लॉरेंझो दे मेदिची
लॉरेंझो दि पिएरो दे मेदिची तथा लॉरेंझो दे मेदिची (१ जानेवारी, १४४९:फिरेंत्से, तोस्काना, इटली - ८ एप्रिल, १४९२:करेज्जी, तोस्काना, इटली) हा इटलीतील फ्लोरेन्सचा अनभिषिक्त[१] शासक होता. लॉरेंझो पेशाने सावकार, राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले.[२][३][४] त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता.[५]
लॉरेंझोने इटलीच्या प्रादेशिक शासकांची युती घडवून आणुन त्यावेळच्या पोप सिक्स्टस चौथ्याच्या महत्वाकांक्षेला आळा घातला. यामुळे त्याच्यावर पाझी घराण्याने कट रचून खूनी हल्ला चढवला. त्यात लॉरेंझो वाचला परंतु त्याचा भाऊ जुलियानो दि पिएरो दे मेदिची त्यात बळी पडला.
लॉरेंझोच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.
लॉरेंझोला फ्लोरेन्समधील मेदिची चॅपेलमध्ये दफन करण्यात आले आहे.
बालपण आणि घराणे
[संपादन]लॉरेंझो दे मेदिचीचे आजोबा कोसिमो दे मेदिची हे त्यांच्या घराण्यातील फिरेंझेचे पहिले शासक होते. हे बांको दै मेदिची ही बँक चालवीत असत व त्याद्वारे ते युरोपमधील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक झाले होते. त्याचवेळी त्यांनी फिरेंझेच्या राजकारणावर पकड बसवली. सत्तेवर असताना त्यांनी फिरेंझेच्या जनतेसाठीच्या सरकारी कामांवर आणि तेथे कलाप्रसार करण्यावर मुबलक पैसा खर्च केला.[६] लॉरेंझोचे वडील पिएरो दि कोसिमो दे मेदिची यांनीही अनेक कलांना आश्रय दिला तर त्याचे काका जियोव्हानी दि कोसिमो दे मेदिची यांनी परंपरागत व्यवसाय चालविला. लॉरेंझोची आई लुक्रेझिया तोर्नाबुओनी ही कवयत्री होती व फिरेंझेच्या प्लॅटोनिक अकादमीतील सदस्यांशी ती ओळख ठेवून होती.[७] लॉरेंझोच्या वडील आणि काकांच्या मृत्युपश्चात ती लॉरेंझोची मुख्य सल्लागार झाली.
पिएरो आणि लुक्रेझियाच्या पाच मुलांपैकी लॉरेंझो हा सगळ्यात कर्तबगार समजला जात होता. लहानपणी त्याला जेंतिले दे बेक्की या राजदूत आणि बिशपने तसेच मार्सिलियो फिचिनो या तत्त्वज्ञानने शिक्षण दिले.[८] त्याला रिनैसाँ काळातील महत्त्वाचे विद्वान जॉन आर्गिरोपूलस यांच्याकडून ग्रीक भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण मिळाले.[९] याशिवाय लॉरेंझो आणि त्याचा भाऊ जुलियानो यांनी जाउस्टिंग, शिकार करणे, शिकारी पक्षी बाळगणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या २०व्या वर्षी त्याने पालियो दि सियेना या घोड्यांच्या शर्यतीत भाग घेतल आणि तेथे जाउस्टिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[१०][११] याबद्दल लुइजी पुल्चीने कविता लिहून ठेवली आहे.[१२] ही स्पर्धा मेदिची कुटुंबाने प्रायोजित केली होती याची नोंद घेत निक्कोलो माकियाव्हेलीने (कदाचित उपरोधानो) लिहिले की लॉरेंझो वशिल्याने नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्त्वेने ही स्पर्धा जिंकला.[१३]
