बालोद्यान पद्धति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालोद्यान पद्धति : (किंडरगार्टन). सामान्यपणे ३ ते ५ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेली शाळा. मराठीत बालकमंदिर ही संज्ञाही रूढ आहे. फ्रीड्रिख फ्रबेल (१७८२–१८५२) हा जर्मन शिक्षणतज्ञ बालोद्यानाचा आद्य प्रवर्तक होय.त्याने फ्रँकफ्रुर्ट, इव्हरडन इ. ठिकाणी अनुक्रमे १८०५, १८०७ मध्ये पेस्टालोत्सीच्या तत्त्वानुसार शाळा चालविल्या. पुढे १८३७ साली ब्लांकेनबर्ग येथे त्याने पहिल्या बालोद्यानाची स्थापना केली. इव्हरडन येथे त्याला योहान हाइन्ऱिक पेस्टालोत्सी या शिक्षणतज्ञाचे सान्निध्य व मार्गदर्शन लाभले आणि त्याचे शिक्षणविषयक विचार परिणत झाले. शिक्षणपद्धतीची सारभूत अशी पुढील तीन सूत्रे त्याने निश्चित केली : (१) बालक हा शिक्षणाचे केंद्र असावा. (२) अध्यापकांची मुलांशी वागणूक प्रेमळपणाची असावी. (३) अध्ययनात पुस्तकी विद्येपेक्षा गाणी, खेळ, उत्स्फूर्त कामे यांस प्राधान्य द्यावे. या तत्वांनुसार फ्रबेलने शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले. स्वित्झर्लंड येथील शिक्षक प्रशिक्षण कार्यात त्याला प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पटले. सत्प्रवृत्त व सहकारी समाज निर्माण करण्याचे ध्येय अनुरूप शिक्षणाने साध्य होऊ शकेल, हे जाणून शिशुशिक्षणाची आदर्श पद्धती शोधून काढण्याच्या मार्गास तो लागला. या मार्गातील पहिले पाऊल म्हणजे १८३७ मध्ये ब्लांकेनबर्ग येथे स्थापलेले बालोद्यान होय.

स्वरूप[संपादन]

फ्रबेलच्या मते शिक्षणाने बालकाचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले पाहिजे. हा विकास बाह्योपचारापेक्षा बालकांच्या स्वयंप्रेरणेने व्हावा. बालक हा स्वभावतः कृतिशील असतो आणि आधी शारीरिक विकास व नंतर बौद्धिक विकास असा त्याच्या विकासाचा क्रम असतो. ही वस्तुस्थिती जमेस धरूनच शिक्षणाचे स्वरूप निश्चित केले पाहिजे. म्हणूनच बालोद्यान पद्धतीत बालकांच्या स्वयंस्फूर्त व्यवसायांना भरपूर वाव असतो पण हे व्यवसाय अविवेकी अथवा स्वैर नसून त्यांचे सावधपणे अनुशासन केले जाते गुरुमुखातून ज्ञान मिळविण्यापेक्षा कृतिद्वारा ज्ञान मिळविणे हे अधिक विकासकारक, संस्कारक,पोषक व परिणामकारक असते. म्हणून शाळेत बालक कृतिमग्न असला पाहिजे आणि त्या त्या कृतीचा उगम त्याच्या स्वयंप्रेरणेतूनच झाला पाहिजे. सर्व अवस्थांतील बालकांच्या शिक्षणाविषयी फ्रबेलचे मुख्य सूत्र ‘विधायक आत्माविष्कार’ हे होय. आत्माविष्कारातूनच जीवनविकास साधला जातो. आत्माविष्काराची सुरुवात गृहसंस्कारातून होते. जेथे हे शक्य होत नाही, तेथे ते बालोद्यानरूपी छोट्या समाजात घडविता येते. सहकार्य, परोपकार, बंधुभाव यांचे शिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे देणे फ्रबेलला महत्त्वाचे वाटले. बालकांच्या मनात उचंबळणाऱ्या प्रेरणा कृतींतून व्यक्त होतात परंतु या कृतींची संधी मिळाली पाहिजे. तसेच या कृती अशा असाव्यात, की ज्या योगाने बालकांची समायोजन शक्ती वाढून विकास सुलभ व्हावा. फ्रबेलची औपचारिक इंद्रियशिक्षणावर श्रद्धा नव्हती. आत्माविष्काराच्या अनुषंगाने ज्या इंद्रिय संवेदना होतात त्यांद्वाराच खरा विकास होतो, असे त्याचे मत होते.

