विकिपीडिया:सदर/२०२५०१०१
लॉरेंझो दि पिएरो दे मेदिची तथा लॉरेंझो दे मेदिची (१ जानेवारी, १४४९:फिरेंत्से, तोस्काना, इटली - ८ एप्रिल, १४९२:करेज्जी, तोस्काना, इटली) हा इटलीतील फिरेंझेचा अनभिषिक्त शासक होता. लॉरेंझो पेशाने सावकार, राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता.
लॉरेंझोने इटलीच्या प्रादेशिक शासकांची युती घडवून आणुन त्यावेळच्या पोप सिक्स्टस चौथ्याच्या महत्वाकांक्षेला आळा घातला. यामुळे त्याच्यावर पाझ्झी घराण्याने कट रचून खूनी हल्ला चढवला. त्यात लॉरेंझो वाचला परंतु त्याचा भाऊ जुलियानो दि पिएरो दे मेदिची त्यात बळी पडला.
लॉरेंझो दे मेदिचीचे आजोबा कोसिमो दे मेदिची हे त्यांच्या घराण्यातील फिरेंझेचे पहिले शासक होते. हे बांको दै मेदिची ही बँक चालवीत असत व त्याद्वारे ते युरोपमधील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक झाले होते. त्याचवेळी त्यांनी फिरेंझेच्या राजकारणावर पकड बसवली. सत्तेवर असताना त्यांनी फिरेंझेच्या जनतेसाठीच्या सरकारी कामांवर आणि तेथे कलाप्रसार करण्यावर मुबलक पैसा खर्च केला. लॉरेंझोचे वडील पिएरो दि कोसिमो दे मेदिची यांनीही अनेक कलांना आश्रय दिला तर त्याचे काका जियोव्हानी दि कोसिमो दे मेदिची यांनी परंपरागत व्यवसाय चालविला. लॉरेंझोची आई लुक्रेझिया तोर्नाबुओनी ही कवयत्री होती व फिरेंझेच्या प्लॅटोनिक अकादमीतील सदस्यांशी ती ओळख ठेवून होती. लॉरेंझोच्या वडील आणि काकांच्या मृत्युपश्चात ती लॉरेंझोची मुख्य सल्लागार झाली.
पिएरो आणि लुक्रेझियाच्या पाच मुलांपैकी लॉरेंझो हा सगळ्यात कर्तबगार समजला जात होता. लहानपणी त्याला जेंतिले दे बेक्की या राजदूत आणि बिशपने तसेच मार्सिलियो फिचिनो या तत्त्वज्ञानने शिक्षण दिले. त्याला रिनैसाँ काळातील महत्त्वाचे विद्वान जॉन आर्गिरोपूलस यांच्याकडून ग्रीक भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण मिळाले. याशिवाय लॉरेंझो आणि त्याचा भाऊ जुलियानो यांनी जाउस्टिंग, शिकार करणे, शिकारी पक्षी बाळगणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या २०व्या वर्षी त्याने पालियो दि सियेना या घोड्यांच्या शर्यतीत भाग घेतल आणि तेथे जाउस्टिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवला. याबद्दल लुइजी पुल्चीने कविता लिहून ठेवली आहे. ही स्पर्धा मेदिची कुटुंबाने प्रायोजित केली होती याची नोंद घेत निक्कोलो माकियाव्हेलीने (कदाचित उपरोधानो) लिहिले की लॉरेंझो वशिल्याने नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्त्वेने ही स्पर्धा जिंकला.
लॉरेंझोच्या मृत्यूनंतर फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.
लॉरेंझोला फिरेंझेमधील बेसिलिका दि सान लॉरेंझोमध्ये दफन करण्यात आले आहे.