Jump to content

मुक्ता साळवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मूक्ता साळवे या पानावरून पुनर्निर्देशित)

मुक्ता साळवे या लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी, ह्या एक मातंग समाजातली महिला होत्या. मुक्ता साळवे यांचा जन्म ०५ जानेवारी १८४० साली पुण्यात झाला. इ.स. १८४८ साली जोतिबा फुले आणि त्यांची पत्‍नी यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी होती. सावित्रीबाई फुले या तिच्या पहिल्या शिक्षिका. मुक्ताचा ज्ञानोदय या मासिकामध्ये १ मार्च १८५५ला "मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध" प्रकाशित झाला होता.

निबंधातील आशय[संपादन]

मुक्ता साळवेने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे व भाषा आजही विचार करायला लावणारी आहे. ब्राम्हणांच्या धार्मिक लबाडीबद्दल बोलताना ती म्हणते, 'ब्राम्हण लोक म्हणतात की, इतर जातींनी वेद वाचू नयेत. याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग!'

शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञातिबांधवांना शिक्षण घेण्याचे आवाहन या निबंधात केले आहे. ती म्हणते, 'अहो दारिद्ऱ्याने पिडलेले मांगमहार लोकहो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा.

दलित जातींवरील गुन्हेगारीच्या शिक्क्याविषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते. तिने मांगमहार स्त्रियांच्या दुःखाबद्दलही लिहिले आहे.. मांग-महार स्त्रिंयाच्या वाटयाला येणारे दुःख किती भयंकर असते याच्या विदारक वास्तवाचे वर्णन करताना 'त्या स्त्रियांना कसे उघडयावर बाळंत व्हावे लागते, त्यावेळी त्यांना किती यातना सहन कराव्या लागतात' याचे वर्णन तिने केले आहे..

मुक्ता साळवेंची साहित्य, नाट्य आणि इतर क्षेत्रांत घेतली गेलेली दखल[संपादन]

प्रा. हरी नरके यांनी मुक्ता साळवेंला आद्य दलित लेखिका म्हटले आहे.सत्यशोधक" या अतुल पेठे दिग्दर्शित गो.पु. देशपांडे लिखित नाटकात मुक्ता साळवेंची भूमिका रेखाटली गेली आहे.

एकपात्री[संपादन]

  • मी मुक्ता साळवे बोलतेय - (सादरकर्त्या श्रुती तोरडमल)

संदर्भ[संपादन]