Jump to content

मुलाखत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजे मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी त्यासाठीची योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजे मुलाखत होय.

प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारून व निरीक्षणे नोंदवून समोरील व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चार-चौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो ती व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकते.[ संदर्भ हवा ] अश्या मुलाखतींमध्ये आत्मविश्वासपूर्वक उत्तरे देणे अपेक्षित असते.

मुलाखतीचे प्रकार[संपादन]

राजकीय मुलाखत रेडिओवरील मुलाखत दूरध्वनीवरील मुलाखत नोकरी विषयक मुलाखत

नोकरी विषयक मुलाखत[संपादन]

नोकरी विषयक मुलाखती मध्ये पुढील बाबी तपासल्या जातात.

 • हुशारी
 • चाणाक्षपणा
 • लवचिकता
 • इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
 • भावनिक सक्षमता

नेमण्यात येणाऱ्या कामाचे अधिकारपद देण्यापूर्वी उमेदवार ती भूमिका बजावण्यास लायक आहे की नाही हे जाणून घेतले जाते. बौद्धिक, मानसिक आणि कौशल्यवृद्धीची आवड मुलाखतीत दिसून आल्यास निवडीची शक्यता असते.

स्वरूप[संपादन]

मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. ह्यामुळे मुलाखतही सहजतेने होते. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात ते जास्त चांगल्या प्रकारे आपल्याबद्दल सांगू शकतात. मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित जाणणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केला आहे त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आले पाहिजे. मुलाखतीत संभ्रम निर्माण करणारे प्रश्न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपूर्वक देतो त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचे निरीक्षण मुलाखत घेणारा करत असतो. उमेदवाराची कठीण परीक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वात चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखतकर्त्यावर असते. म्हणून त्या जागेकरिता 'मीच कसा योग्य आणि उपयुक्त आहे' हे कळत नकळतपणे मुलाखत देणाऱ्याने दाखवून द्यायचे असते.[ संदर्भ हवा ]

मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्र[संपादन]

 • स्वतःबद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा.
 • हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसऱ्या चेहऱ्याची सवय करा.
 • योग्य व्यावसायिक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
 • ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
 • मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा. ताण कमी होईल.
 • तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्यामध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
 • मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
 • मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
 • प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा, यात काही चुकीचे नाही.
 • मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
 • मुलाखतीनंतर विनम्रतेने आभार माना .

व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वतःचे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःचा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी अद्ययावत करत राहणे गरजेचे असते.

मुलाखतीतले सामान्य प्रश्न[संपादन]

 • तुमच्याबद्दल काही सांगा?

(टेल मी समथींग अबाऊट युअरसेल्फ) या विशेष प्रश्नाकरता बायोडाटा व्यतिरिक्त या नोकरीकरिता उपयुक्त असणारे स्वतबद्दल तुम्ही काय सांगू शकता, हे पाहिले जाते. या प्रश्नाची तयारी करण्यासाठी वारंवार याचे उत्तर देण्याची तयारी करा.

 • इथे का काम करायचे आहे? नेमकी कारणे द्या. त्यात अजून चांगला अनुभव आणि संस्थेसोबत स्वतःची प्रगती असेही सांगता येते.
 • पगाराची काय अपेक्षा आहे? - मोकळेपणाने अपेक्षा सांगा. येथे लाजू नका.
 • तुमच्या खुबी आणि तुमच्या कमतरता कोणत्या? - कोणतेही काम वेळेवर आणि परिपूर्ण करणे, कामाकडे लक्ष देणे, नवनवीन गोष्टी शिकणे, कंपनीच्या पद्धतींचा अभ्यास करण्याची हातोटी असणे, साध्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी समजावता येणे, फोनवर सहजतेने बोलता येणे अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. कमतरता सांगताना त्यातही चलाखीने खुबीच सांगा - जसे की, 'मला कोणतेही काम पूर्ण करायला आवडते त्यामुळे मला पर्फेक्शनिस्ट मानले जाते. अर्थातच मी कामाचा जरा ताण घेतो.'
 • अगोदरची नोकरी का सोडत आहात? - जे कारण आहे ते स्पष्टपणे द्या. वेळ कुणावरही आलेली असते.

संस्थेला किंवा कंपनीकरिता तुमचे योगदान काय असेल हे योग्यपणे सांगितले तर चांगले गुण प्राप्त होतात.
वरील मुद्द्यांचा उपयोग केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी परीक्षांमध्येही होऊ शकतो. अशा मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे या विषयक दृष्टिकोन व भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्यांला समकालीन बाबींची जाण व स्वतःची स्पष्ट भूमिकादेखील असावी लागते. विद्यार्थी समन्यायी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही ते पाहिले जाते. अर्थात विद्यार्थ्यांची देहबोली, भाषा, संवादकौशल्य, विचारातील स्पष्टता, आत्मविश्वास या बाबी मुलाखतीत महत्त्वाच्या ठरतात. बोलण्याचा भरपूर सराव, गटचर्चा, अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी करता येते.[ संदर्भ हवा ]

उद्दिष्टे[संपादन]