विकिपीडिया:मराठवाडा दालन/विशेष लेख
गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमुंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. भीमा, वैनगंगा, इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमुंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.
गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.