वाशिष्ठी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाशिष्ठी नदी कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. हिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर असून ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. ती सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर उंचीवरून उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते.

वाशिष्टीच्या उपनद्या[संपादन]

जगबुडी नदी वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच पण एका वर्षी तिने हायवे बंद पाडला होता. हिच्यावर दोन मध्यम प्रकल्प आहेत नातूवाडी आणि शिरवली. वाशिष्ठीच्या इतर उपनद्या किंवा नाले म्हणजे नारिंगी, तांबी नदी, धावती नदी, बैतरणी आणि शिवनदी.

गोड्या पाण्याची नदी[संपादन]

कोकणात जरी ३००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडत असला तरी तीव्र उतारांमुळे आणि जमिनीच्या रचनेमुळे हे पाणी तत्परतेने समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पण वाशिष्ठीचे गोडे पाणी मात्र कधीच कमी नसते. ती सदा भरलेली, वाहणारी असते.

कोयनेचे पाणी वाशिष्ठीत[संपादन]

वाशिष्ठी नदीत येणारे पाणी तिचे नाही. हे पाणी सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पातून येते. कोयना धरणाचा विस्तीर्ण शिवसागर जलाशय कोयना १, २ आणि ४ या टप्प्यांतील पाणी साठवतो.. हे पाणी खरे तर आग्नेयेकडे वाहून कोयना नदीतून कृष्णेस मिळायला हवे, पण तसे होऊ नये म्हणून ते अडवून व थेट उलटे वळवून कृष्णा खोऱ्यातून कोकणातील वाशिष्ठी खोऱ्यात टाकले जाते. असे पाणी दर वर्षी १९०० दश लक्ष घन मीटर इतके असते.

वाशिष्टी खोऱ्यातील निसर्गवैविध्य[संपादन]

वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. इथे वैविध्याची अचाट रेलचेल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, आणि छोटे नाजुक ओहोळ ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. या खोऱ्यात खारफुटीची जंगले आहेत आणि बिबटे, कोल्हे व अन्य प्राणीही आहेत.

मगरी[संपादन]

वाशिष्टी नदीमध्ये मगरी आहेत.विशेषतःवाशिष्टी नदीची उपनदी असलेल्या तांबी नदीच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात. कात्रोळी धरणाजवळ मोठ्या संख्येने मगरी पाहता येतात. मगर पाहण्यासाठी कात्रोळीतील देऊळवाडी काळश्री मंदिराजवळ दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

दाभोळची खाडी[संपादन]

वाशिष्टी नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तिथे दाभोळची खाडी आणि दाभोळ बंदर आहे.