडजवळील "जाधवरावांची गढी' आता "जाधवगढ हेरिटेज हॉटेल' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. ....
हॉटेल व्यवसायात जगभर ५५० हॉटेल्सचे साम्राज्य उभे करणार्या विठ्ठल व्यंकटेश कामत या प्रसिद्ध उद्योजकाने हे हॉटेल उभारले असून संस्कृती, पर्यावरण आणि परंपरेचा सुरेख मिलाप साधणारे हे हॉटेल लवकरच पर्यटन नकाशावर झळकेल, असा त्यांचा विश्वास आहे. "लढ, झगड, आगे बढ' हे या हॉटेलचे घोषवाक्य आहे.
आज एका औपचारिक कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले, तेव्हा पवार यांनीही या हॉटेलची प्रशंसा केली. याच आवारात कामत यांनी उभारलेल्या "आई” या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचेही त्यांनी उद्घाटन केले. अशा प्रकारचे जगातले हे पहिलेच "हेरिटेज हॉटेल” असल्याचा दावा कामत यांनी केला आहे. जाधवराव गढीचे मालक माजी आमदार दादा जाधवराव, ऍड. अमरसिंग जाधवराव, बाबाराजे जाधवराव, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, आमदार अशोक टेकवडे यांच्यासह पुण्या-मुंबईतील अनेक मान्यवर आणि उद्योजक या वेळी उपस्थित होते.
(बातमी दुवा - सकाळ)