लॉरेंझोला त्याच्या वडीलांनी लहानपणीच अनेक राजनैतिक दूत म्हणून महत्वाच्या व्यक्तींना भेटण्यास पाठविले. लॉरेंझो यासाठी अनेक वेळा रोमला जाउन पोप आणि इतर राजकारण्यांना भेटला.[१४]
लोरेंझोचे वर्णन अगदी साधारण दिसणारा, फार उंच नसलेला, नकट्या नाकाचा, आखूड पायांचा आणि आडव्या बांध्याचा माणूस असे केल गेलेले आहे. लॉरेंझोला दूरवरचे दिसत नसे आणि त्याचा आवाज खरखरीत असल्याची नोंद आहे. उलटपक्षी त्याचा भाऊ जुलियानो हा अतिशय देखणा होता. बॉतिचेल्लीने आपले मार्स अँड व्हीनस हे चित्र काढताना जुलियानोला समोर ठेवलेले होते.[१५] लॉरेंझोच्या अगदी खास मित्र निक्कोलो व्हालोरीने सुद्धा लॉरेंझोचे वर्णन करताना तो दिसायला कुरूप परंतु कुशाग्र बुद्धी असलेला, ज्याच्याकडे पाहताच त्याच्याबद्दल आदर वाटण्यासारखे काहीही नसलेला असे केले आहे.[१६]
राजकारण
[संपादन]लहानपणापासून घराण्याचा वारसा चालविण्यासाठी तयार केल्या गेलेल्या लॉरेंझोने १४६९मध्ये आपल्या आजोबा आणि वडीलांच्या मृत्यूनंतर बांको दै मेदिची आणि फिरेंझेच्या राजकारणाचे सुकाणू हाती घेतले. यावेळी तो २० वर्षांचा होता. कोसिमो आणि पिएरोने फिरेंझेच्या जनतेसाठी आणि इतर राजकारणातील खर्चासाठी बँकेतून पैसे उचलले होते. हे लॉरेंझोने आपल्या सत्ताकाळात परत मिळवले.[१७]
लॉरेंझोने फिरेंझे आणि फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकावर कधीच थेट सत्ता चालवली नाही. आपल्या आजोबा, वडील व नंतर मुलाप्रमाणेच त्याने आपले हस्तक सत्तेवर बसवले आणि पैसे चारून आणि नेमके हुनरी, कर्तबगार लोकांशी लग्नसंबंध करून त्याने सत्तेवर थेट १४९० पर्यंत मजबूत पकड ठेवली होती.[१८][१९] या कारणास्तव फिरेंझेमधील इतर महत्त्वाकांक्षी कुटुंबे मेदिचींना पाण्यात पहात असे. यांच्या विरोधामुळे प्रजासत्ताकाचे राजकारण ढवळून निघाले ते लॉरेंझोच्या मृत्यूनंतरही तसेच राहिले. यांपैकी पाझी कुटुंबाचा मेदिचींवर विशेष रोष होता व त्यांनी रचलेल्या कटात मेदिचींची सत्ता संपुष्टात येता राहिली.[१८][२०]
२६ एप्रिल, १४७८ रोजी फिरेंझेतील फ्रांचेस्को दे पाझी, गिरोलामो रिआरियो आणि पिसाचा बिशप फ्रांचेस्को साल्व्हिआती यांनी कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे या चर्चमध्ये लॉरेंझो आणि त्याचा भाऊ जुलियानोवर खूनी हल्ला केला.[२१] फिरेंझे सरकारवरील सत्ता हस्तगत करण्यासाठी पाझी आणि साल्व्हिआती यांनी पोप सिक्स्टस चौथ्याच्या संमतीने केलेल्या या हल्ल्यात जुलियानोला चर्चमध्येच भोसकून ठार मारण्यात आले. लॉरेंझोच्या गळ्यावर वार झाला परंतु त्याच्या व्यावसायिक भागीदार फ्रांचेस्को नोरी आणि कवी पोलिझियानो यांनी त्याला वाचवले.[२२] जुलियानोप्रमाणे नोरीही यात मृत्यू पावला.[२३] ही बातमी फिरेंझेमध्ये पसरताच शहरातील जमावाने हल्लेखोरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रस्त्यात ठेचून मारले.[२०]
