रघुवीर गोविंद चिमुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रघुवीर चिमुलकर
पूर्ण नावरघुवीर गोविंद चिमुलकर
जन्म १९०४ (किंवा १९०५)
मृत्यू १९४८
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रकला, कलाअध्यापन
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई

रघुवीर गोविंद चिमुलकर (१९०४ / १९०५ - १९४८) हे गोमंतकीय चित्रकार होते. भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीतील चित्रे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

जीवन[संपादन]

चिमुलकरांचा जन्म १९०४ (किंवा १९०५) साली गोव्यातील वड्डे, कांदोळी-बारदेस या गावी झाला. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. थोरला मुलगा अनंत, त्यापाठचा रघुवीर व धाकटी मुलगी विजया यांना घेऊन चिमुलकरांची आई मुंबईत चिमुलकरांच्या मावशीकडे - 'दांडे' कुटुंबाकडे आश्रयास आली. परंतु अल्पावधीतच चिमुलकरांची आईही मरण पावली. चिमुलकरांचे थोरले बंधू अनंत यांनी आपल्या नोकरीच्या मिळकतीतून आपल्या दोन्ही धाकट्या भावंडांची जबाबदारी वाहिली. त्यांनीच दोन्ही भावंडाचे शिक्षण व बहिणीचे लग्न करून दिले.
चिमुलकर गिरगावातील चिकित्सक समूहाच्या शाळेत शिकले. शाळेतील अभ्यासात हुशार असलेल्या चिमुलकरांनी इंग्रजी पाचव्या इयत्तेत असताना १९२० सालातल्या असहकार चळवळीच्या शाळा-कॉलेजांवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत चळवळीत सहभाग घेतला. चळवळीचा काळ सरल्यानंतर काही दिवसांत शाळा पुन्हा सुरू झाली व चिमुलकरांनाही वर्गात येण्याची अनुमती मिळाली. परंतु चिमुलकरांचे मन शालेय शिक्षणावरून उडाले. या काळात त्यांच्या घराजवळच राहणाऱ्या अनंत वामन घोटींग नावाच्या गोमंतकीय चित्रकाराच्या सहवासात त्यांच्या मनी चित्रकलेचे आकर्षण रुजले. चित्रकलेबद्दल त्यांची ओढ लक्षात घेत त्यांच्या मावशीच यजमान दांडेमास्तर व चित्रकार घोटींग यांनी त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या कलाविद्यालयात घातले. १९२४-१९२९ दरम्यान त्यांनी जे.जे. कलाविद्यालयात चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेत डिप्लोमाचा अभ्यासक्रम पुरा केला[१]. कलाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यासाठी दिले जाणारे 'मेयो पदक' १९३२ साली चिमुलकरांना बहाल करण्यात आले.

१९३१-१९४० सालांदरम्यान त्यांनी स्वतंत्र चित्रनिर्मिती केली. त्यांच्या चित्रांना मुंबई, पुणे, दिल्ली, सिमला, म्हैसूर येथील चित्रप्रदर्शनांत बक्षीसेही मिळाली. ऑगस्ट २७, १९३९ रोजी मुंबईत गिरगावातल्या पाववाला स्ट्रीट येथील गायकवाड बिल्डिंगमध्ये त्यांनी चित्रकलेचे शिकवणीवर्ग उघडले. अल्पावधीतच हे वर्ग विद्यार्थिप्रिय ठरले व विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी वाढू लागली. वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 'कमला' नावाची, चित्रकलेत हुशार असलेली एक सुस्वरूप विद्यार्थिनी येत असे. चिमुलकरांच्या मार्गदर्शनाखाली तिची चित्रकलेत उत्तम प्रगती होऊ लागली. या काळात दोघांनाही एकमेकांबद्दल आत्मीयता वाटू लागली. परंतु त्यांच्या प्रेमाची परिणती लग्नात होऊ शकली नाही. चिमुलकरांनी या संदर्भात पुढाकार घेतला नाही आणि तत्कालीन सामाजिक बंधनांच्या पार्श्वभूमीवर कमलेलाही भावना व्यक्त करणे शक्य झाले नसावे. मनात दबलेले अव्यक्त प्रेम व ते प्राप्त न होण्याची खंत यामुळे चिमुलकरांच्या मनावर विपरीत परिणाम झाला. मनातल्या मनात झुरण्याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की १९४० सालाच्या उत्तरार्धात ते भ्रमिष्टासारखे वागू लागले. हळूहळू त्यांचे शिकवणीवर्गही होईनासे झाले. चिमुलकरांचे वेड काळागणिक वाढत गेले. या काळातही त्यांच्या हातून थोडी चित्रनिर्मिती घडली. या काळातल्या त्यांच्या चित्रांमध्ये त्यांच्या मनस्थितीचे प्रतिबिंब पडल्यासारखे वाटते.
एप्रिल, १९४७मध्ये चिमुलकरांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. एव्हाना मानसिकदृष्ट्या खचलेल्या चिमुलकरांची प्रकृतीही ढासळली होती. १९४८ सालाच्या आरंभी वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी चिमुलकर प्लूरसीच्या विकाराने[२] दगावले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ 'नियतीचा विलक्षण खेळ आणि दोन चित्रकार', ले.: सुहास बहुळकर, 'दीपावली' २००९ दिवाळी अंक, पृ.: ८-१७ व २१८-२२८
  2. ^ 'महाराष्ट्रातील कलावंत : आदरणीय आणि संस्मरणीय', ले.: बाबुराव सडवेलकर; प्र.: ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे, प्र.व.: इ.स. २००५, ISBN : 81-7925-120-9

बाह्य दुवे[संपादन]