Jump to content

रानधोबी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रानधोबी

रानधोबी (इंग्रजी: Forest Wagtail) हा मोटॅसिलिडे या धोबी कुळातील पक्षी आहे. त्यांचा विशिष्ट असा पिसारा इतर धोबी पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे आणि ते शेपटी सुद्धा इतर पक्ष्यांप्रमाणे उभी न हलवता आडवी हलवतात.

रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा रंग तपकिरी असतो. भुवया आणि डोळ्यांभोवतिची कडी पांढरट असते. काळ्या पंखांवर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटीवरील भाग काळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा पांढऱ्या असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. छातीचा वरचा भाग काळा आणि खालच्या भागात तुटक काळा पट्टा असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य भारतीय पर्वतीय प्रदेशात राहतात. पश्चिम घाटात महाबळेश्वरपासून दक्षिणेकडे केरळ आणि पश्चिम तामिळनाडू, तसेच श्रीलंका आणि अंदमान बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, कॉफीची लागवड, तसेच बांबूमिश्रित जंगले या ठिकाणी आढळतो.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली