वडुज
?वडुज महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खटाव |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/11 |
वडुज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.
जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा म्हणूनही ह्या जिल्ह्याने ओळख निर्माण केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वांना परिचित आहे. मात्र, या तालुक्यातील काही गावे आपल्या वैशिष्ट्याने महाराष्ट्रात प्रसिद्ध पावली आहेत. या तालुक्याचे मुख्य कचेरीतील गाव वडूज हे हुतात्म्यांची भूमी आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला आहे. पण, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वडूज येथे नऊ स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण अर्पण करावे लागले आहेत.
इतिहास
[संपादन]महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या चळवळीत सारा देश खडबडून जागा झाला होता. महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडोचा आदेश दिला आणि सर्वच कार्यकर्ते मोर्चे बांधू लागले. जिल्ह्यात औंध येथील बॅ. आप्पासाहेब पंत, बंडोपंत लोमटे, गौरीहर, सिंहासने, दादासाहेब साखवळकर, नानासाहेब, आयाचित, पिलोबा वडूजकर, रामभाऊ नलवडे, माणिकचंद दोशी, बापूराव कचरे यांनी गावोगावी गुप्त बैठका घेऊन ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथे मामलेदार कचेरीवर मोर्चा यशस्वी करण्याचे ठरविले.[१]
९ सप्टेंबर १९४२ ला हा विराट मोर्चा जयराम स्वामी वडगाव येथून सकाळी ६ वाजता वडूजकडे चालत निघाला. मोर्चात १५०० लोक सामील झाले होते. वडगाव ते वडूज हे १३ मैलाचे अंतर तोडून पायी निघालेला मोर्चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा काही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी निघाला नव्हता, तर मातृभूमीच्या मुक्ततेसाठी प्राण गमविण्यासाठी व इंग्रजांच्या जुलमी छळाला प्रत्युत्तर देण्यासाठी होता. सकाळी ६ वाजता निघालेला मोर्चा दुपारी ११ वाजता वडूजला येऊन पोहोचलो व १२ वाजता कचेरीवर आला.
गो-या शिपायांचा कडक बंदोबस्त होता. त्यावेळी मामलेदार अंकली तर फौजदार बिंडीगिरी होते. मोर्चा कचेरीजवळ आल्यानंतर परशूराम घार्गे यांनी खांद्यावर तिरंगी झेंडा घेऊन उभे होते. वंदे मातरम्, भारत माता की जय अशा गगनाला भिडणा-या घोषणा दिल्या जात होत्या. मामलेदार अंकली व फौजदार बिंडीगिरी यांनी मोर्चा कचेरीपासून १५० फूटावर असलेल्या गोविंदराव महादेव शिंदे यांच्या हॉटेलाजवळ अडवला. अडवून ठेवलेल्या मोर्चाने भर उन्हात तेथेच बैठक मारली. मात्र, कोणताही गुन्हा नसताना अचानक बेसावध झालेल्या मोर्चावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तरच बंदुकीचा वापर करायचा असतो आणि तोही पायावर गोळ्या मारायाच्या असतात. परंतु ब्रिटिशांच्या या निर्दयी पोलिसांनी सर्व संकेत धाब्यावर बसवून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या परशूराम घार्गे यांच्यावर एका मागून एक अशा गोळ्या झाडल्या आणि इतरांनाही बंदुकी चालविण्याचा हुकूम दिला.