या कटाविरुद्ध झालेल्या जनक्षोभात आपले हस्तक बळी पडलेले पाहून आणि फिरेंझेवर आपली हुकुमत येणे अशक्य असल्याचे कळून चुकल्यावर सिक्स्टस चौथ्याने मेदिची घराण्याची संपत्ती मिळेल तेथून जप्त केली आणि फिरेंझेच्या प्रजासत्ताकावर अनेक प्रकारे अडचणी आणल्या. त्याने लॉरेंझोला आणि पर्यायाने फिरेंझेच्या सरकारला वाळीत टाकले आणि नंतर संपूर्ण प्रजासत्ताकावर धार्मिक संस्कार करण्यावर बंदी घातली.[२४] याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे पाहून त्याने नेपल्सच्या राजा पहिल्या फर्डिनांडशी युती केली आणि फर्डिनांडचा मुलगा कालाब्रियाचा आल्फोन्सोच्या नेतृत्त्वाखाली फिरेंझेवर चाल केली.[२५]
याविरुद्ध लॉरेंझोने फिरेंझेच्या नागरिकांना आवाहन करून प्रतिकार केला परंतु फिरेंझेचे परंपरागत मित्र-राज्ये बोलोन्या आणि मिलानकडून मदत न मिळाल्याने हे युद्ध लांबत गेले.[२०] ही कोंडी फोडण्यासाठी लॉरेंझो स्वतः नेपल्सला फर्डिनांडशी बोलणी करण्यासाठी गेला आणि स्वखुशीने त्याचा बंदी म्हणून अनेक महिने राहिला. फर्डिनांडशी तह करून लॉरेंझोने फिरेंझेवरील संकट घालवले. याचा फायदा करून घेत त्याने फिरेंझेच्या संविधानात अनेक बदल करवून घेतले व त्याद्वारे फिरेंझेवरील स्वतःची पकड अधिकच मजबूत केली
यानंतर लॉरेंझोने आसपासच्या राज्यांशी मित्रत्त्वाचे धोरण घेतले. आपल्या आजोबा कोसिमो दे मेदिचीप्रमाणे याने उत्तर इटलीमधील राज्यांमध्ये मुत्सद्दीपणा करून त्यांच्या आपसात शांतता राखली आणि त्याद्वारे युरोपातील फ्रांस आणि व्हॅटिकन सिटी यांसारख्या मोठ्या सत्तांना इटलीपासून दूर ठेवले. लॉरेंझोने ऊस्मानी सम्राट मेहमेद दुसऱ्याशीही मित्रत्त्वाचे संबंध स्थापले. ऊस्मानी साम्राज्याशी समुद्रीमार्गी होत असलेल्या व्यापारातून मेदिची घराण्याच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली.[२६]
या शांतताकाळात लॉरेंझोने मेदिची घराण्याचा व फिरेंझेचा आर्थिक विकास करणे चालू ठेवले होते. या सुमारास तोस्कानामधील व्होल्तेरा येथे मोठ्या प्रमाणात तुरटी आढळू आली. काच बनविणे, कातडे कमविणे आणि वस्त्रोद्योगात वापरले जाणारे हे खनिज तोपर्यंत फक्त उस्मानी साम्राज्यातून, ते ही जिनोआच्या एकाधिकाराखाली आयात होत असे. १४६२मध्ये व्हॅटिकन सिटी आणि नंतर लॉरेंझोच्या मेदिची बँकेने यात शिरकाव केला. व्हॅटिकनमधून पोपने अधर्मीयांकडून (मुसलमान उस्मानी साम्राज्य) तुरटी आयात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे तोल्फा आणि व्होल्तेरामधील तुरटीला मोठा भाव मिळाला.