Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २०१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध हे म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व त्यांचे मित्रसैन्य (मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम) यांच्यामध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९२ या कालखंडात झडलेले युद्ध होते. हे युद्ध इंग्रज-म्हैसूर युद्धे मालिकेतील तिसरे युद्ध होते.

भारतातील मराठे, हैदराबादचा निजाम आणि म्हैसूरचा टिपू सुलतान या प्रमुख सत्ताधीशांना भारतात युरोपियन सत्तांचे वाढते वर्चस्व मान्य नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेच्या मार्गातील हे प्रमुख सत्ताधीश अडथळे बनलेले होते म्हणूनच कॉर्नवॉलिसने त्यांना परस्परांपासून वेगळे ठेवण्याचे धोरण अवलंबिले होते. भारतातील प्रमुख तीनही सत्ताधीशांपैकी हैदराबादचा निजाम आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी ब्रिटिशांच्या मैत्रीचा आधार घेऊ इच्छित होता. कॉर्नवॉलिसने त्यादृष्टीने निजामाशी एक गुप्त करार केला. त्या कराराचा भाग म्हणून निजामाने इ.स. १७८८ साली गुंटूर जिल्हा कंपनीला दिला. त्याबदल्यात कॉर्नवॉलिसने निजामाला हैदर अलीने त्याचा जिंकलेला प्रदेश परत मिळविण्यासाठी लष्करी मदत देऊ केली. टिपूला हे वृत्त कळाल्यावर टिपूने इंग्रजांवर दगाबाजीचा आरोप केला कारण मार्च, इ.स. १७८४ च्या मंगलोरच्या तहानुसार हा सर्व भूभाग म्हैसूर राज्याचा कायदेशीर प्रदेश आहे असे कंपनीने मान्य केले होते. कॉर्नवॉलिसचे कृत्य मंगलोर तहाचा भंग करणारे होते त्यामुळे टिपू आक्रमक झाला.

इ.स. १७८९ मध्ये टिपूने तंजावरवर आक्रमण केले होते. ब्रिटिशांनी तंजावरला संरक्षण प्रदान केले असल्याने कॉर्नवॉलिसने टिपूविरूद्ध जानेवारी, इ.स. १७९० मध्ये युद्ध पुकारले आणि हैदराबादचा निजाम ब्रिटिशांचा वचनबद्ध मित्र असल्याने ब्रिटिशांच्या वतीने तोही युद्धात सामील झाला. पुढे वाचा... तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध