भुलाबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता. भूमीसारखी सर्जनशील. ही खेळोत्सव म्हणजे भूमीचा पार्वतीचा सर्जनोत्सव. शिवशक्तीची पूजा. एक प्रकारचा सुफलन विधी. भूलोबा हे शंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्स्वात शंकराची फक्त हजेरी असते. भुलाबाईच्या पूजनात श्री. वाकोडे यांना यक्ष संप्रदाय, शक्ती संप्रदाय यांच्या खुणा दिसतात.[१]

भाद्रपद पौर्णिमा (सहसा अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस) ते आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात.[२][३], सायंकाळी सामूहिकपणे मैत्रिणींसोबत गाणी म्हणतात.[३] ही गाणी बहुधा वेगवान चालीने म्हटली जातात. या गाण्यांना टाळ्या अथवा टिपऱ्यांची साथ असते.[३] विदर्भात भाद्रपद पौर्णिमेस भोडनी असेही म्हटले जाते. [३] घरोघरी भुलाबाईची सजावट केली जात असे, आणि घरोघरी जाऊन मुली भुलाबाईची गाणी म्हणत त्या नंतर खिरापत (खाऊ) ओळखल्यानतंर सर्वांना खिरापत दिली जाते असे.[४]

"भोडनीचा सण, मातेचे गुणगान" या लेखातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या मतानुसार हादगा आणि भोंडला हे पर्जन्योत्सव असून; "पाचा पुतराची माय, पालखीत बसून जाय', "भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस, पहिल्या दिवशी बाळाला टोपी', "भुलाबाई राणीचे डोहाळे', "तिचे डोहाळे तिला भारी, नेऊन टाका पलंगावरी, शंकर बसले भुयारी', "चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू', "पाचाचा पाळणा, बाळ नेता हनुमंता, हनुमंताची निळी घोडी, येता जाता कंबळतोडी' अशी मातृत्वाबाबतची वर्णने गीतातून गाणाऱ्या भुलाबाई उत्सवाचा उद्देश मातृपूजा आणि मातृत्व गौरव असून भुलाबाईचा सोहळा हादगा आणि भोंडला ह्या पासून वेगळा असलेला एक सर्जनोत्सव आहे. डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या मतानुसार अशा भुलाबाई गीतांच्या माध्यमातून आदिम समाजजीवनातील सुफळीकरणाचे रुढीअवशेष या उत्सवातून दिसून येतात. [३] भुलाबाई उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृतीचा ठेवा या साप्ताहीक लोकप्रभातील लेखातून संतोष विणके कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विदर्भातील शेतकरी ज्वारीच्या धांड्यांनी अथवा उसाच्या खोंडांनी खोपडी सजवून त्यात भुलाबाईस बसवतात तसेच या काळात खरिपाची पिके कापणीला येतात याचा निर्देशकरून भुलाबाईचा उत्सव हा नविन आलेल्या धान्याच्या पुजनासाठी असल्याचे सुचवतात.[२]

भुलाबाईचे गाणे- १.भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलीना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला
चला हो माझ्या माहेरा ,माहेरा..
गेल्याबरोबर पाट बसायला ताट जेवायला
विनंती करू यशोदेला
टीप-या खेळू , गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ, घरी जाऊ..

२.साखरेच्या गोणीबाई लोटविलया अंगणी
आज आमच्या भुलाबाईला पहिला दिवस..पहिला दिवस

३.बारशाच्या वेळेला बाळाचे नाव ठेवताना गाणे म्हणतात- अळकित जाऊ की खीळकित जाऊ
खीळकित ठेवली माती
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा गणपती
आडकीत जाऊ खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुई,
भुलाबाईला लेक झाली,
नाव ठेवा जुई...

हे सुद्धा पहा[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ डॉ. लोहिया शैला, भूमी आणि स्त्री (२००२)
  2. a b [http://www.loksatta.com/lokprabha/navratri-special-15-964682/ भुलाबाई उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृतीचा ठेवा ~ ले. संतोष विणके September 26, 2014 01:18 am रोजी साप्ताहिक लोकप्रभाचा लोकसत्त डॉट कॉमवर प्रकाशित लेख] दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी रात्रौ २०.०० भाप्रवे वाजता जसा मिळवला.
  3. a b c d e भोडनीचा सण, मातेचे गुणगान ~ले. डॉ. प्रतिमा इंगोले यांचा Saturday, September 29, 2012 AT 02:00 AM (IST) तारखेस ॲग्रोवन डॉट कॉमवर प्रकाशित लेख दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी रात्रौ २०.०० भाप्रवे वाजता जसा मिळवला
  4. ^ गंध फुलांचा गेला सांगून..........!!!!!!! ~ My Photo दीप्ती जोशी Saturday, July 2, 2011 संस्थळ पान दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी भाप्रवे रात्रौ २० वाजून ४० मिनीटांनी जसे मिळवले