Jump to content

पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा
इ.स. १४९७इ.स. १९६१


पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा या पोर्तुगालने भारतात व्यापार करण्यासाठी इ.स. १४९७ सालापासून काढलेल्या मोहिमा होत.

इतिहास

[संपादन]

इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स'[श १] असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून 'केप ऑफ गुड होप'[श २] असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याने मोझांबिक येथे आला. त्यावेळी मोझांबिक हे प्रगत बंदर होते व तिथे मिलिंद या राजाचे शासन होते. या बंदरात वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला. कालिकतपासून उत्तरेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या कप्पड[टीप १] या लहानशा खेड्यात त्याने १७ मे, इ.स. १४९८ रोजी नांगर टाकला व त्यानंतर तीन दिवसांनी तो त्याची जहाजे घेऊन कालिकत बंदरात आला. या मोहिमेमुळे युरोपकडून भारताकडे थेट येणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला.

कालिकतचे हिंदू राज्य प्राचीन चेरा साम्राज्याच्या अकरा वारसा राज्यांपैकी एक होते. वास्को द गामा कालिकतला आला त्यावेळी तिथला शासक नेडीयिरुप्पू स्वरूपम 'झामोरीन' या त्याच्या आनुवांशिक बिरुदावलीने ओळखला जात होता. झामोरीनच्या राज्यातील कालिकत हे बंदर असलेले शहर मसाल्याच्या व कापडाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सागरी व्यापारामुळे समृद्ध असलेल्या कालिकतचे झामोरीन हे सार्वभौम शासक होते व त्यांनी जवळजवळ आठ शतके त्यांचे स्वतंत्र अस्तित्त्व कायम राखलेले होते. त्यांनी दिल्लीच्या मुघल प्रभुत्वाला कधीही मान्यता दिलेली नव्हती. ते त्यांच्या आदरातिथ्य, धार्मिक सहिष्णुता आणि सर्व देशांच्या व्यापाऱ्यांना आश्रय देण्याबद्दल प्रसिद्ध होते. परकीय व्यापाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत व दलालांसमवेत राहता यावे म्हणून झामोरीनच्या प्रभावक्षेत्रातील समुद्रकिनारपट्टीवर त्यांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

पोर्तुगालला परतण्यापूर्वी वास्को द गामाने कालिकत येथे तीन महिने वास्तव्य केले. त्याला त्याची ही मोहीम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागली. या मोहिमेत त्याच्या ११५ खलाशांना प्राण गमवावे लागले. त्याचे एक जहाज बुडाले आणि दुसऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले. तो दोन जहाजांसह मायभूमी पोर्तुगालला परतला. त्याच्या दोन्ही जहाजांत भारतीय माल पूर्णपणे भरलेला होता. या मोहिमेत सर्व खर्च वजा जाता वास्को द गामाला साठपट फायदा झाला. वास्को द गामाच्या या यशस्वी मोहिमेचे जगभर दूरगामी परिणाम झाले.

वास्को द गामाने शोधलेल्या नवीन सागरी मार्गामुळे दळणवळणाच्या माध्यमातून पश्चिम युरोपातील देश पूर्वेच्या जवळ आले आणि पाश्चात्त्य सत्तांच्या वसाहतवादाला चालना मिळाली व युरोपच्या भारत व दक्षिण-पूर्व आशियाशी चालणाऱ्या व्यापारावर एकाधिकार प्रस्थापित करण्याची संधी पोर्तुगीजांना मिळाली. यामुळे युरोपच्या पूर्वेकडील देशांशी असलेल्या व्यापारावर इटलीचा जो एकाधिकार होता त्यालाही धक्का बसला. नवीन समुद्री मार्गाच्या शोधाने भारतही जागतिक राजकारणात गुंतला आणि युरोपीय देशांच्या विस्तारवादाला बळी पडला. सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात व्यापारी म्हणून आले. त्यांच्यापाठोपाठ डच, इंग्रजफ्रेंच आले.

