महमूद अहमदिनेजाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महमूद अहमदिनेजाद

इराणचा सहावा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३ ऑगस्ट २००५ – ३ ऑगस्ट २०१३
सर्वोच्च पुढारी अली खामेनेई
मागील मोहम्मद खातामी
पुढील हसन रूहानी

तेहरानचा महापौर
कार्यकाळ
२० जून २००३ – ३ ऑगस्ट २००५

अर्दाबिलचा राज्यपाल
कार्यकाळ
१ मे १९९३ – २८ जून १९९७

जन्म २८ ऑक्टोबर, १९५६ (1956-10-28) (वय: ६७)
अरादान, सेमनान प्रांत, इराण
धर्म शिया इस्लाम
सही महमूद अहमदिनेजादयांची सही

महमूद अहमदिनेजाद (फारसी: محمود احمدی‌نژاد ; रोमन लिपी: Mahmoud Ahmadinejad) (२८ ऑक्टोबर, इ.स. १९५६ - हयात) हे इराणमधील राजकारणी असून इ.स. २००५-२०१३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदी होते. अहमदिनेजाद इ.स. २००५ साली सत्तेवर आले व जून २००९ मधील वादग्रस्त अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यानंतर ते पुढील ४ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिले. जून, इ.स. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत हसन रूहानी नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.

सुरुवातीच्या काळात इंजिनियर व शिक्षक म्हणून काम केलेल्या अहमदिनेजादांनी इ.स. १९७९ च्या इराणी क्रांतीनंतर दफ्तर-ए-तेहकिम-ए-वाहदात (अर्थ : ऐक्यवर्धनाचे कार्यालय) या विद्यार्थी संघटनेत सामील झाले. इ.स. १९९३-१९९५ या कालखंडात ते अर्दाबिल प्रांताचे गव्हर्नर होते. मात्र मोहम्मद खातामी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर गव्हर्नरपदावरून त्यांची उचलबांगडी झाली व ते पुनश्च अध्यापनाकडे वळले. तेहरानाच्या नगरपरिषदेने इ.स. २००३ साली त्यांची तेहरानाच्या महापौरपदासाठी निवड केली. तेहरानाच्या महापौर कारकिर्दीपासून त्यांनी आणखी धर्मनिष्ठ विचारसरणी पुरस्कारण्यास सुरुवात केली. इ.स. २००५ च्या अध्यक्षीय निवडणुकीस ते उभे राहिले असता, अबदगारान- अर्थात इस्लामी इराण निर्मात्यांची आघाडी - या राजकीय आघाडीने त्यांना पाठिंबा दिला. या निवडणुकांमध्ये ६२% मते मिळवत ते विजयी झाले आणि ३ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

अध्यक्षीय कारकीर्द[संपादन]

अहमदिनेजाद ह्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत पश्चिम जगाशी नकारात्मक व भांडखोर पवित्रा घेतला . जर्मन नाझींनी ज्यू लोकांची केलेली कत्तल ते नाकारतात, इस्रायल देशाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकू असे वक्तव्य त्यांनी वारंवार केले आहे[ संदर्भ हवा ]. अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाला ते मुस्लिम जगाचा सर्वात मोठा शत्रू मानतात[ संदर्भ हवा ]. अध्यक्ष बराक ओबामांनी पुढे केलेला मैत्रीचा हातही त्यांनी नाकारला. त्यांच्या ह्या धोरणांमुळे व त्यांच्या कारकिर्दीत इराण देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची बनल्यामुळे अहमदिनेजाद ह्यांनी इराणमधील उदारमतवादी व तरुण पिढीचा पाठिंबा गमावला आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: