मंत्रपुष्पांजली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंत्रपुष्पांजली (संस्कृत: मंत्रपुष्पांजलिः, IPA: \mɐn̪t̪rɐpuɕpɑːɲɟɐli\) ही भारतातील एक लोकप्रिय प्रार्थना आहे. याचा एक अर्थ "फुलांची ओजळी अर्पण करणे" असा होतो. यात वैदिक स्त्रोतांमधील चार स्तोत्रे समाविष्ट आहेत. मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी गायली जाणारी अंतिम प्रार्थना आहे. मंत्रपुष्पांजली हा शब्द तीन घटकांनी बनलेला आहे, मंत्र, पुष्प आणि अंजली (हाताची ओंजळ).

मंत्रपुष्पांजली हे वैदिक परंपरेच्या शुक्ल यजुर्वेद शाखेतील देवें नावाच्या पारंपारिक पठणाच्या संचाचे एक परिशिष्ट आहे. मंत्रपुष्पांजलीचे स्तोत्र अत्यंत संथ गतीने जपले जातात, सर्व दीप स्वरित ( संस्कृत, देवनागरी दीर्घस्वरित) उच्चार नेहमीपेक्षा जास्त वाढवतात.[१][२]

मजकूर[संपादन]

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्मानि प्रथम्यासन् | ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः || 1 ||

ॐ राजाधिराजाय प्रसह्ये नमो वयं वैश्रवणाय कुर्महे | स मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु | कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः || 2 ||

ॐ स्वस्ति | साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी सत्सारभौमः सर्वयुष आंतदापरधात्पृथ्यै समुद्रापर्यंत एकराळिति || 3 ||

तदप्येषः श्लोको ऽभिगीतो |मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे | अवक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति || 4 ||

विश्वत॑श्चक्षुरु॒विश्वतो॑मुखो वि॒श्वतो॑बाहुरु॒विश्वत॑स्पात् । संबाँहुभ्यां॒ धम॑ति॒ सं पत॑त्रै॒र्द्यावा॑ शिला॑जनय॑न्देव एक॑: ॥ ५ ॥[१]

पठण[संपादन]

दैनंदिन पूजा, सत्यनारायण, भगवान गणेश स्थापना, आदित्यादी सारख्या विशेष पूजांनंतर आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हटले जाते. आरती आणि भजनाच्या विपरीत, मंत्रपुष्पांजली टाळ्या वाजवून किंवा झांजांसोबत नसते. मंत्रपुष्पांजली भक्तांनी त्यांच्या तळहातात फुल धरून आदरपूर्वक उच्चारण केले आहे. पठणानंतर देवतेला फुले अर्पण केली जातात.

अर्थ व आशय[संपादन]

वैदिक परंपरेनुसार देवतांची पूजाअर्चा झाल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन व मंत्रपुष्पांजली म्हणून देवतेला अर्पण केली जातात. मंत्रपुष्पांजलीमधे वैदिक वाङमयातील चार श्लोक एकत्रित केले आहेत. वैदिक वाङमयात आध्यात्मिक ज्ञान व विज्ञानातील सिद्धांत मांडलेले आहेत. हे सत्य लक्षात घेऊन श्लोकांमधे ज्या काही विशिष्ट शब्दांचा उपयोग करण्यात आला आहे, त्या शब्दांचा सुयोग्य अर्थ पाहणे आवश्यक आहे.

एक विशिष्ट शब्दरचना, ज्याच्या केवळ उच्चारण्याने अनेक भौतिक सुख-साधनांची प्राप्ती होते, असा 'मंत्र' या शब्दाचा सामान्यतः अर्थ घेतला जातो. परंतु केवळ शब्दांमधे शक्ती असती, तर ते फक्त लिहिल्यामुळे किंवा त्यांचा उच्चार करताच, त्यांचा परिणाम दिसायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे घडून येताना दिसत नाही. कारण मंत्र या शब्दाचा आशय, शास्त्र सांगते त्याप्रमाणे वेगळा आहे. मननात् त्रायते इति मंत्रः ज्या शब्दांच्या किंवा शब्दरचनेच्या मनन व चिंतनामुळे व्यक्तीच्या अनुभूत अवस्थेचे रक्षण होते, त्याला मंत्र म्हणतात. मनुष्याला मन आहे, ज्याद्वारे तो मनन, चिंतन करू शकतो. केवळ शब्दांच्या उच्चारणामुळे मनाला शक्ती प्राप्त होणार नाही, तर मंत्रातील शब्दांच्या अर्थाची तीव्र साधना मनाद्वारे करावी लागेल, तरच मंत्रांची शक्ती व त्याचा परिणाम दिसून येईल. शक्ती मनात आहे, केवळ शब्दांमधे किंवा उच्चारण्यात नाही! या तपःसाधनेनेच मंत्रपुष्पांजलीचा परिणाम प्राप्त होईल. सर्व वेदमंत्रांचे सुद्धा हेच सत्य स्वरूप आहे. यानुसार मंत्रपुष्पांजलीतील शब्दांचा अर्थ व आशय पाहू,

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ।।१।।ऋग्वेद.

