मलाला युसूफझाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलाला युसूफझाई
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व कुटुंबियांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये व्हाईट हाउसमध्ये मलालाची भेट घेतली.

मलाला युसूफझाई (पश्तो: ملاله یوسفزۍ‎; उर्दू: ملالہ یوسف زئی; जन्म: १२ जुलै १९९७, मिंगोरा, नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स) ही एक पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. ह्या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच ह्या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.

ऑक्टोबर २०१२ रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर तीन गोळ्या झाडल्या. ह्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मलालाला उपचारांसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये हलवण्यात आले. मलालावरील ह्या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले.

१० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक तिला भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून दिले जाईल. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिकविजेती आहे.

मलाला युसूफजाई संबंधी पुस्तके[संपादन]

  • मी मलाला (मूळ इंग्रजी आत्मचरित्र - I am Malala लेखक - Christina Lamb and Malala Yousafzai; मराठी अनुवाद: अनुवादक - सुप्रिया वकील)
  • मलाला : सामान्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी ! — ऋतुजा बापट-काणे, रिया पब्लिकेशन्स, २०१६

बाह्य दुवे[संपादन]