भास्कर रामचंद्र भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भास्कर रामचंद्र भागवत
जन्म नाव भास्कर रामचंद्र भागवत
जन्म ३१ मे, इ.स. १९१०
इंदूर
मृत्यू २७ ऑक्टोबर, इ.स. २००१
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार बालसाहित्य, वैज्ञानिक कथा
प्रसिद्ध साहित्यकृती फास्टर फेणे कादंबरी मालिका
बिपिन बुकलवार कादंबरी मालिका
पत्नी लीलावती भास्कर भागवत

भास्कर रामचंद्र भागवत (३१ मे, इ.स. १९१०; इंदूर, इंदूर संस्थान - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार होते. यांनी लहान मुलांसाठी अनेक कादंबऱ्या, विज्ञानकथा लिहिल्या. यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले.

जीवन[संपादन]

भास्कर रामचंद्र भागवतांचा जन्म ३१ मे, इ.स. १९१० रोजी इंदुरात सुधारकी कुटुंबात झाला [१]. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची बी.ए. पदवी घेतली. सुरुवातीपासून त्यांना इंग्रजी साहित्याच्या वाचनाची आणि विज्ञानाच्या अभ्यासाची आवड होती. बहुधा या आवडीच पुढील काळात विज्ञानकथा लिहिण्यास आणि जागतिक साहित्य मराठी बालवाचकांसाठी अनुवादित करण्यास त्यांच्या प्रेरणा ठरल्या असाव्यात[ संदर्भ हवा ].

आरंभिक काळ आणि पत्रकारिता[संपादन]

भागवतांनी इ.स. १९३०च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९३५-३६मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स. १९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते [२]. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादक (इ.स. १९४१-४२) होते.

या कालखंडात भागवत भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते आणि त्याबद्दल त्यांना कारावासही भोगावा लागला [२].

साहित्यिक कारकीर्द[संपादन]

बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या कालिकाचे भागवत संस्थापक होते [२]. इ.स. १९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी कादंबरी स्वैर अनुवाद श्री. बा. ढवळे १९४८, १९९९
आनंदी आनंद गडे राजा प्रकाशन
उमलती कळी राजा प्रकाशन
एक होते सरोवर राजा प्रकाशन
खजिन्याचा शोध पुरंदरे प्रकाशन
जंगलबुकातील दंगल उत्कर्ष प्रकाशन
जुनाट भावलीची भन्नाट कथा उत्कर्ष प्रकाशन
तुटक्या कानाचे रहस्य सुरेश एजन्सी
थँक्यू मिस्टर शार्क उत्कर्ष प्रकाशन
पिझरोचे थैमान
फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन
ब्रह्मदेशातला खजिना मॅजेस्टिक प्रकाशन
भटांच्या वाड्यातील भुतावळ पुरंदरे प्रकाशन
भुताळी जहाज मॅजेस्टिक प्रकाशन
मोठ्या रानातले छोटे घर राजा प्रकाशन
रॉबिन्सन आणि मंडळी पुरंदरे प्रकाशन
शाबास, शेरलॉक होम्स! उत्कर्ष प्रकाशन
साखरसोंड्या उत्कर्ष प्रकाशन
हाजीबाबाच्या गोष्टी मॅजेस्टिक प्रकाशन

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. भा.रा. भागवत. भटांच्या वाड्यातील भुतावळ (मलपृष्ठावर दिलेला लेखकाचा अल्पपरिचय). पुरंदरे प्रकाशन, पुणे. (मराठी मजकूर) 
  2. २.० २.१ २.२ (इ.स. १९९९) कार्तिकचंद्र दत्त: हूज हू ऑफ इंडियन रायटर्स, १९९९ (खंड १). साहित्य अकादमी, पृ. १३३-३४. (इंग्लिश मजकूर)