[२७] या बदल्यात पोपने प्रति क्विंटल २ डुकाट कर घेणे सुरू केले. व्होल्तेराच्या नागरिकांना जेव्हा आपल्या प्रदेशातील तुरटीची किंमत कळली तेव्हा त्यांनी त्यातून मिळणारा पैसा फिरेंझेतील सावकार आणि रोममधील पोपकडे न जाता आपल्याच शहरात खर्च व्हावा अशी मागणी केली. फिरेंझेनी ही मागणी धुडकावून लावल्यावर व्होल्तेराने फिरेंझेपासून विभक्त होण्याचा प्रयत्न केला. या सशस्त्र उठावाविरुद्ध लॉरेंझोने भाडोत्री सैन्य धाडले. या सैन्याने व्होल्तेरामध्ये जाळपोळ केली आणि तेथील अनेक नागरिकांना मृत्युदंड दिला. लॉरेंझोने यानंतर व्होल्तेराला जाउन समझोता केला परंतु ही बाब त्याच्या व्यावसायिक आणि राजकारणी व्यक्तमत्वावरील गालबोट ठरले.[२८][२९]
कलाश्रय
[संपादन]लॉरेंझोने आपल्या दरबारात व मित्रवर्तुळात अनेक चित्रकार, शिल्पकार, लेखक, कवी आणि इतर कलाकारांना आश्रय दिला होता. ख्यातनाम होण्याआधीच लॉरेंझोने त्यांचे हुनर ओळखून त्यांना आर्थिक आणि इतर अनेक प्रकारे मदत केली. यांपैकी लिओनार्दो दा विंची, मिकेलेंजेलो बुओनारोती, पिएरो देल पोलैउओलो, अँतोनियो देल पोलैउओलो, आंद्रेआ देल व्हेरोक्कियो, सांद्रो बॉत्तिचेल्ली, दॉमेनिको घिर्लांदैयो या दिग्गजांनी इटली आणि पर्यायाने युरोपातील कलाक्षेत्रात क्रांती केली. युरोपातील रिनैसाँ घडवून आणणाऱ्या या मंडळींचा पुढील अनेक शतके जगभर प्रभाव आहे. त्यांच्यामागे खंबीरपणे उभा असलेल्या लॉरेंझोमुळे जगप्रसिद्ध कलाकृती तयार झाल्या. यांत मिकेलेंजेलोचा डेव्हिड, लिओनार्दोची अनेक चित्रे, रफायेलची कला, यांशिवाय असंख्य कृतींचा समावेश आहे. मिकेलेंजेलो तर तीन वर्षे लॉरेंझोच्या महालात त्याच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्यासारखा राहिला होता.
लॉरेंझोने स्वतः या कलाकारांकडून मोजक्याच कृती बनवून घेतल्या असल्या तरी आपले राजकीय आणि व्यावसायिक संबंध वापरून त्याने यांना अनेक धनाढ्य आणि शक्तिशाली लोकांकडून कामे मिळवून दिली.
लॉरेंझो स्वतः चित्रकार होता आणि त्याने आपल्या तोस्काना बोलीभाषेत कविता केल्या आहेत. यांत त्याने मानवी जीवनातील आनंदाबरोबरच दुःख, विषाद आणि अस्थिरता यांचे वर्णन केले आहे. विशेषतः त्याच्या आयुष्यातील उत्तरकाळातील कृतींमध्ये हे अधिक दिसून येते.[३०]
लॉरेंझोचे आजोबा कोसिमो यांनी पुस्तके गोळा करणे सुरू केले होते. यातून पुढे मेदिची ग्रंथालय (लॉरेंशियन ग्रंथालय) तयार झाले. लॉरेंझोने आपल्या हस्तकांकरवी पूर्वेतून अनेक दुर्मिळ पुस्तके आणवली. अशा पुस्तकांच्या असंख्य नकला करण्यासाठी त्याने कारागीर बसविले व या ज्ञानाचा युरोपभर प्रसार करविला. त्याने मार्सिलियो फिचिनो, पोलिझियानो आणि जियोव्हानी पिको देल्ला मिरांदोला यांसारख्या अनेक विचारवंतांच्या बैठका घडवून आणि त्यातून तयार झालेले तत्त्वज्ञान जतन करवून ठेवले.[३१]
दूरदर्शीपणाने आणि उदारहस्ताने मदत करून युरोपभर कला आणि ज्ञान पसरविल्यामुळे लॉरेंझोला महान (इल मॅग्निफिको) हे बिरुद मिळाले.
