मोरेश्वर सावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोरेश्वर दीनानाथ सावे (१४ फेब्रुवारी, इ.स. १९३१:चिंचणी-ठाणे, महाराष्ट्र - १६ जुलै, इ.स. २०१५:औरंगाबाद, महाराष्ट्र) हे लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले खासदार होते.

शिक्षण आणि राजकीय कारकीर्द[संपादन]

मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वॉर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात त्याच महापालिकेत महापौर बनले. त्‍यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले.

हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांनी भूमिगत राहून सक्रिय सहभाग घेतला होता.

बाबरी मशीद प्रकरणात ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते.

महापौरांची शिस्त[संपादन]

मोरेश्वर सावे हे त्यांच्या शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. ते महापौर असताना त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊ दिला नाही. कारण एक दिवस आधीच सदस्यांच्या प्रश्नांची ते यादी घेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात बोलण्याची परवानगी नव्हती. अवांतर विषयावर बोलण्यासही मनाई होती. इतकेच काय, महापौरांच्या दालनात कोणीही केव्हाही यायचे नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापौरांचे दालन उघडे असले तरी काम असेल तरच या, असा थेट कायदाच त्यांच्या काळात होता, असे म्हणतात.[ संदर्भ हवा ] राजकारणात शिस्तीत जगता येते, असे त्यांनी दाखवून दिले होते. ते स्वतः शिस्तीत वागत असल्याने त्यांच्या आदेशापुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांच्यानंतर शिस्तीचा भोक्ता असा महापौर शहराला लाभला नाही असे अनेकांचे मत आहे.[ संदर्भ हवा ]

सांस्कृतिक कार्य[संपादन]

मोरेश्वर सावे यांचे औरंगाबादच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातही मोलाचे योगदान राहिले.

सावे हे औरंगाबाद बुद्धिबळ संघटनेचे, नादब्रह्म या सांस्कृतिक संघटनेचे आणि मराठवाडा सिनेमा एक्झिबिटर्स असोशिएनचे अध्यक्ष होते.

उद्योगक्षेत्र[संपादन]

सावे यांनी औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. ते सवेरा उद्योगसमूहाचे अध्यक्ष होते. ते चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे १९८५ ते ८७ या काळात उपाध्यक्ष तर १९८७-८९ या काळात अध्यक्ष होते.

कौटुंबिक[संपादन]

मोरेश्वर सावे यांच्या पत्‍नीचे नाव लीलावती. अनिल, अजित व आमदार अतुल सावे ही तीन मुले आणि अंजली ही त्यांची विवाहित कन्या होय.