Jump to content

प्लेटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्लाटोन् या पानावरून पुनर्निर्देशित)
प्लेटो (Πλάτων)
सिलानिअन ने बनविलेला अर्धपुतळा
जन्म इ.स.पू. ४२८/४२७
अथेन्स
मृत्यू इ.स.पू. ३४८/३४७
अथेन्स
राष्ट्रीयत्व ग्रीस
विषय कला, साहित्य, न्याय, नीतिशास्त्र, राजकारण, शिक्षण, कुटुंब, लष्करशाही
प्रभाव प्लेटोचा वास्तववाद

प्लेटो (ग्रीक: Πλάτων, प्लेटॉन, पसरट)[] ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.[] प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता. पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटोचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राजा हा राज्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. राजाची आज्ञा सर्व प्रजेने मानली पाहिजे. भूतलावरील परमेश्वराच दैवी अंश म्हणजे राजा आहे. राजाज्ञा ही प्रमाण मानून प्रजेने राजाच्या प्रती समर्पीत असले पाहिजे. राजा हा एकाच वेळी प्रजापालक व प्रजापिता ही आहे. शासन करण्याचा अधिकार जन्मतः राजाला प्राप्त आहे. यासंदर्भामध्ये प्लेटोने आपल्या राजकीय विचारांची मांडणी केलेली आहे.[]

प्लेटोचे तत्त्वज्ञान

[संपादन]

सत्सामान्ये

[संपादन]

प्लेटोच्या मते, हे तुमचे-आमचे जग, यातील सर्व वस्तू मुळात अस्सल शंभर टक्के खऱ्या नाहीत. त्यातील सर्व काही या जगाबाहेरील अस्सल, कायम सत्य अशा तात्त्विक कल्पनांची नक्कल आहे. जितक्या प्रकारच्या वस्तू व घटना आपल्याला अनुभवता येतात तितकी सत्सामान्ये (आयडिया) असतात. उदा. मावळता नारिंगी सूर्य, उमलते कमळ, निळा जलाशय, हसरे बालक या सर्वांमध्ये ‘सौंदर्य’ असते. अनेक वस्तूंमध्ये समानतेने राहणारे सौंदर्य हे नित्य असते, पण ज्यातून ते दिसते त्या सर्व वस्तू अनित्य असतात. संवेद्य, परिवर्तनीय वस्तूंचे सत्य कमी प्रमाणात असते तर शौर्य, क्रौर्य, शुभ्रत्व, शीतत्त्व, घटत्व वगैरे कल्पना अर्थात सत्सामान्ये ही नित्य, निश्चल, विचारावर आधारित परिपूर्ण असतात. सत्सामान्यांचे जग स्वतंत्र आणि तुमचे-आमचे व्यवहाराचे जग कमी प्रतीचे, त्यापेक्षा वेगळे असे प्लेटोचे म्हणणे आहे. दिक्कालाने मर्यादित नसलेले आकार (फॉर्म्स) म्हणजेच आयडियाज अल्प प्रमाणात या जगातील वस्तूंमध्ये उतरतात. या सत्सामान्यांची रचना पिरॅमिडसारखी असून सर्वात वरच्या टोकाचे स्थान कल्याणप्रद अशा कल्पनेला म्हणजे ‘द गुड’ला जाते. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात सत्सामान्ये व त्यांची व्यवस्था समजणे हे उच्च प्रतीचे ज्ञान मानले गेले. त्याला तो डायलेक्टिक्स म्हणतो.

सत्सामान्यांची उपपत्ती

[संपादन]

एकूण विश्वाचे स्वरूप सांगताना प्लेटोला ईश्वर, सत्सामान्ये व इंद्रियसंवेदनांना उपलब्ध जग अशा तीन गोष्टींची आवश्यकता भासते. विशिष्ट काळात तयार झालेल्या जगामागे ईश्वर असून तो सत्सामान्यांच्या आधारे हे जग तयार करतो अशी त्याची कल्पना आहे. बुद्धिनिष्ठतेला, सत्सामान्यांना प्राधान्य देताना जगाच्या उत्त्पत्तीत ईश्वराला निर्माता म्हणून असलेले स्थान प्लेटो कायम ठेवतो. खरा चमत्कारिक प्रसंग निर्माण होतो तो म्हणजे कल्पनांचे खरेखुरे जग आणि हे इंद्रियांना जाणवणारे कमअस्सल जग यांचा संबंध निश्चित करताना होणारी त्याची तारांबळ. जर सत्सामान्ये येथील जगाच्या वस्तूंमध्ये सहभाग (पार्टिसिपेशन) घेतात तर इतक्या अलिप्तपणाने स्वतंत्र वास्तव्य ती कशी काय करतात ?