मंत्रपुष्पाजलीतील प्रारंभ ॐ या ब्रह्मवाचक शब्दाने केला आहे. यानंतर आलेला शब्द 'यज्ञ' आहे. इंद्रियांद्वारे होणारी सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणे यालाच यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे श्रेष्ठ अवस्था जाणून त्याचा अनुभव घेण्यासाठी करण्यात येणारी कृती! बरं, ही कृती एकदा करून भागत नाही, तर असे प्रयत्न, निग्रहाने प्रयत्नपूर्वक परतपरत करावे लागतात, फलप्राप्ती होई पर्यंत! म्हणून देवांनी यज्ञाद्वारे यज्ञाचे आयोजन केले, असा यज्ञ शब्दाचा दोनदा उल्लेख आला आहे आणि यज्ञाद्वारे प्रथम धर्माचा उदय झाला. सततच्या कर्मातून म्हणजेच कृतीतून संस्कारांची धारणा बनते व त्यातूनच स्वधर्माचा उदय होतो. धर्मपालनाने मनुष्याला सुख प्राप्त होते म्हणजेच स्वर्गप्राप्ती होते.

सु+अर+गः म्हणजेच पुढे जाणारी, नेणारी मनाची सुखकारक अवस्था! अत्रैव स्वर्ग नरक: इति मातः प्रचक्षते असे व्यासांनी पुराणात म्हटले आहे. स्वर्ग व नरक ही भौगोलिक स्थाने नसून मनुष्याच्या मनाची उत्क्रांतीच्या दिशेने पुढे नेणारी व अनुक्रांत मनाची गतिशील अवस्था रोखणारी स्थिती आहे.

धारयते इति धर्मः अशी धर्म शब्दांची व्याख्या आहे. ज्या संस्कारांनी मनाची धारणा होते, त्यास धर्म म्हटले आहे. हे संस्कार चांगले व वाईट असे दोन्ही असतील. व्यसनाधीन माणसाची जेव्हा व्यसनपूर्ती होते तेव्हा तो सुखच अनुभवतो परंतु त्यामुळे जर शारीरिक, मानसिक वा सामाजिक हानी होणार असेल तर ते वाईटच! अशा सुखातून दुःख निर्मीती होऊ शकते म्हणून ते स्वर्गसुख नाही. स्वर्गप्राप्तीचा (नाकं म्हणजे स्वर्ग) मंत्रपुष्पांजलीतील उल्लेख व्यक्तीगत व सामाजिक उत्क्रांतीच्या दिशेने नेणारा आहे. यापूर्वीही काहींनी असे यज्ञ म्हणजे प्रयत्न करून देवत्व मिळविले होते. त्यांनी स्वर्गाची महानता खरोखर प्राप्त केली आहे व सध्या ते स्वर्गात राहत आहेत. परंतु केवळ स्वर्गप्राप्ती पुरेशी नाही, हे पुढील श्लोकावरून लक्षात येईल.

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु।कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।।२।। तैत्तिरीय ब्राह्मण.

आमचे प्रयत्न सुसह्य म्हणजेच अनुकूल करून देणाऱ्या राजाधिराज वैश्रवणाला आम्ही नमस्कार करतो. आमच्या इच्छांची व कामनांची पूर्ती करून देणाऱ्या महाराजा कामेश्वर, वैश्रवण कुबेराला आम्ही नमन करतो. विश्रवणाचा पुत्र असलेला वैश्रवण म्हणजे कुबेर! कुबेर देवांच्या संपत्तीच्या भांडाराचा प्रमुख आहे. आसुरी संपत्ती व दैवी संपत्ती अशा दोन प्रकारच्या संपत्तींचे वर्णन श्रीमत् भगवत् गीतेत आहे. दैवी संपत्तीचा प्रमुख कुबेर आहे, त्याचे स्तवन केल्यामुळे प्रसन्न होऊन दैवी संपत्तीचा लाभ झाल्यास स्वर्गप्राप्ती निश्चित होईल. परंतु आत्मसुखासाठी, कर्माच्या लाभाचा अथवा फलप्राप्तीचाही पुढे जाऊन त्याग करणे आवश्यक आहे. अवाजवी संग्रहित वृत्ती म्हणजेच संचय करण्याची इच्छा, मग ती दैवी संपत्ती असली तरी, वाईट म्हणजे कु असल्यामुळे दैवी संपत्तीच्या सुखातही अडकायचे नाही. म्हणून कुबेर कुरूप दाखवला आहे.