एवंगुणविशिष्ट शिक्षण व्हावे म्हणून फ्रबेलने चार साधनांची योजना केली. पहिले साधन खेळ खेळताना म्हणावयाची गाणी. याचा हेतू आनंद देऊन मुलांची सामाजिक भावना जागृत करणे,हा होय. दुसरेसाधन विविध आकारांच्या व प्रकारांच्या वस्तू (देणग्या) होत. यांत गोल, घन, लंबगोल, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ इ. लाकडी वस्तू व लोकरीचे चेंडू इत्यादिकांचा समावेश होतो. या वस्तूंच्या साहाय्याने मुलांनी निरनिराळे खेळ खेळावयाचे असतात. फ्रबेलच्या मते या आकृती निसर्गातील आणि कलांतील प्रातिनिधिक आकृती असून त्यांच्याद्वारा मुलांना विश्वाच्या एकरूपतेची प्रतीती होते. आधुनिक शिक्षणतज्ञांना फ्रबेलची ही प्रतीकात्मकता पटत नाही. तिसरे साधन व्यवसाय होत. यात वाळूकाम, मातकाम, कागदकाम, बागकाम, लाकूडकाम हा एक भाग असून नृत्य, गायन, चित्रकला, ठोकळ्यांचे (देणग्यांचे) खेळ, गणनविषयक खेळ आणि भाषिक खेळ यांचाही समावेश होतो.वैयक्तिक व्यवसाय आणि सामुदायिक व्यवसाय असे व्यवसायाचे दोन प्रकार होतात. फ्रबेलच्या मते शिक्षणातून वैयक्तिक विकास तसाच सामाजिक विकास झाला पाहिजे. सामुदायिक व्यवसायांतून मुलांना सहकाराचे व स्नेहभावनेचे शिक्षण मिळते, अशी त्याची श्रद्धा होती. चवथे साधन ‘कथा’ होय. शिक्षकाने प्रथम कथा सांगायची, तीवर आधारलेली गाणी म्हणायची, तिचे नाट्यीकरण करावयाचे, नंतर ठोकळ्यांच्या साहाय्याने तिचे चित्रीकरण करावयाचे. अशा विविध स्वरूपांत घोळलेली कथा मुलांच्या मनाची पकड घेई आणि त्यांचे खेळ, कृती व भाषा यांत तिचे पडसाद उमटत.

बालोद्यान पद्धतीतील शिक्षकांचे कार्य म्हणजे मुलांच्या विकासासाठी त्यांच्या आवडीच्या क्रीडांची व व्यवसायांची योजना आखून मार्गदर्शन करणे, तसेच बालकांच्या कार्योद्युक्त इंद्रियांना अनुभव पुरविणे बालकांना विचार आणि कल्पना भाषेमध्ये व्यक्त करावयास साहाय्य देणे होय. फ्रबेलला मुलांचे अनुकरणात्मक खेळ हे सामाजिक सुव्यवस्था व हित साधावयाचे प्रभावी साधन वाटत होते. बालकांना योग्य वळण लावून शिक्षकाने वैयक्तिक समाधान व सामाजिक सुसंवाद ही ध्येये साधावयाची असतात.

विस्तार[संपादन]

फ्रबेलच्या मरणानंतर (१८५२) लगेच बालोद्यान पद्धतीचा प्रसार यूरोपातील अनेक देशांतून झाला. इंग्लंड, फ्रान्स, इटली, डेन्मार्क, स्वित्झर्लंड इ. देशांत बालोद्याने निघाली व लोकप्रिय झाली. इंग्लंडमध्ये १८७५ साली खास प्रचारकार्यासाठी फ्रबेल मंडळाची स्थापना झाली. अमेरिकेत १८५६ नंतर बालोद्यानाच्या स्वरूपात फरक झाला. प्रतीकात्मकतेवर आधारलेल्या देणग्या टाकून देण्यात आल्या पण स्वयंस्फूर्त क्रीडा व व्यवसाय यांद्वारा बालकांचा आत्मविकास घडवून आणणे, हा फ्रबेलच्या पद्धतीचा गाभा कायम राहिला. त्याच्या कार्याचा एक परिणाम असा झाला, की हस्तव्यवसायाच्याद्वारा शिक्षण देण्याची कल्पना निघून ती फिनलंड व स्वीडन या देशांत रूढ झाली.

फ्रबेलच्या विचारांचा प्रत्यक्ष प्रभाव भारतात दिसून आला नाही. येथे बालोद्याने २० व्या शतकापर्यंत निघालीच नाहीत आणि आजही जी शिशुमंदिरे आहेत, ती बालोद्यान पद्धतीची नाहीत. त्याच्या विचारांचा अप्रत्यक्ष प्रभाव मात्र प्राथमिक शाळांत ‘वस्तुपाठ’ रूढ करण्यात दिसून आला. फ्रबेलने पुस्तकी विद्या गौण मानली होती. या तत्त्वाचा त्याच्या अनुयायांनी असा अर्थ केला, की वस्तूंच्या द्वारा शिक्षण दिले पाहिजे. अशा रीतीने वस्तुपाठाची कल्पना रूढ झाली.


अमेरिकेतील अद्ययावत बालोद्यानांत कथा, गायन, खेळ, व्यवसाय हेच कार्यक्रम आहेत पण त्यांत साधनांची विपुलता आढळते. उदा., लोहचुंबक, चक्की इ. उपकरणे शास्त्रीय प्रयोगांसाठी, चढण्याउतरण्याच्या शिड्या व तिचाकी गाड्या खेळासाठी उपलब्ध असतात.

बालोद्यानाची कल्पना महाराष्ट्रात बालवाडीच्या रूपाने १९७८ मध्ये साकार झाली. महाराष्ट्र शासनाने एक शिक्षकी शाळेस जोडून शिक्षणप्रसारासाठी २,४९२ बालवाड्या उघडल्या आहेत. बालवाडी सुरू करण्याची प्रमुख उद्दिष्टे अशी आहेत : (१) बालकांना शाळेबद्दल आवड निर्माण करून त्यांना नियमित शाळेत येण्यासाठी सवय लावणे (२) त्यांना आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावणे (३) मुक्त हालचाली खेळ, गाणी, रचनात्मक कार्यक्रम यांच्याद्वारा त्यांना कृतिशील बनविणे (४) गोष्टी, कथा, नाट्य यांच्याद्वारा चांगले संस्कार करणे. हा प्रयोग नुकताच सुरू झाला असल्याने त्याची फारशी प्रगती झालेली नाही.

संदर्भ[संपादन]

1. Heffernan, H. Todd, Vivian, The Kindergarten Teacher, Boston, 1960.

2. Pratcher, M.H. Teaching in the Kindergarten, New York. 1967.