मुस्लिम मराठी साहित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
F. M. Shahajinde Speak to Muslim Marathi sahitya Samelan Pune 2019

मराठी भाषेत मुस्लिम कवी-लेखकांनी लिहिलेले साहित्य म्हणजे'मुस्लिम मराठी साहित्य'होय. या मराठी साहित्याला ३०० वर्षांचा इतिहास आहे.[ संदर्भ हवा ] तेराव्या आणि चौदाव्या शतकापासून मुस्लिम संतांनी मराठीतून साहित्य निर्मिती केल्याचे अनेक पुरावे मिळतात.[ संदर्भ हवा ] रा.चिं. ढेरे यांनी मुसलमान मराठी संतकवी या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.[ संदर्भ हवा ] तसेच फकरुद्दीन बेन्नूर यांचे मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप या पुस्तकात आधुनिक मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा इतिहास नोंदवला आहे.[१]

तेराव्या शतकात दखनी भाषेसोबत मुस्लिम मराठी साहित्याचा विकासदेखील झालेला आहे.[ संदर्भ हवा ] तेराव्या शतकापासून संत शेख महंमद, शाह मुंतोजी इत्यादी असे जवळजवळ ५० मुस्लिम-मराठी संत, कवी होऊन गेले आहेत.[ संदर्भ हवा ] आधुनिक काळात अमर शेख, बशीर मोमीन (कवठेकर) यांच्यासारखे अनेक लोक शाहीर घेऊन गेले आहेत. बशीर मोमीन कवठेकर यांनी मराठी भाषेत लावणी, वगनाट्य, नाटक, धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली आहेत. हुंडाबंदी, दारूबंदी, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी लेखन करीत त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले.[२]व्यसनमुक्ती, राष्ट्रीय साक्षरता अभियान, ग्राम स्वछता अभियान यासारख्या शासकीय चळवळी मध्ये सुद्धा त्यांनी हिरहिरीने भाग घेतला आणि आपल्या कलापथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे.[३][४][५][६]एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातही मुस्लिम-मराठी साहित्य लिहिले जात आहे.[७]

१९३६ पासून सांगलीचे सय्यद अमीन यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य’ हा शब्द प्रयोग केला होता.[८] कोकण विभागातील डझनावारी मुस्लिम लेखकांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके लिहिली आहेत.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ग्रामीण भागांतून मराठीतून भक्तिगीते, ओव्या आणि अभंग लिहिणारे ४९ मुस्लिम मराठी कवी होऊन गेले होते.[ संदर्भ हवा ] कोकणात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कोकणी मुसलमान मराठीतून लिहीत होते.[ संदर्भ हवा ] कॅप्टन फकीर महंमद जुळवे, हुसेनमियाँ माहिमकर, अबू काझी, परवेज नाईकवडे, बशीर सावकारपासून ते कवी खावर, अजीज हसन, मुक्री इत्यादींचे लिखाण प्रकाशित होते.[ संदर्भ हवा ]

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या पुढाकारने १९८९ साली मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची सुरुवात झाली.[ संदर्भ हवा ] आधुनिक शिक्षण घेतलेल्या मुस्लिम-बहुजनांची १९८० च्या दशकापासून मानसिक कोंडीतून मोठी घुसमट होत होती; दमकोंडी होत होती. मुस्लिम-बहुजन समाज घरीदारी दखनी आणि घराबाहेर मराठी भाषेतून व्यवहार करीत होता.[ संदर्भ हवा ] ठिकठिकाणी काही मुस्लिम-बहुजन लेखक मराठी वाङ्मयाची निर्मिती करीत होते. त्यांचाही भवतालच्या मुस्लिमविरोधी विद्वेषी वातावरणाने गुदमरत होत होता. अशा तगमगीतून सोलापूर येथील प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. अजीज नदाफ, पत्रकार नल्लामंदू, कवी मुबारक शेख यांच्या मनात संमेलन घेण्याचे आले.[ संदर्भ हवा ]

१९९० साली सोलापूर येथे पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक लेखक एकत्र आले. मनात साचलेला, तुंबून राहिलेला जो भावकल्लोळ होता तो संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, यासाठी हे संंमेलन भरते.[९]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]