विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७०५०६
इसवी सनाच्या आठव्या शतकताच्या पूर्वार्धात भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.
इ.स. ७१२ मध्ये सिंध राज्य जिंकल्यावर अरबांनी सिंधू नदीच्या पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. इ.स. ७२४ ते ८१० च्या दरम्यान उत्तरेकडील गुर्जर-प्रतिहार सम्राट नागभट्ट पहिला, दक्षिणेकडील चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा व इतर लहान भारतीय राज्ये यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या अरबांशी संघर्ष झाले. उत्तरेकडे सम्राट नागभट्टाने माळव्यावर चाल करून येणाऱ्या महत्त्वाच्या अरब मोहिमेचा पराभव केला तर दक्षिणेकडून विक्रमादित्याने आपला सेनानी पुलकेशी याला पाठवले. पुलकेशीने गुजरातमध्ये अरबांचा पराभव केला. इ.स. ७७६ मध्ये सैंधव नाविक दलाने अरबांच्या नाविक मोहिमेचा पराभव केला.
सम्राट हर्षवर्धनाच्या राजवटीनंतर आठव्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर भारतात अनेक लहानमोठी राज्ये निर्माण झाली होती. वायव्येकडील प्रदेश काश्मीरचे कर्कोटा साम्राज्य व काबूलच्या हिंदू शाही या राज्यांच्या ताब्यात होता. उत्तर भारतातील प्रमुख शहर कनौज हे राजा यशोवर्मन याच्याकडे होते. ईशान्येकडे पाल घराण्याची सत्ता होती तर दक्षिणेस चालुक्यांची राजवट होती. पश्चिम भारतात सिंधचा राई राजवंश तसेच भिनमाळ, मंडोर, राजपीपळा व भरूच येथील अनेक गुर्जर कुळांची राज्ये यांची सत्ता होती. यांच्यातील अखेरचे प्रतिहार हे कूळ पुढे सामर्थ्यवान बनले. काठियावाडचे द्वीपकल्प अनेक लहान् राज्यांत विभागले होते व त्यांत मैत्रक राजवंश ही सर्वात प्रबळ सत्ता होती.
उमायद खिलाफतीच्या लष्करी विस्ताराचा तिसरा टप्पा इ.स. ६९२ ते ७१८ पर्यंत टिकला. खलिफा अल-वालीद पहिला याच्या इ.स. ७०५ ते ७१५ एवढ्या केवळ दहा वर्षांच्या कारकिर्दीत उमायदांचा मोठा विस्तार झाला. या काळात अरबांनी उत्तर आफ्रिका, स्पेन, सिंध व ट्रान्स ऑक्सियाना हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. उमायाद सेनापती मुहम्मद बिन कासिम याने राई वंशाच्या राजा दाहीर या सिंधी शासकाचा पराभव केला. अल् मन्सूरा राजधानी असलेला सिंध हा खिलाफतीचा दुसऱ्या दर्जाचा प्रांत झाला व तो अरबांसाठी भारतावर आक्रमण करण्याचा योग्य तळ होता परंतु बिन कासिम गेल्यावर त्याने जिंकलेले बहुतांश प्रदेश भारतीय राजांनी परत मिळवले.