रमण गंगाखेडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. रमण गंगाखेडकर (M.B.B.S., DCH, M.P.H.) (जन्म : १९५९) हे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. ३० जून २०२० रोजी ते सेवानिवृत्त झाले. [१]त्यांना २०२० साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

बालपण आणि शिक्षण[संपादन]

गंगाखेडकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड जिल्ह्यातील बिलोली या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ते दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. त्यानंतर धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बीएससीचे पहिले वर्ष झाल्यावर त्यांनी अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिथे एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच त्यांनी पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[२]

कारकीर्द[संपादन]

शिक्षण पूर्ण झाल्यावर गंगाखेडकर यांनी हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेत काम केले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ      इम्युनोहिमेटॉलॉजीमध्ये काम केले. काही काळ त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (नारी) येथे संचालक पदावर त्यांनी काम केले.

काम केले.[३] पुण्यातील गाडीखाना रुग्णालयात काम करत असताना १९९६ मध्ये त्यांनी ‘महिलांमधील एड्सचा संसर्ग’ या विषयावर शोधनिबंध प्रसिद्ध केला.तसेच १९९८ मध्ये आईकडून बालकाकडे होणारे एड्सचे संक्रमण या विषयी संशोधन केले. [४]

पुढे त्यांनी नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेत काम करण्यासाठी सुरुवात केली. ते या संस्थेत साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. [४] २०२० मधील करोना विषाणूच्या महासाथीमध्ये या रोगाशी लढण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांनी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.

पुरस्कार[संपादन]

वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील गंगाखेडकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इ.स. २०२० सालचा पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[४][५]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "देश को कोरोना की हर जानकारी देने वाले ICMR के वैज्ञानिक रमण गंगाखेडकर आज हो जाएंगे रिटायर". livehindustan.com (hindi भाषेत). 2020-07-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "कोरोनाच्या लढ्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांनी फडकवला नांदेडचा झेंडा... | eSakal". www.esakal.com. 2020-07-17 रोजी पाहिले.
  3. ^ "लोकाभिमुख शास्त्रज्ञ". Maharashtra Times. 2020-07-17 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "सय्यदभाई आणि डॉ. गंगाखेडकर या दोन पुणेकरांना पद्मश्री! | eSakal". www.esakal.com. 2020-07-17 रोजी पाहिले.
  5. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. Archived from the original on 2021-11-08. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.