त्यामुळे निर्दशकांची धावपळ सुरू झाली. जवळ कोणतेच हत्यार नाही. अशावेळी गोळ्यांच्या वर्षावाने जागच्या जागीच पाचजणांनी होतात्म्य पत्करले. चारजण गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांना हौतात्म्य आले. शेकडोजण कायमचे जायबंदी झाले. यात
1.परशुराम श्रीपती घार्गे 2.किसन बाळा भोसले 3.खाशाबा मारूती शिंदे 4.सिदू पवार 5.राम कृष्णा सुतार 6.बलभीम हरी खटावकर 7.बाळकृष्ण दिगंबर खटावकर 8.श्रीरंग शिंदे 9.आनंद श्रीपती गायकवाड
या ९ जणांचे मृतदेह दहिवडीला नेण्यात आले. कोणीही नातेवाईक जवळ नसताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. उलट वडगावला जाऊन लोकांचा छळ केला. वडगावचे पोलिस पाटील खाशाबा घार्गे यांना पोलिसांनी हातपाय बांधून रक्त ओकेपर्यंत बेदम मारले. याबद्दल मामलेदार अंकली व फौजदारी बिंडीगिरी यांना मात्र बढत्या देण्यात आल्या. वडूजच्या मामलेदार कचेरीवर स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून पाहणा-या हुतात्म्यांनी एका मागून एक आपले देह ठेवले.
एक नव्हे तर नऊ स्वातंत्र्यवीरांचे देह तेथे पडले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले हे वडूज येथे आले असता, त्यांनी जालीयनवाला बागसारखी एक पवित्र वास्तू बनविण्यासाठी हुतात्मा स्मारके उभे करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे या हुतात्म्यांत्या विचारांची साक्ष देण्यासाठी अनेक हुतात्मा स्मारके आहेत. क्रांतीकारकांच्या पेटलेल्या वातावरणाचा दाह खटाव तालुक्यात ब्रिटिश सत्तेला तीव्रतेने जाणवत होता. येथेच प्रति सरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणा-या नाना पाटील यांनी जनक्रांती केली.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात ९ हुतात्म्यांनी जी भरीव कामगिरी केली, त्याची ओळख आजच्या नवीन पिढीला जवळजवळ नाही म्हटले तरी चालेल. कारण, स्वातंत्र्याची मधूर फळे मुक्तपणे चाखणा-या आजच्या पिढीला अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे दिव्य जीवन समजले तर त्यांनी केलेला त्याग व आजचे कर्तव्य याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचे स्मरण करणे हे क्रमप्राप्त ठरते.
हवामान
[संपादन]येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार वडूज गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड 415506 आहे. वडूज हे गाव महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय वडूज (तहसीलदार कार्यालय) पासून 6 किमी अंतरावर आणि सातारा जिल्हा मुख्यालयापासून 55 किमी अंतरावर आहे. 2009 च्या आकडेवारीनुसार, वडूज गाव देखील ग्रामपंचायत आहे. व 2017 नंतर नगरपंचायत म्हणून मान्यता मिळाली आहे.[२]
गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र 2800 हेक्टर आहे. वडूजची एकूण लोकसंख्या १७,६३६ आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या ८,९७७ आहे, तर महिलांची लोकसंख्या ८,६५९ आहे. वडूज गावाचा साक्षरता दर 76.80% असून त्यापैकी 80.16% पुरुष आणि 73.31% महिला साक्षर आहेत. वडूज गावात सुमारे 3,848 घरे आहेत.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]खटाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे, असे असले तरी सर्व कार्यालये वडूज या ठिकाणी आहेत. पूर्वी संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. शिवाजी महाराज, लुत्फुल्लाखान, कृष्णराव ख्टावकर यांच्या अधिपत्याखाली हा भाग राहिलेला होता.
औंध
संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. येथे पंतप्रतिनिधींचा मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा आहे. किन्हईचे कुलकर्णी पदाचे वंशपरंपरागत अधिकार असलेले त्र्यंबक कृष्णा हे प्रतिनिधी घराण्याचे पूर्वज. या घराण्यातील रामचंद्र अमात्याच्या पदरी परशुराम त्रिबकयांना छत्रपती राजाराम यांनी १६९० मध्ये सरदारकी आणि सुभालष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. डोंगरावर श्री. यमाई देवीचे मंदिर आहे.
औंध वस्तूसंग्रहालय
८ हजारपेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तू संग्रहालय १९३८ साली बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी बांधले. विविध प्रदेशात निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी चित्रे, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेली धातूची, लाकडाच्या वस्तू, हस्ती दंत कोरीव कराकृती आणि स्ट्राँगरुमधील दुर्मिळ मौलिक ऐतिहासिक रत्न यांचे दुर्मिळ दर्शन या ठिकाणी पहावयास मिळते. आता ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे.
