मीहाईल एमीनेस्कू
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मीहाईल एमीनेस्कू (१५ जानेवारी १८५० – १५ जून १८८९). श्रेष्ठ रूमानियन स्वच्छंदतावादी कवी, कादंबरीकार, पत्रकार. रूमानियन साहित्यातील आधुनिक कवितेचा जनक. जन्म मॉल्डेव्हियातील बॉटॉशान येथे. वडील गेकोर्गे एमिनोव्हिसी, आई शलूका इउरास्कू. शालेय शिक्षण सेर्नाउत्सी येथे. एमीनेस्कूचे महाविद्यालयीन शिक्षण बर्लिन आणि व्हीएन्ना या विद्यापीठात झाले (१८६९ ते १८७२). मात्र तो पदवीधर झाला नाही. विद्यार्थी म्हणून आवश्यक असणाऱ्या कोणत्याही प्रवेश प्रक्रिया वा कार्यवाही न करता तो व्हीएन्ना या विद्यापीठात उपस्थित राहत असे. तेथे एका जिज्ञासु श्रोत्याप्रमाणे तो कायदा आणि तत्त्वज्ञान या विषयाच्या वर्गांना हजेरी लावत असे.
तो तेथील विद्यार्थी जीवनातही सक्रीय होता. पेट्रे पी कार्य, वासील पोगोर, थियोडोर रोजेटरी, आयकोब नेग्रूझी, टीटू मैओरस्कू या सांस्कृतिक संघटनेच्या नेत्यांचा एमीनेस्कूवर राजकिय व सांस्कृतिक प्रभाव पडला. कोन्वोरबीरी लिटरेचर या नियतकालिकाचे संपादक आयकोन नेगूझी एमीनेस्कूची ‘Venus and Madonna’ ही कविता वाचून प्रभावित झाले व व्हिएन्ना येथे त्याला भेटायला गेले होते. तत्कालीन रूमानियन नाट्यपरंपरेत नावाजलेल्या लोर्गु कारगले आणि मिहाई पास्कली या दोन्ही नाट्यसंस्थेत त्याने पार्श्वसुचक आणि लेखनिक म्हणून कार्य केले. या निमित्ताने मतेइ मिलो आणि फॅनी तार्डिनीव्ला दिसेस्कू यांच्यासोबत तो रूमानियन नाट्यगृहात सक्रीय होता. कालांतराने बुकारेस्ट येथे स्थायिक झाल्यावर येथील राष्ट्रीय नाट्यगृहात त्याने लेखानिकाचेच कार्य केले. या काळात कविता त्याचे लिहिणे व कवितांचे प्रकाशित करणे सुरूच होते. रूमानियन लोकसाहित्य आणि साहित्याचा इतिहास यासाठी कार्य करणाऱ्या ओरिएंट या साहित्य संस्थेचा तो सहसंस्थापक होता. त्याने पेस्टमधील फेडरॅयुनिया या नियतकालिकात व्हॅरो या टोपणनावाने ऑस्ट्रेलियन, हंगेरियन साम्राज्यातील रोमन आणि इतर अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर ३ लेख लिहिले आहेत (१८७०). बर्लिनला द बी या वृत्तपत्राचा पत्रकार म्हणून त्याने कार्य केले. त्याने यासी मधील यासी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात संचालक म्हणून कार्य केले (१८७४ –१८७७). १८७७ ला बुकारेस्टला परतल्यावर तेथील द टाइम (इं.शी.) या वृत्तपत्रात त्याने पत्रकार आणि मुख्य संपादक म्हणून कार्य केले. रशिया, तुर्की युद्धाच्या वेळी बहुतेक राजनैतिक स्थित्यंतरात याविषयी त्याने लेखन केले (१८७७ -१८७८).
त्याच्या लेखनाचा पहिला पुरावा १८६६ मधील आहे. रूमानियन शिक्षक ॲरोन पुनमुल यांच्या निधनानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक पत्रक प्रकाशित केले ; ज्यामध्ये ‘ॲट द ग्रेव्ह ऑफ ॲरोन पमनुल’ (इं.शी) नावाची त्याची कविता आहे. त्याच दरम्यान त्याची ‘डीएस व्हिया’ (इं.शी. इफ आय हॅड) ही कविता वल्कान या साहित्य अभ्यासकाच्या फॅमिलिया या नियतकालिकात प्रकाशित झाली होती. प्रकाशित कवितांची स्थिर मालिका त्याने सुरू केली. जर्मन भाषांतरेही प्रकाशित केली. त्याच्या काही सर्वात उल्लेखनीय कविता पुढील प्रमाणे – सर्मानुल डायोनीस (इं.शी पुअर डायनोसीस,१८७२), Lacul (इं.शी. द लेक, १८७६), Luceafarul (इं.शी. द वेस्पर, १८८३), Floare albastra (इं.शी. ब्लू फ्लॉवर, १८८४), Sara pe deal (इं.शी. इव्हीनिंग ऑन द हिल, ११८५), O,ramai (इं.शी. ओ लिंगर ऑन, १८८४), Epigonii (इं.शी. एपिगोन्स, १८८४), Scrisori (इं.शी. लेटर्स ऑफ एपिटल – सटायर), Si daca (इं.शी. अँड इफ, १८८३), Oda in metru antic (इं.शी.आय हॅव यट वन डिझायर, १८८३), La steav (इं.शी. टू द स्टार, १८८६) इत्यादी.