व्यापारी मोहिमा

[संपादन]

पोर्तुगीजांनी केप मार्गाचा शोध लावल्याने भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्गांचा वापर करणारे पोर्तुगाल हे पहिले पश्चिम युरोपीय राष्ट्र ठरले. वास्को द गामाच्या भारतातील यशस्वी मोहिमेनंतर पेड्रो अल्वारेझ कॅब्रल याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने दुसरी व्यापारी मोहीम काढली. तो पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथून १३ जहाजांमधून १२०० खलाशांचा तांडा ९ मार्च, इ.स. १५०० रोजी भारताकडे निघाला. पुढे सागर सफरीत वाईट हवामानामुळे जहाजांचा हा काफिला भरकटला व ब्राझीलकडे गेला. तिथून तो भारताकडे वळला आणि १३ सप्टेंबर, इ.स. १५०० रोजी कालिकत येथे पोहोचला.

पोर्तुगीजांनी त्यांची पहिली वखार कालिकत येथे झामोरीनच्या रीतसर परवानगीने बांधली. पो्तुगीजांच्या आधी काही अरब व्यापारीही कालिकत येथे झामोरीनच्या परवानगीने व्यापारासाठी आलेले होते आणि त्यांना झामोरीनच्या दरबारी चांगला मान होता. पण पोर्तुगीजही कालिकत येथे व्यापारासाठी आल्याने व झामोरीनने त्यांना तशी परवानगी दिल्याने अरबांच्या कालिकत येथून आशिया व युरोपदरम्यान चालणाऱ्या व्यापाराच्या एकाधिकाराला धक्का बसला. परिणामी अरब आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांत तंटे चालू झाले. अरबांना झामोरीनकडे मान होता. झामोरीनने त्याच्या राज्यात शांतता राखण्यासाठी पोर्तुगीजांनाच खडसावले. त्यामुळे पोर्तुगीजांनी कालिकत आणि कोचीनच्या राज्यात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. यामुळे जो संघर्ष उद्भवला त्यात कॅब्रल आणि त्याच्या साथीदारांचा पराभव झाला. त्यामुळे पेड्रो अल्वारेझ कॅब्रलला इ.स. १५०१ साली पोर्तुगालला परतावे लागले. जाताना त्याच्याजवळ त्याची केवळ पाच जहाजे शिल्लक राहिलेली होती. जाताना त्याची ही पाचही जहाजे भारतीय मालाने काठोकाठ भरलेली होती. पोर्तुगालला गेल्यानंतर त्यांतून त्याला खूप मोठा नफा मिळाला.

पेड्रो अल्वारेझ कॅब्रलच्यानंतर पोर्तुगालची तिसरी व्यापारी मोहीम जोआस द नोव्हा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालहून निघाली. इ.स. १५०१ सालीच तो कालिकतला पोहोचला. कालिकतला आल्यावर झामोरीनने जोआस द नोव्हा आणि त्याच्या सहकारी व्यापाऱ्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांना त्याच्या प्रजेशी शांततेने व्यापार करण्याची परवानगी दिली.

पोर्तुगालची चौथी व्यापारी मोहीम वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली निघाली. तो दिनांक २९ आॅक्टोबर, इ.स. १५०२ साली दुसऱ्यांदा कालिकत बंदरात उतरला. यावेळी त्याने त्याच्यासोबत वीस मोठी जहाजे व शस्त्रसज्ज नौदल सोबत आणले होते. आल्यावर त्याने कालिकतच्या शासकाच्या मर्जीविरुद्ध कालिकत, कोचीन आणि कण्णूर येथे व्यापारी केंद्रे सुरू केली. वास्को द गामाच्या या दुसऱ्या मोहिमेवेळी सगळ्या मलबार किनाऱ्यावर जी लहान-लहान राज्ये होती, ती सरंजामदार प्रमुखांच्या ताब्यात होती. पोर्तुगीजांच्या विस्तारवादाला आळा घालू शकेल असा एकही प्रबळ राजा त्यावेळी संपूर्ण मलबार किनाऱ्यावर नव्हता. पोर्तुगीजांजवळ भारतीयांपेक्षा प्रभावी शस्त्रे होती व त्यांची जहाजेही समुद्रातील भारतीय जहाजांपेक्षा जास्त शक्तिशाली होती.