यमाई मंदिर
औंध गावाशेजारी मूळपीठ नावाचा ८०० फूट उंचीचा डोंगर आहे. त्यावर औंधची ग्रामदेवता तसेच प्रतिनिधी धरणाची कुलदेवता यमाई देवीचे मंदिर आहे. यमाईदेवी महाराष्ट्रातील पंचमहादेवतांपैकी एक आहे.
पुसेगाव
येरळा नदीच्या तीरावर पुसेगाव वसले आहे. नाथपंथियांच्या अकरा लिगापैकी एक येथे आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी कामे करून १० जानेवारी १९४७ मध्ये समधी घेतली.
पुसेसावळी
येथील आयाचित घराण्यातील पूर्वज श्री. पांडूरंग आयचित यांना आळंदीकडून दोन अजानवृक्ष व ज्ञानेश्वरांची मूर्ती प्राप्त झाली. आज या ठिकाणी दोन अडीचशे वृक्ष आहेत या ठिकाणी असलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती वैशिष्ट्येपूर्ण आहे.
मायणी
या ठिकाणी असलेला तलाव हा १०० वर्षांपेक्षाही जुना आहे. या दुष्काळी भागातील शेतीला पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा तलाव बांधण्यात आला. वनखात्याच्या मार्फत या तलावाच्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढवून या परिसराचे अरण्यात रुपांतर केले आहे. म्हणजेच या ठिकाणी पक्षांसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि निवाऱ्यासाठी उंच झाडी व झुडपे अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केवळ देशातीलच नव्हेतर परदेशतील नाना प्रकारचे पक्षीवृंद येथे हिवाळ्यात असऱ्यासाठी येतात. गरुड, ससाणा, फ्लेमिगो (रोहित, विविध जातीची बदके) सारस (कारकोचे) इ. पक्षांची संख्या मोठी असते. पाण्यात बुड्या मारणारे पाणबुडे तसेच पाण्यावरून पळत जाणारे नाम्यापक्षी येथे पहायला मिळतात. १.५ हेक्टर परिसरात हे विस्तारलेले अभयारण्य म्हणजे इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य होय.
कुरोली सिद्धेश्वर
खटाव, येरळा नदीवरील सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पिडीवर अभिषेकाची धार घरल्यावर शिट्टीसारखा शिवनाद निघतो. त्याला सिहनाद म्हणतात. भारतातील शिवस्थानांपैकी शिवनाद करणारे हे एकमेव स्थान आहे.
गुरसाळे
वडूज पासून ९ कि.मी. असणारे गाव म्हणजे गुरसाळे या गावात १३ व्या शतकातील रामलिग मंदिर आहे. तसेच एक सोमलिग मंदिर ही आहे.
नेर तलाव
पुसेगाव जवळ नेर गावाच्या छोट्याशा गावात एक ब्रिटीश कालीन तलाव असून नेर तलाव म्हणून तो ओळखला जातो. ब्रिटीश आमदानीत व्हिक्टरिया राणीच्या काळात इ.स. १८७३ मध्ये या धरणाचे बांधकाम इरिगेशन डिपार्टमेंटकडून झाले आहे. या तलावाच्या मध्यभागी टेकडी असून तयावर चैतोबाचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी एक पायवाट आहे. या वाटेचे वैशिष्ट्ये असे की धरणातील पाणी वाढले तरी रस्ता पाण्याखाली कधीही जात नाही.
कटगुण
थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मगांव.
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ Esakal (2024-10-03). "Marathi News | मराठी बातम्या: Today's Top Headlines, Online Batmya Updates on Sakal". Marathi News Esakal. 2024-10-03 रोजी पाहिले.
- ^ "Vaduj Village in Khatav (Satara) Maharashtra | villageinfo.in". villageinfo.in. 2024-10-03 रोजी पाहिले.