मिहाईल एमीनेस्कूच्या कविता आणि गद्य हे साहित्य कर्ट डब्लू ट्रोये यांनी इंग्रजी भाषेत संपादून प्रकाशित केले आहे. एमीनेस्कू ने सुमारे साठ कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गापासून ते द्वेष आणि सामाजिक भाष्य यावर मोठ्या प्रमाणात विषय आहेत. लहानपणीच्या स्मृतीमुळे येणारी उदासीनता त्याच्या कवितांत दिसते. रूमानियन कवितेच्या आशय-अभिव्यक्तीत त्याने फार मोठे परिर्वतन घडवून आणले. आधुनिक रूमानियन कवितेचा तो जनक होय. प्रतिभासंपन्न अभिव्यक्ती आणि सखोल चिंतन ही त्याच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. एमीनेस्कू हा आदर्शाची स्वप्ने पाहणारा अत्यंत संवेदनाक्षम कवी होता. ही वृत्ती आणि प्रत्यक्ष लौकिक परिसर यातील विसंवादाच्या जाणीवेने त्याच्या काव्यात सहजपणे नैराश्य उतरले. उच्च दर्जाची प्रतिभा आणि श्रेष्ठ विचार हे महान कवीचे गुण त्याच्यात होते. विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत रूमानियन कवितेवर त्याच्या प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या कवितेत वैचारिक प्रगल्भता, उत्कट देशाभिमान, सामाजिक विसंगतीवरील प्रखर टिका, काव्यतंत्रावरील प्रभुत्वही दिसून येते. एमिनेस्कूच्या कवितांचे भाषांतर इंग्रजी, इटालियन, फ्रेंच आणि जर्मन या सारख्या ६० हून अधिक भाषांमध्ये केले गेले. त्याचे चरित्रलेखन आणि काव्य याचा अभ्यास रूमानियन शाळांमध्ये केला जातो. काव्याखेरीज Gerlu Pustiu ही कादंबरी आणि काही कथाही त्याने लिहिल्या. Sarmanut Dionis आणि Cesara या त्या तत्त्वचिंतनात्मक कथा विशेष प्रसिद्ध आहेत. राजकारण, समाजशास्त्र इ. विषयांवरही त्याने महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.
रूमानियन प्रांतातील सर्व जनतेने महत्त्वाचा कवी म्हणून त्याला स्वीकारले असून रूमानियाचा राष्ट्रीय कवी म्हणून त्याला घोषित करण्यात आले आहे. आजच्या रूमानियातील कागदी चलनावर एमीनेस्कूची छायाचित्रांचे प्रतिमांकन केले आहे. Eminescu’s Linden Tree हे रूमानिया देशातील प्रसिद्ध त्याचे स्मृतिशेष आहे. बऱ्याच शाळा व संस्थांना त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच्या स्मृतिपित्यर्थ रूमानियाच्या अनेक शहरांत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. सन २००० हे वर्ष त्यांच्या जन्मानंतरच्या १५० वर्षांनी रूमानियातील एमिनेस्कू वर्ष घोषित केले गेले. १ जानेवारी २००४ रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे मीहाईल एमीनेस्कू आणि अल्लामा इक्बाल यांचे संयुक्तपणे स्मारक उभारण्यात आले. २००४ मध्ये कॅनडामधील क्युबेकच्या मॉन्ट्रीयल येथे मिहाईल एमिनेस्कूचा पुतळा उभारला गेला. १८८० चा काळ एमीनेस्कूच्या जीवनात संकटाचा ठरणारा काळ होता. १८८० ते १८८६ पर्यंत ऑस्ट्रिया आणि इटलीमध्ये त्याच्यावर उपचार झाले; व त्याला बरे केले. इऑन स्लाव्हिसी हा लेखकमित्र त्याच्या सोबत होता. त्यानंतर मेंदूच्या आजाराने ग्रस्त झाल्यावर उपचारात सायफिलीसचे निदान झाले. उपचारा दरम्यान बुकारेस्ट येथे दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.