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ।।३।। ऐतरेय ब्राह्मण.

आमचे राज्य म्हणजे जीवनाचा विस्तार कल्याणकारक, स्वतःच्या धर्मास अनुकूल, उपभोग्य, विशेष म्हणजे इतरांपेक्षा वेगळा व परम इष्ट, सर्वश्रेष्ठ असा महानता प्राप्त करून देणारा असावा. या साम्राज्याचे अधिपत्य म्हणजे सत्ता आमच्या हातात असावी म्हणजेच ते स्वराज्य असावे. आमचे जीवन, आयुष् पृथ्वी तत्वापासून समुद्र म्हणजे आपतत्वापर्यंत शिवाय आदी, अंत व त्याही पलीकडे परार्धात वर्षापर्यंत एकसंध व सार्वभौम असावे. या विश्वाची निर्मिती पंचतत्वांमुळे झाली आहे. त्यातील आपतत्त्वात मूलद्रव्यांची निर्मीती होते व पृथ्वीतत्त्वात वस्तू पृथक पृथक अस्तित्वात येतात. या दोन्हीही तत्त्वांचे नियंत्रण आमच्या हातात असावे, कशासाठी तर व्यक्ती व समाजाच्या योग्य उत्क्रांतीसाठी! भौतिक समुद्र या संज्ञेला काही अर्थ नाही कारण वैदिक संस्कृती एकेकाळी सातासमुद्रापार पोहचली होती.

तदप्येषः श्लोकोऽभिगीतोः मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेः विश्वेदेवाः सभासद इति ।।४।।ऐतरेय ब्राह्मण.

अशा कल्याणकारक जीवनासाठी, या श्लोकांचे आत्ता गायन केले आहे. अविक्षिताचा पुत्र मरुतांनी परिवेष्टित केलेले ज्या घरात राहत आहेत अशा राज्याचे सभासदत्व आम्हास मिळावे, अशी इच्छा, कामनेची प्रेरणा देणाऱ्या विश्वदेवाकडे व्यक्त करतो. मरुत म्हणजे वायूतत्व! मनाचे अस्तित्व वायूतत्त्वात आहे. संस्कारांची मूस म्हणजे मन. मन अतिशय चंचल आहे नव्हे मनाची परिभाषाच संकल्प विकल्पात्मक मनः अशी आहे. ते सतत विचार करत असते. इच्छांचा आश्रयही इथेच आहे किंबहुना इच्छांमुळेच संस्कारित मन निर्माण झाले म्हणून जीवनाची प्रेरणाही मनच आहे. या मनात स्वतःची व समाजाची उत्क्रांती होईल अशा इच्छा निर्माण व्हाव्यात, अशी इच्छांचीे प्रेरणा देणाऱ्या विश्वदेवाकडे मागणे मागतो.

व्यक्तींचे उन्नयन, कल्याण होताना समाजाचेही कल्याण होणारच कारण व्यक्ती ही समाज जीवनाचा अविभाज्य घटक आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' ही वैदिक संकल्पना देशातीत आहे. फक्त आपल्या प्रदेशाचा विचार किती घातक ठरू शकतो, याचा अनुभव जगाने वारंवार घेतला आहे. पंचतत्वांमुळे या विश्वाची निर्मिती झाली आहे व मानवी जीवनाचा विस्तार वायूत्त्वातील मनाच्या इच्छाशक्ती अथवा कामनेमुळे आहे.

अशी ही प्रत्येकाच्या कल्याणाची, वैदिक उत्क्रांतीची कामना असलेली मंत्रपुष्पांजली आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Srimali, Dr Radha Krishna (1990). Durga Upasana (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-288-0217-1.
  2. ^ "Deve Ani Mantra Pushpanjali Song Mp3 Download". Saregama. 2021-02-03 रोजी पाहिले.