व्यापाराच्या माध्यमातून संपत्ती अर्जित करणे आणि ख्रिस्ती धर्मप्रसार करणे ही उद्दिष्ट्ये घेऊनच पोर्तुगालने भारतातील व्यापारी मोहिमा काढल्या होत्या. व्यापारासाठी वसाहती वाढविणे आणि पूर्वेला साम्राज्य प्रस्थापित करणे हे पोर्तुगीजांच्या या व्यापारी मोहिमांचे ध्येय होते. या मोहिमा पोर्तुगालच्या व्यापारी उपक्रमाचा भाग असल्याने आपल्या राष्ट्राच्या तिजोरीत भर घालण्यासाठी व्यापार आणि लूट हे मार्ग त्यांनी अवलंबिले. इ.स. १५०३ नंतर पोर्तुगालने दरवर्षी भारतात व्यापारी मोहिमा काढणे बंद केले.

अल्मेडा

[संपादन]

पोर्तुगीजांच्या व्यापारी मोहिमा या पोर्तुगाल सरकारच्या उपक्रमाचाच एक भाग असल्याने पोर्तुगीजांनी भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा त्यांच्या व्यापारी वखारी उभारल्या गेल्या तेव्हा तेथे निवासी प्रशासक नियुक्त करण्याची आवश्यकता तेव्हाच्या पोर्तुगाल सरकारला वाटू लागली. त्यामुळे पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी इ.स. १५०५ साली फ्रान्सिस्को द अल्मेडा हा तीन वर्षांसाठी भारतात आला. त्याच्या दिमतीला अत्यावश्यक तो कर्मचारीवर्ग देण्यात आला व नोकरशाहीचे उच्च पद निर्देशित करणारे भारताचा व्हाइसरॉय हे नामाभिधान त्याला देण्यात आले.

अल्मेडाने अरबांच्या अरबी समुद्रातील एकाधिकाराला आव्हान दिले व त्यांच्यावर सतत आक्रमणे करून त्यांचा पराभव केला. परिणामी अरबी समुद्रात युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने भारतीय वाणिज्य व व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. मलबार समुद्रकिनाऱ्यावरील भारतीय शासकांनी अल्मेडाच्या या अरेरावीबद्दल त्याला जाब विचारला तेव्हा अल्मेडाने त्यांनाही प्रत्युत्तर दिले. कालिकतच्या झामोरीनचे आरमार पूर्णपणे नष्ट करण्यात आले. कोचीनच्या हिंदू शासकानेही पोर्तुगीजांच्या मागण्या मान्य केल्या. पोर्तुगीजांनी मलबार किनाऱ्याजवळील लहान लहान बेटे ताब्यात घेतली आणि कोचीन, कन्ननूरअंजदीव येथे लहान किल्ले बांधले. पोर्तुगीजांच्या या दबावतंत्रामुळे भारताचा व्यापार केप मार्गाकडे वळला. अरबांनंतर इजिप्शियन्सना पोर्तुगीजांच्या अरबी समुद्रातील अस्तित्त्वाचा जाच होऊ लागला. त्यांच्यात झालेल्या सागरी युद्धात अल्मेडा पराभूत झाला.

अल्बुकर्क

[संपादन]

अल्फान्सो द अल्बुकर्क हा पोर्तुगील आरमाराचा उपनौदलप्रमुख म्हणून इ.स. १५०६ साली भारतात आला. त्याने अल्मेडाच्या अरबविरोधी मोहिमातही भाग घेतला होता. अल्मेडानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील भूप्रदेशाचा व्हाइसरॉय म्हणून त्याने सूत्रे हाती घेतली. याकाळापासून पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले.

पारिभाषिक शब्दसूची

[संपादन]
  1. ^ इंग्लिश: Cape of Storms, मराठी: वादळाचे भूशिर
  2. ^ इंग्लिश: Cape of Good Hope, मराठी: आशेचे भूशिर

तळटीपा

[संपादन]
  1. ^ कप्पड बीच - येथील एका दगडी स्तंभावर वास्को द गामाने त्याची जहाजे नेमकी कोठे नांगरली याचा थोडक्यात उल्लेख आहे.