लॉरेंझोने आपल्याकडील कलाश्रितांना इतर राज्यकर्त्यांकडे पाठवून राजनैतिक संबंध दृढ केले. त्याने घिर्लांदैयो, बॉत्तिचेल्ली, पिएरो पेरुजिनो, कोसिमो रॉसेल्ली यांसारख्यांना सिस्टीन चॅपेलमधील भित्तिचित्रे रंगवण्यास स्वखर्चाने पाठविले. यामुळे पोप सिक्स्टस चौथा आणि फिरेंझेमधील वितुष्ट कमी होण्यास मदत झाली.[३१]
लॉरेंझोने १४७१मध्ये लावलेल्या अंदाजानुसार मेदिची घराण्याने कलाश्रयावर तोपर्यंत ६,३०,००० फ्लोरिन (२०२०मधील ३,८४० कोटी रुपये) खर्च केले होते. ही रक्कम पुढील २० वर्षे लॉरेंझो हयात असेपर्यंत अनेकपटींनी वाढली असल्याचा कयास आहे. याबद्दल लॉरेंझोने म्हणले आहे --
या (कला व ज्ञानप्रसारावर पैसे खर्च करण्याबद्दल) मला किंचितही खेद नाही. अनेकांना या मोठ्या रकमेतील काही भाग तरी आपल्या खिशातच रहावा असे वाटत असले तरीही. माझे असे मत आहे हा खर्च करणे हे आपल्या राज्याचा बहुमान आहे, आणि मला वाटते की हा पैसा योग्य ठिकाणीच खर्च झाला आणि याचा मला अत्यंत आनंद आहे.[३२]
१४७९मध्ये लॉरेंझो फिरेंझेच्या सिन्योरियाची पुनर्बांधणी करणाऱ्या समितीचा कायमी सदस्य झाला. या पदावरून त्याने सार्वजनिक कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कलाकृतींच्या निवडीत मोठा प्रभाव ठेवला.[३३]
कुटुंब
[संपादन]लॉरेंझो दे मेदिचीने क्लॅरिचे ओर्सिनीशी ७ फेब्रुवारी, १४६९ रोजी लग्न केले. नंतर ४ जून रोजी त्यांनी पुन्हा समक्ष लग्न केले. हे दोघेही समवयस्क होते जे त्याकाळच्या इटालियन समाजात नवलाईचे होते. त्यांचे लग्न क्लॅरिचेच्या मृत्यूपर्यंत टिकले.[३४] क्लॅरिचे ओर्सिनी घराण्याच्या याकोपो आणि माद्दालेना ओर्सिनी यांची मुलगी होती.
क्लॅरिचे आणि लॉरेंझो यांना १० मुले झाली:
- लुक्रेझिया मारिया रोमोला दे मेदिची (१४७०-१५५३).[३५] हिने याकोपो साल्व्हिआतीशी लग्न केले. त्यांच्या १० मुलांमध्ये कार्डिनल जियोव्हानी साल्व्हिआती, कार्डिनल बेर्नार्दो साल्व्हिआती, मारिया साल्व्हिआती (पहिल्या कोसिमो दे मेदिचीची आई) आणि फ्रांचेस्का साल्व्हिआती (पोप लिओ दहाव्याची आई) होते.
- दोन जुळी मुले. (मार्च १४७१मध्ये जन्मतःच मृत)
- पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची (१४७२-१५०३)).[३५] लॉरेंझोनंतरचा फिरेंझेचा शासक आणि फ्रांसची राणी कॅथेरीन दे मेदिचीचे आजोबा. याला कमनशिबी असे टोपणनाव होते.
- मरिया माद्दालेना रोमोला दे मेदिची (१४७३-१५२८) हिने फ्रांचेशेत्तो सिबो या पोप इनोसंट आठव्याच्या अनौरस मुलाशी लग्न केले. त्यांना ७ मुले झाली.
- काँतेस्सिना बेआत्रिस दे मेदिची. २३ सप्टेंबर, १४७४ रोजी जन्मतःच मृत[३६]
- जिओव्हानी दि लॉरेंझो दे मेदिची (१४७५-१५२१).[३५] १५१३मध्ये पोपपदावर बसला.[३७]
- लुइसा दे मेदिची (१४७७-१४८८)[३५] तथा लुइजा. हिचे लग्न जियोव्हानी दे मेदिची इल पोपोलानोशी ठरले होते परंतु ही लहानणीच मृत्यू पावली
- काँतेस्सिना अँतोनिया दे मेदिची (१४७८-१५१५).[३५] हिने पिएरो रिदोल्फीशी लग्न केले. यांच्या ५ मुलांमध्ये कार्डिनल निक्कोलॉ रिदोल्फी होता. हिचा जन्म पिस्तोरियामध्ये झाला होता.
- जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची (१४७९-१५१६)[३५] नेमूर्सचा ड्यूक.
यांच्यापैकी काँतेस्सिना अँतोनिया वगळता सगळ्यांचा जन्म फिरेंझेमध्ये झाला होता.