आयडियांच्या सिद्धांतावरील आक्षेप

[संपादन]

मनुष्य व मनुष्याची आयडिया ह्यांत जो साधारण भाग आहे, त्यासाठी मनुष्याची आयडिया-२ असली पाहिजे, व मग पहिल्या आयडियात व दुसऱ्याचत असणाऱ्या समान भागासाठी आयडिया-३ असली पाहिजे. अशा रीतीने अनवस्था प्रसंग येतो. विशिष्ट वस्तू आयडियांत कशा सहभागी होतात? आयडिया सबंध वस्तूंत येत असेल तर जितक्या वस्तू तितक्या आयडिया होतात, भागशः येत असेल तर ती विभाजनीय आहे; म्हणून आयडिया एक व अविभाज्य असू शकत नाही. सॉक्रेटिस उपाय सुचवतो की, यासाठी आयडिया मनातच आहेत असे समजावे. पार्मेनिडीझ म्हणतो : मनातील कल्पना कशाच्या तरी असतात. आयडिया केवळ विचारच असेल तर ती वस्तूंत कशी असेल? समजा, आयडिया असल्याच तर त्या सीमित मनुष्यांना कशा करणार? शुद्ध आयडिया शुद्ध आत्म्यांत म्हणजे ईश्वरांत राहणार. तसेच ईश्वराला व्यावहारिक वस्तूंचे ज्ञान होणार नाही म्हणून या सिद्धांतातून आपल्याला आयडिया अज्ञेय व ईश्वराला व्यवहार अज्ञेय असा दुहेरी अज्ञेयवाद होतो. आयडियांचा एकमेकींशी संबंध काय आहे? त्यांचे संघटन व विघटन करता येते का? त्यांचे वर्ग होतात काय?

प्लेटोची गुहा

[संपादन]

प्लेटोच्या तत्त्वज्ञानाची भाषा मुख्यत: साहित्यिक राहिलेली आहे. त्याच्या शास्त्रीय व तात्त्विक सिद्धान्ताचे आविष्करण करताना तो रुपके वापरतो. ‘रिपब्लिक’ मध्ये बौद्धिक विकासाची प्रक्रिया मांडताना प्लेटोने एक गुहेचे रुपक वापरलेले आहे. त्या अंधाऱ्या गुहेत दोरखंडाने बांधलेले काही कैदी तुरुंगाच्या भिंतीकडे बघू शकतात अशी कल्पना केली आहे. ते एकमेकांकडे वळूनही बघू शकत नाहीत. त्यांच्या पाठीमागे उंचावर एकमेव झरोका आहे. त्यातून भिंतीवर उजेड पडतो. उजेडाकडे पाठमोर्या असलेल्या कैद्यांना बाहेरील व्यक्तींची हालचाल भिंतीवरील पडछायांच्या स्वरूपात फक्त दिसते. बाहेरील व्यक्ती डोक्यावर पुतळे घेऊन इकडेतिकडे हालचाल करीत आहेत. गुहेबाहेरील त्या व्यक्ती वस्तू इकडून तिकडे हलवतात त्याची ‘छायाचित्रे’ कैद्यांना बघता येतात. कैद्यांच्या जगाच्या वास्तवाच्या कल्पनेत असते ते छायाकृतींचे जग. त्यापलीकडे अन्य काही नाही. गुहेतील एखाद्या कैद्याला मुक्त होण्याची संधी मिळून जेव्हा तो गुहेबाहेरील स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेले जग बघू शकतो तेव्हा आधीच्या अनुभवात उतरलेले जगाचे स्वरूप वास्तविक नव्हते हे त्याच्या लक्षात येते. शृंखलांमधून, मर्यादांमधून बाहेर पडल्यावर छायांचे जग संपते. सूर्यप्रकाशाने माखलेल्या या जगापलीकडे अधिक आणि अंतिम अर्थी सत्य तो आणखी प्रयत्नांनी पाहू शकतो. हे जमते तेव्हा प्रकाशातील जगापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशाचा स्रोत असलेल्या देदीप्यमान अशा सूर्याच्या वास्तवाची त्याला जाण येते. ही ज्ञानाची सर्वात वरची पायरी आहे. हा सूर्य जगातील सर्वात शिवाचे (द गुड) प्रातिनिधिक रूप आहे.

