मूलपेशी
मूलपेशी (इंग्लिश: Stem cell) या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणाऱ्या पेशी असतात. मायटॉसिस पेशीय विभाजनाद्वारे स्वतःची पुनर्निर्मिती करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मूलपेशींमध्ये असतो. शिवाय सजातीय पेशीप्रकारांपेक्षा वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पेशींच्या ठायी असते. गर्भातून मिळवलेल्या मूलपेशींपासून नंतर कुठलाही अवयव तयार करता येतो. त्यामुळे नाळेचे रक्त साठवण्याची काळजी काही पालक घेतात. वैज्ञानिकांनी उंदरांच्या शरीरात इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या बीटा इसलेट पेशी मानवी वृषणाच्या पेशींपासून तयार करण्यात यश मिळवले आहे.
मूळ पेशी या अशा पेशी असतात, की ज्यांच्यामध्ये विभाजन होऊन विविध प्रकारच्या नव्या पेशी आणि ऊतींची निर्मिती होऊ शकते. बहुपेशीय सजीवांमध्ये या पेशी आढळतात. थोडक्यात सांगायचे, तर मूळ पेशी या शरीराच्या ‘मास्टर’ पेशी असतात आणि त्यापासून सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती करणे शक्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये मूळ पेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार भ्रूण मूळ पेशी (एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स). या पेशी भ्रूणापासून (एम्ब्रियो) मिळवलेल्या असतात. दुसरा प्रकार असतो पूर्ण वाढ झालेल्या पेशी (अॅडल्ट किंवा आयपीएस सेल्स). या पेशी त्वचा, हाडाचा गाभा किंवा रक्तापासून मिळवून त्यांचे मूळ पेशींत रूपांतर करण्यात येते.
मूळ पेशींच्या अंगच्या नवनिर्मितीच्या विशेष क्षमतेमुळे त्यांचा उपयोग गंभीर आजारांवर उपचारांसाठी किंवा नवे अवयव, स्नायू किंवा शरीरातील काही भागांच्या निर्मितीसाठी करता येतो. त्यामुळे स्वतःच्याच शरीरातील काही पेशींपासून पेशंटच्या शरीरावर उपचार करता येऊ शकतात. म्हणूनच आता ‘पर्सनलाइज्ड मेडिसीन’चे युग येऊन ठेपले असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
आक्षेप
[संपादन]हे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणे हे फार मोठे आव्हान आहे. यात नैतिकतेचे मुद्दे आहेत. महत्त्वाचे म्हणजे गर्भातील पेशींचा वापर यासाठी करू नये कारण एक प्रकारे ती भ्रूणहत्याच आहे असे मानणारा एक वर्ग आहे.. त्यामुळेच प्रौढ पेशींपासून मूलपेशी तयार करण्यात आणखी सहजता आली तर हा मुद्दा गैरलागू ठरेल कारण रुग्णाच्याच पेशी वापरून मूलपेशी भविष्यात तयार करता येतील.
या शोधामुळे मानवासह विविध प्राण्यांमध्ये विविध पेशीसमूहांची (ऊती किंवा टिश्यू) निर्मिती करणे शक्य होणार आहे. धक्का लागलेल्या पेशी बदलणे; तसेच गरजूंसाठी नव्या अवयवांची निर्मिती करण्यासाठी या नव्या तंत्राचा उपयोग होऊ शकेल. भ्रूणाचा विकास होऊन सजीव तयार होणे हा निसर्गनियम आहे; मात्र या नव्या प्रयोगात ते चक्र उलटे फिरले असून, पूर्ण विकसित झालेल्या सजीवाच्या पेशीपासून भ्रूणनिर्मिती होऊन त्यापासून पुन्हा नव्या पेशींची निर्मिती करता येऊ शकेल.
Source : https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/imouse/stemcells/