यांशिवाय लॉरेंझोने आपल्या भाऊ जुलियानोच्या अनौरस मुलाला दत्तक घेतले होते. जुलियो दि जुलियानो दे मेदिची (१४७८-१५३४) हा १५१७-१५२३ फिरेंझेचा शासक होता. त्यानंतर तो पोप क्लेमेंट सातवा या नावाने पोप झाला.[३८]
उतारवय आणि वारसा
[संपादन]लॉरेंझोच्या शेवटच्या वर्षांमध्येही तो राजकारण आणि व्यवसायात व्यस्त होता. त्याची ७ पैकी अनेक मुले स्वतः वेगवेगळ्या मार्गी लागलेली होती. त्याचा सगळ्यात मोठा मुलगा पिएरो वडीलांच्या मागे फिरेंझेचे शासन सांभाळण्यासाठी सज्ज होत होता. एका मुलीने पोप इनोसंट आठव्याच्या मुलाशी लग्न केलेले होते. ४ मुले कार्डिनल झाली व त्यांतील २ पुढे जाउन पोपपदी बसली होती.
लॉरेंझोची पत्नी क्लॅरिचे मृत्युशय्येवर असताना तो स्वतः खूप आजारी होता व तिच्या शेवटच्या दिवसांत तिच्यापासून लांब होता. तिच्या मृत्यूनंतर त्याने खच खाल्ली व त्याने हळूहळू राजकारण आणि व्यवसायातून अंग काढून घेण्यास सुरुवात केली.
याच सुमारास फिरेंझेच्या लोकांवर गिरोलामो साव्होनारोला या धर्मगुरुचा प्रभाव वाढला होता. त्याच्या मते ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्मापासून दूर जात होते व त्याकरता लॉरेंझो आणि त्याने आश्रय दिलेले कलावंत मोठ्या प्रमाणात जबाबदार होते. साव्होनारोला याला खुद्द लॉरेंझोनेच फिरेंझेला आणवला होता.[३९]
लॉरेंझोच्या मृत्युपश्चातच्या निष्कर्षांनुसार त्याला अॅक्रोमेगाली हा दुर्मिळ आजार होता. त्याच्या वर्णनावरून आणि त्याच्या अस्थि आणि मृत्युमुखवट्यावरील संशोधनावरून हे निष्कर्ष काढलेले आहेत.[४०]
लॉरेंझो ८ एप्रिल, १४९२ च्या रात्री आपल्या करेज्जी येथील महालात मृत्यू पावला.[४१] तो मृत्युशय्येवर असताना साव्होनारोला त्याला भेटायला गेला होता. त्यानंतर अफवा होती की साव्होनारोलाने लॉरेंझोला मरताना नरकात जाण्याचा शाप दिला होता. परंतु रोबेर्तो रिदोल्फीच्या व्हिता दि गिरोलामो साव्होनारोला या पुस्तकानुसार हे खरे नाही. लॉरेंझोच्या मृत्यूच्या वेळी हजर असलेल्या व्यक्तींनी लिहिल्यानुसार लॉरेंझोने ८ एप्रिलचे धार्मिक संगीत ऐकले व त्यानंतर तो रात्रीत मृत्यू पावला.[४२] त्याच्या मृत्यूच्या क्षणी अनेक अपशकुन झाल्याचे सांगितले जाते, जसे कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरेच्या घुमटावर वीज कोसळणे, अनेक ठिकाणी भूत दिसणे, इ.[४३]
लॉरेंझोला बेसिलिका दि सान लॉरेंझो येथे त्याचा भाऊ जुलियानो याच्या शेजारी दफन करण्यात आले. अनेकदा लॉरेंझो आणि जुलियानो यांना सार्जेस्तिया नुओव्हा येथे त्यांच्या नावाने दफन केल्याचे समजले जाते परंतु त्या ठिकाणी तीच नावे असलेल्या वेगळ्या व्यक्ती आहेत -- उर्बिनोचा ड्यूक लॉरेंझो दे मेदिची आणि नेमूर्सचा ड्यूक जुलियानो दे मेदिची.[४४] १५५९मध्ये थोरल्या लॉरेंझो आणि जुलियानोचे अवशेष सार्जेस्तिया नुओव्हामध्ये मिकेलेंजेलोने रचलेल्या मडोन्नाच्या शिल्पाखाली निनावी कबरींमध्ये हलविण्यात आले.[४४]
लॉरेंझोच्या मृत्यूनंतर पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची (कमनिशिबी पिएरो) या त्याच्या सर्वात मोठ्या मुलाने फिरेंझेची सत्ता आणि व्यवसाय हाती घेतला. दोनच वर्षांत दोन्ही गोष्टी त्याच्या हातातून गेल्या. लॉरेंझोचा दुसरा मुलगा जियोव्हानी लिओ दहावा नावाने पोप झाला व त्याने स्पेनच्या राजाशी संधान बांधून १५१२मध्ये फिरेंझे काबीज केले.[४५] लॉरेंझोचा दत्तक मुलगा जुलियो दि जुलियानो हा क्लेमेंट सातवा नावाने पोप झाला आणि त्याने अलेस्सांद्रो दे मेदिचीच्या हाती फिरेंझेची सत्ता देउन आपल्या घराण्याची फिरेंझेच्या प्रजासत्ताकावरील पकड पुन्हा मिळवली.[४६]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Kent, F.W. लॉरेंझो दे मेदिची अँड द आर्ट ऑफ मॅग्निफिसन्स (इंग्लिश). USA. p. 248.
