भोंडला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुलींचा भोंडला

भोंडला किंवा भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.[१][२] महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळत असल्याचे दिसते.[१] मुलींचे पावसाळ्यातील समूह नृत्य असेही या खेळाला संबोधिले जाते.[३]


भोंडला[संपादन]

भोंडला हा सण मुलींचा विशेष आवडता आहे. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते.[४] भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रातकोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.[५] नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते.[६] म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात.[१] नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.[७] हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या ठिपक्यांनी झूल काढतात. रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्याला सजवतात. याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते..
भोंडला किंवा हादगा याचे कृषी संस्कृतीत विशेष महत्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते.[७]

भोंडल्याची गाणी[संपादन]

भोंडला करताना म्हटली जाणारी गाणी ही महिलांच्या आयुष्याशी निगडीत असतात.[८]

नमन गीत- १.ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारवळ घुमती गिरीजा कपारी
अंकाणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझा सोळा वर्ष

२.वहाते मी हादग्या परी हादगा देव मी पूजिते सख्यांना बोलविते हादगा देव मी पूजिते लवंगा सुपा-या वेलदोडे करून ठेविले विडे वहाते मी हाद्ग्यापुढे हादगा देव मी पूजिते [९]

३.आला चेंडू गेला चेंडू
राया चेंडू झुगारिला
आपण चाले हत्ती घोडे
राम चाले पायी
रामाचा पत्ता कुठ नाही
राम ग वेचितो कळ्या
सीता ग गुंफिते जाळ्या
या गीतात सीता ही भूमिकन्या असून धरतीचे रूप मानले जाते तर सावळा राम निळ्या आकाशाचे प्रतीक मानला जातो.[७] अशी गाणी गात शेवटी ...आडात पडला शिंपला,
आमचा भोंडला संपला!याने सांगता होते., आणि सर्प म्हणे मी ....खिरापतीला काय ग? अशी विचारणा होऊन एकेक पदार्थाची नावे घेत खिरापत ओळखण्याची चढाओढ लागते.. शेवटी गोड की तिखट? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या की जिचा भोंडला असयचा तिला अगदी धन्य वाटते अशी या खेळाची गम्मत समजली जाते.[२]

अभ्यासकांचे साहित्य[संपादन]

 • भोंडला भुलाबाई (१९७७) -डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर
 • हादगा - विनया देसाई
 • शैला लोहिया -भूमी आणि स्त्री
 • असा भोंडला सुरेख बाई - इंदिरा कुलकर्णी
 • गाणी भोंडल्याची - सौ. वैजयंती केळकर
 • पारंपरिक भोंडल्याची गाणी - सौ. सुनंदा वैद्य
 • हादग्याची गाणी - मु.शं. देशपांडे
 • आधुनिक भोंडला गीते- उज्ज्वला सभारंजक

बदल[संपादन]

आधुनिक काळात भोंडला हा केवळ मुलीचा घरगुती कार्यक्रम राहिला नसून त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. विविध सामाजिक संस्था, महिला संघटना , राजकीय पक्ष हे महिला- मुलींसाठी भोंडला आयोजित करतात.[१०]परदेशातील भारतीय लोक तिथे स्थानिक पातळीवर भोंडला आयोजित करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.[११]

हे ही पहा[संपादन]

शारदीय नवरात्र


मूळ मजकूर विकिस्रोतवर स्थानांतरित[संपादन]

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: भोंडला हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:भोंडला येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.संदर्भ[संपादन]

 1. a b Vyavahāre, Śarada (1991). Marāṭhī strī-gīte (mr मजकूर). Pratimā Prakāśana. 
 2. ^ Journal of the Asiatic Society of Bombay (en मजकूर). Asiatic Society of Bombay. 1967. 
 3. ^ Maharashtra (India) (1986). Maharashtra State Gazetteers: Greater Bombay District. (3 v.) (en मजकूर). Directorate of Government Print., Stationery and Publications, Maharashtra State. 
 4. ^ Bhāratīya sãskr̥tikośa (mr मजकूर). Bhāratīya Sã̄skr̥tikośa Maṇḍaḷa. 1962. 
 5. ^ Babar, Sarojini Krishnarao (1968). Folk Literature of Maharashtra (en मजकूर). Maharashtra Information Centre. 
 6. ^ "भोंडला बदलतोय!". १८. १०. २०१५. १६. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 7. a b c लोहिया, शैला (२००२). भूमी आणि स्त्री. औरंगाबाद: गोदावरी प्रकाशन. 
 8. ^ Coraghaḍe, Vimala (1987). Mahāvidarbhātīla lokagītāñce saṅgīta (mr मजकूर). Manohara Granthamāla Prakāśana. 
 9. ^ बाबर, सरोजिनी. लोकसंगीत. 
 10. ^ "फेर धरू गं, फेर धरू..’". १६. १०. २०१९. १६. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 11. ^ "डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ".