मालती नागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालती नागर

लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाचा पाया घालणाऱ्या भारतीय पुरातत्त्वज्ञा. मालती नागर यांनी १९५८ मध्ये सामाजिक मानवशास्त्र आणि १९६१ मध्ये प्रागैतिहासिक पुरातत्त्व यांत एम. ए. अशा दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथे पीएच.डी. साठी प्रवेश घेतला (१९६१). ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली (१९६६). त्यांच्या प्रबंधाचा विषय ’एथ्नोआर्किऑलॉजी ऑफ अहाड’ हा होता.

त्यांनी अहाड या ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळावर मिळालेल्या मातीच्या भांड्यांचे पद्धतशीर वर्गीकरण केले आणि त्यावरील चित्रांचा अन्वयार्थ लावण्यासाठी भिल्ल आदिवासींचा लोकजीवनशास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. याचप्रमाणे त्यांनी अहाड येथील घरांची रचना आणि मेवाडमधील घरांचे प्रकार व रचना यांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांचे मेवाडमधील स्त्रियांच्या बांगड्या आणि ताम्रपाषाणयुगीन अहाडमधील तांब्याच्या बांगड्या यांवरील लोकजीवनशास्त्रीय संशोधन लक्षणीय होते. पीएच.डी. करत असताना त्यांनी मेवाडमधील संस्कृती, लोकजीवन आणि धार्मिक चालीरिती यांची अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. विशेषतः महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान असलेल्या चावंडजवळ अरवली टेकड्यांमध्ये गोगुंदा या आदिवासी गावातल्या मातीच्या भांड्यांच्या वापराचा व आसपासच्या खेड्यातील मातीची भांडी बनवण्याच्या तंत्राचा सखोल अभ्यास केला.

नागर यांची डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून नेमणूक झाली (१९६६). त्यानंतर पुढील वर्षी त्या व्याख्याता या पदावर रुजू झाल्या (१९६७). लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व विषयासाठीचे भारतीय विद्यापीठांमधील हे पहिले स्वतंत्र पद होते. या पदावर नेमणूक झाल्यावर नागर यांनी मध्य प्रदेश व सध्याच्या छत्तीसगढ राज्यातील गोंड आदिवासींवरील लोकजीवनशास्त्रीय संशोधनाला प्रारंभ केला. त्यांनी भीमबेटका या प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाच्या परिसरातील आदिवासींची केलेली निरीक्षणे तेथील शैलचित्रांचा अभ्यास करताना महत्त्वाची ठरली. सध्या छत्तीसगड राज्यात असलेल्या बस्तर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंची निरीक्षणे करताना त्यांनी बस्तरमधील मारिया व मुरीया गोंडांच्या महापाषाणयुगाशी साधर्म्य असलेल्या दफनांचे आणि संबंधित धार्मिक विधींचे संशोधन केले.

नागर यांचे मध्य प्रदेशातील सागर, दमोह आणि सामनापूर जिल्ह्यांत पारधी आणि कुचबंदीया या जमातींचे लोकजीवन आणि पुरातत्त्वीय पुरावे यांची सांगड घालण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्यांनी विविध आदिवासींचे शिकारीचे, सापळा लावण्याचे, रानातील वनस्पती गोळा करण्याचे आणि मासेमारीचे तंत्र यांसंबंधी विस्तृत संशोधन केले. पारधी आणि कुचबंदीया या जमातींची एकमेकांना पूरक ठरणारी आर्थिक व सामाजिक सहकार्याची भूमिका या संशोधनामुळे दिसून आली. तसेच औषधी वनस्पती, अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या रानवनस्पती, शिकारीची साधने, शस्त्रे, भाले, जाळी व सापळे यांसारख्या विविध वस्तूंचा अभ्यास करून त्यांचा पुरातत्त्वीय निष्कर्षांना कसा उपयोग होतो, हे नागर यांनी दाखवून दिले.

  • Murty, M. L. K. ‘Contribution of the Deccan College to Ethnoarchaeological Research In India’, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, 66/67: 29-45, Pune, 2006-2007.