या गुहेच्या रुपकातून प्लेटोने विवेकी मनाचा विकास अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या पायरीपासून विवेकापर्यंत, अंधकारापासून प्रकाशाच्या वाटेकडे कसा होतो हे दाखवले. जाणिवेला विशेष प्रयत्नांनी प्रकाशाकडून प्रकाशाच्या उगमापर्यंत जाता येते. सूर्याच्या दर्शनानंतर अंधकारात बंदी असलेल्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणारी काही माणसे असतात पण गुहावासियांना प्रकाश पाहिलेल्यांचा भरवसा वाटतो असे नाही. एका अर्थाने गुहेचे रुपक हे सॉक्रेटिसच्या आयुष्याला चपखलपणे लागू होते हा योगायोग नक्कीच नसावा.

आत्म्याचे अमरत्व

[संपादन]

फीडो ह्या संवादाचे उद्दिष्ट आत्म्याचे अमरत्व सिद्ध करणे हा आहे. आकारांच्या सिद्धांताचा वापर करून हे दाखविता येते. सॉक्रेटिसचा आत्मा म्हणजे सॉक्रेटिसच : सॉक्रेटिसचा आत्मा टिकणे याचा अर्थ विशुद्ध अवस्थेतील सॉक्रेटिसच टिकणे असा होतो. सॉक्रेटिसने आयुष्यभर स्वतःला (आत्म्याला) शरीरावरील अवलंबित्वापासून सोडविण्याचा प्रयत्न केला. शरीर हे नेहमीच आत्म्याच्या गतिविधींवर मर्यादा आणीत असते. शरीराच्या भुका आणि इच्छा आत्म्याला ज्ञान आणि चांगुलपणाची कास धरू देत नाहीत. आत्मा मृत्यूनंतरही टिकून राहतो असे समजण्यामागे चार युक्तीवाद आहेत.

  1. निसर्गातील घटना या चक्रीय स्वरूपाच्या आहेत. आत्म्याने अनेक जन्म घेतलेले आहेत आणि निसर्गातील चक्रियता आत्म्यालाही लागू होते.
  2. ज्याला मनुष्य “ज्ञान” म्हणतो ते मुळात “स्मरण” असल्याने आत्म्याचे जीवन शरीरावर अवलंबून नाही हे सिद्ध होते; किमानपक्षी तसा अंदाज बांधता येतो.
  3. आत्मा चिरंतन, अपरिवर्तनीय आणि निरवयवी (सिंपल) असलेल्या आकारांचे मनन (ध्यान) करतो; आत्मा आकारांप्रमाणेच आहे; म्हणून तो अविनाशी आहे.
  4. हा युक्तीवाद तपशीलवार आणि लक्षवेधक आहे. असणे (बिइंग) आणि बदलामागील कारणे शोधताना सॉक्रेटिस आकारांचा सिद्धांत वापरतो. उदा., एखादी गोष्ट तापते, ती उष्णतेमध्ये सहभागी झाल्याने तापते. आणखी पुढे जाऊन, अग्नीमध्ये सहभागी झाल्याने ती तापते असे म्हणता येईल. (अग्नीसोबतच उष्णता येते.) आता अग्नी जर उष्णता आणीत असेल, तर तो शीतलतेचा स्वीकार करणार नाही. कारण शीतलता ही अग्नीची विरोधावस्था आहे. हाच युक्तीवाद आत्म्याला लावल्यास – मनुष्य जीवनामध्ये सहभागी होऊन जिवंत राहतो, आणि जीवन हे आत्म्यांसोबतच येते. आत्मा जीवन आणीत असल्याने तो मृत्यू कधीही स्वीकारणार नाही.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Diogenes Laertius 3.4; p. 21, David Sedley, Plato's Cratylus, Cambridge University Press 2003
  2. ^ "Plato". Encyclopaedia Britannica. 2002.
  3. ^ विजय देव, शरद गोसावी,, संज्योत आपटे (२०१२). पाश्चात्य राजकीय विचारवंत. पुणे: डायमंड पब्लिकेशन्स. pp. २४-२५. ISBN 978-81-8483-477-2.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)