मसूद अझर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मौलाना मसूद अझर (१० जुलै किंवा ७ ऑगस्ट, इ.स. १९६८:बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान - ) हा एक कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी आहे. ह्याला ९ किंवा १० भावंडे आहेत.

मसूद अझरचे वडील नाव अल्ला बख्श शब्बीर सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होते. येथे शिकलेला अझर अफगाणिस्तानात सोवियेत संघाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हरकत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर साद-ए-मुजाहिदीन या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला.

काश्मीरसाठी[संपादन]

१९९० नंतर अफगाणिस्तानातली लढाई संपल्यानंतर आयएसआयने आझर काश्मीरमधे कामी लावले. काश्मीरमधे घातपात करायचे व काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या कामी त्याची नेमणूक करण्यात आली.

याच काळात अझर ब्रिटनसह अनेक देशांत दौरे करून जिहादसाठी पैसे गोळा करत असे. प्रत्येक दौऱ्यात तो स्पष्टपणे सांगत असे की काश्मिर मुक्ती आणि भारतविरोधी लढा यासाठीच जिहाद असेल, त्यासाठीच पैसे, शस्त्रे आणि जिहादींची आवश्यकता आहे.

अझर काश्मीरमधे १९९४ साली पोहचला. परदेशी लोकांचे अपहरण करून पैसे मिळवण्यासाठी त्याने अल फरहान नावाची एक स्वतंत्र संघटना स्थापली. हान्स क्रिश्चन ओस्ट्रोला अल फरहानने ठार मारले. संयुक्त राष्ट्रांनी १९९७ साली हरकत-उल-अन्सार संघटना दहशतवादी म्हणून घोषित केली. अझरने जुन्या हरकत-उल-मुजाहिद्दीन या नावाने उद्योग सुरू केले. १९९४ साली अझरला भारतीय पोलिसांनी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात ठेवले.

१९९९ साली अझरचा धाकटा भाऊ अब्दुल रऊफ असगर याने योजनापूर्वक इंडियन एरलाइन्सचे आयसी ८१४ विमान काठमांडूहून पळवले आणि कंदहारला नेले.

अपहरणकर्त्यांची मागणी मान्य करून अझरला कोट भलवाल तुरुंगातून आयपीएस पोलिस अधिकारी एस. पी. वैद्य यांनी सोडवले. भारत सरकारचे मंत्री जसवंत सिंग अझरला सोबत घेऊन कंदाहारला पोचले. अझर कंदाहारमधून तडक पाकिस्तानात गेला.

सुटकेनंतर[संपादन]

अझर १९९९ साली पाकिस्तानात पोहचल्या पोहचल्या कराचीत गेला. सिंध, पंजाबमध्ये त्याच्या सत्काराच्या सभा झाल्या. सभांमधे तो काश्मीरमुक्ती, भारताविरोधात आणि हिंदूंच्या विरोधात लढाईचे आवाहन करत असे.

१९९९मधे हरकत-उल-मुजाहिद्दीन वर आरोप व्हायला लागल्यावर अझरने आपल्या संघटनेचे नाव जैश ए महंमद ठेवले. १९९९ मधे जनरल मुशर्रफ यांनी पाकिस्तानावर ताबा मिळवला. आयएसआय आता त्यांच्या हाताखाली आली होती. मुशर्रफ जैशला मदत करून तिचा वापर करू लागले.

अझरने कश्मीर विधानसभा, लोकसभा यावर हल्ले आयोजित केले. पठाणकोट हल्ल्याचाही तो सूत्रधार होता. असा दहशतवादी अझर पाकिस्तानात मोकाट असतो. आयएसआयच्या सांगण्यानुसार तो वागत असतो.

पठाणकोटच्या लष्करी विमानतळावर हल्ला आणि चीनचा यूनोत नकाराधिकार[संपादन]

पठाणकोट हल्ल्याचं नेतृत्व जैश ए महंमदच्या मसूद अझरने केले होते. दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत आल्यानंतर आपल्या टॅक्सीने आतमधे आणणाऱ्या इकागर सिंगला पाकिस्तानातल्या बहवालपूरमधून फोनवरून बोलावण्यात आले होते. गुरदासपूरचे पोलेस सुपरिटेन्डेन्ट सलविंदर सिंग यांचा फोन दहशतवाद्यांनी हिसकून घेतला आणि त्यावरून बहवालपूरला फोन केले. दहशतवाद्यांना हाताळणाऱ्या लोकांशी या फोनवरून संभाषणे झाली. बहवालपूर हे जैश ए महंमदचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. दहशतवाद्यांपैकी किमान एकाचा ठावठिकाणा लागला होता. दहशतवाद्यांकडली शस्त्रे आणि इतर वस्तूंवर पाकिस्तानी उत्पादकांचा वा व्यापाऱ्यांचा ठसा होता.

भारत सरकारने हे सारे पुरावे पाकिस्तान सरकारपुढे ठेवले. अझर आणि जैश ए महंमदच्या पुढाऱ्यांच्या आवाजाचे नमुने भारत सरकारने मागवले. पाकिस्तानने ते दिले नाहीत. अझरला पकडा अशी मागणी भारताे केली. पाकिस्तानने ती मान्य केली नाही. युनायटेड नेशन्सने अझरला दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारताने केली. चीनने ती मागणी नकाराधिकार वापरून तांत्रिक कारणांसाठी धुडकावून लावली.

याआधी २००१ मध्ये सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'वर बंदी घातली होती.. मुंबईत झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००८ मध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी सादर केला होता. त्यावेळीही चीनने नकाराधिकार वापरुन हा प्रस्ताव हाणून पाडला होता. आता १ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या युनोच्या बैठकीत पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करून चीनने दहशतवादी अझरवरील बंदी टाळली आहे.