- ^ Parks, Tim (2008). "Medici Money: Banking, Metaphysics, and Art in Fifteenth-Century Florence". The Art Book. New York: W.W. Norton & Co. 12 (4): 288. doi:10.1111/j.1467-8357.2005.00614.x. ISBN 9781847656872.
- ^ "Fact about Lorenzo de' Medici". 100 Leaders in world history. Kenneth E. Behring. 2008. 27 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 November 2008 रोजी पाहिले.
- ^ Kent, F. W. (1 February 2007). Lorenzo De' Medici and the Art of Magnificence. The Johns Hopkins Symposia in Comparative History. USA: JHU Press. pp. 110–112. ISBN 978-0801886270.
- ^ Brucker, Gene (21 March 2005). Living on the Edge in Leonardo's Florence. Berkeley: University of California Press. pp. 14–15. doi:10.1177/02656914080380030604. ISBN 9780520930995. JSTOR 10.1525/j.ctt1ppkqw. S2CID 144626626.
- ^ Hugh Ross Williamson, Lorenzo the Magnificent, Michael Joseph, (1974), आयएसबीएन 07181 12040.
- ^ Milligan, Gerry (26 August 2011). "Lucrezia Tornabuoni". Renaissance and Reformation. Oxford Bibliographies. Oxford University Press. doi:10.1093/OBO/9780195399301-0174. ISBN 9780195399301. 25 February 2015 रोजी पाहिले.
- ^ Hugh Ross Williamson, p. 67
- ^ Durant, Will (1953). The Renaissance. The Story of Civilization. 5. New York: Simon and Schuster. p. 110.
- ^ Poliziano, Angelo (1993). The Stanze of Angelo Poliziano. University Park, Pa.: Pennsylvania State University Press. pp. x. ISBN 0271009373. OCLC 26718982.
- ^ Christopher Hibbert, chapter 9
- ^ Davie, Mark (1989). "Luigi Pulci's Stanze per la Giostra: Verse and Prose Accounts of a Florentine Joust of 1469". Italian Studies. 44 (1): 41–58. doi:10.1179/007516389790509128.
- ^ Machiavelli, Niccolò (1906). The Florentine History. 2. London: Archibald Constable and Co. Limited. p. 169.
- ^ निक्कोलो माक्याव्हेल्ली, History of Florence, Book VIII, Chap. 7.
- ^ Hugh Ross Williamson, p. 70
- ^ Janet Ross. "Florentine Palaces & Their Stories". 14 August 2016. Page 250.
- ^ Walter, Ingeborg (2013). "Lorenzo der Prächtige: Mäzen, Schöngeist und Tyrann" [Lorenzo the Magnificent: Patron, Aesthete and Tyrant]. Damals (जर्मन भाषेत). Vol. 45 no. 3. p. 32.
- ^ a b Reinhardt, Volker (2013). "Die langsame Aushöhlung der Republik" [The Slow and Steady Erosion of the Republic]. Damals (जर्मन भाषेत). Vol. 45 no. 3. pp. 16–23.
- ^ Guicciardini, Francesco (1964). History of Italy and History of Florence. New York: Twayne Publishers. p. 8.
- ^ a b c Thompson, Bard (1996). Humanists and Reformers: A History of the Renaissance and Reformation. William B. Eerdmans Publishing Company. pp. 189 ff. ISBN 0-8028-6348-5.
- ^ Jensen, De Lamar (1992). Renaissance Europe: Age of Recovery and Reconciliation. Lexington, Mass: D.C. Heath and Company. p. 80.
- ^ Durant, Will (1953). The Renaissance. The Story of Civilization. 5. New York: Simon and Schuster. p. 125.
- ^ Busi, Giulio (31 October 2016). Lorenzo de' Medici (इटालियन भाषेत). Mondadori. ISBN 978-88-520-7722-7.
- ^ Hancock, Lee (2005). Lorenzo de' Medici: Florence's Great Leader and Patron of the Arts. The Rosen Publishing Group, Inc. p. 57. ISBN 1-4042-0315-X.
- ^ Martines, Lauro (2003). April Blood: Florence and the Plot Against the Medici. Oxford University Press.
- ^ Inalcik, Halil (2000). The Ottoman Empire: The Classical Age 1300–1600. London: Orion Publishing Group. p. 135. ISBN 978-1-84212-442-0.
- ^ de Roover, Raymond (1963). The Rise and Decline of the Medici Bank, 1397–1494. Harvard University Press. pp. 152–154.
- ^ Machiavelli, Niccolò (1906). The Florentine History. 2. London: Archibald Constable and Co. Limited. pp. 197–198.
- ^ Durant, Will (1953). The Renaissance. The Story of Civilization. 5. New York: Simon and Schuster. p. 112.
- ^ La Poesia di Lorenzo di Medici | The Poetry of Lorenzo di Medici- Lydia Ugolini; Lecture (1985); Audio
- ^ a b Schmidt, Eike D. (2013). "Mäzene auf den Spuren der Antike" [Patrons in the footsteps of Antiquity]. Damals (जर्मन भाषेत). 45 (3): 36–43.
- ^ Brucker, G., ed. (1971). The Society of Renaissance Florence: A Documentary Study. New York: Harper & Row. p. 27.
- ^ E. B. Fryde, Humanism and Renaissance Historiography (London, 1983), 137
- ^ Pernis, Maria Grazia (2006). Lucrezia Tornabuoni de' Medici and the Medici family in the fifteenth century. Laurie Adams. New York: Peter Lang. ISBN 0-8204-7645-5. OCLC 61130758.
- ^ a b c d e f Tomas, Natalie R. (2003). The Medici Women: Gender and Power in Renaissance Florence. Aldershot: Ashgate. pp. 7, 21, 25. ISBN 0754607771.
- ^ Wheeler, Greg (9 July 2020). "Piero de Medici (the Unfortunate) Timeline 1472-1503". TheTimelineGeek (इंग्रजी भाषेत). 9 May 2023 रोजी पाहिले.
- ^ J.N.D. Kelly, The Oxford Dictionary of Popes (Oxford 1986), p. 256.
- ^ "Catholic Encyclopedia: Pope Clement VII". www.newadvent.org.
- ^ Donald Weinstein, Savonarola: The Rise and Fall of a Renaissance Prophet (New Haven, 2011) Chap. 5: The Magnificent Lorenzo
- ^ Lippi, Donatella; Charlier, Philippe; Romagnani, Paola (2017). "Acromegaly in Lorenzo the Magnificent, father of the Renaissance". The Lancet. 389 (10084): 2104. doi:10.1016/S0140-6736(17)31339-9. PMID 28561004. S2CID 38097951.
- ^ Cuvier, Georges (24 October 2019). Cuvier's History of the Natural Sciences: Nineteen lessons from the Sixteenth and Seventeenth Centuries. Publications scientifiques du Muséum. p. 474. ISBN 9782856538739.
- ^ Drees, Clayton J. (2001). The Late Medieval Age of Crisis and Renewal, 1300–1500: A Biographical Dictionary. Greenwood Publishing Group. p. 347. ISBN 9780313305887.
- ^ Hugh Ross Williamson, p. 268.
- ^ a b Hugh Ross Williamson, p. 270-80
- ^ "History of the Medici". History World.
- ^ "Alessandro de' Medici (1510–1537) • BlackPast". 9 December 2007.