पुंथानम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संत पुंथानम् (मल्याळम-പൂന്താനം) ( इस.१५४७ मृत्यू: इ.स.१६४०) हे एक मल्याळी संतकवी होते. ते गुरुवायुरप्पाचे (म्हणजे श्रीकृष्णाचे) भक्त होते.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

पुंथानमचा जन्म इ.स. १५४७ साली माघ-फाल्गुन महिन्यात एका नंबुद्री ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा विवाह एका मोठ्या घराण्यातील देवकी नावाच्या स्त्रीशी झाला खरा, परंतु संतानप्राप्तीच्या अभावी ते सदैव उदास राहू लागले. संतानप्राप्तीच्या इच्छेने त्यांनी गुरुवायुर येथे "संतान गोपालम्" स्तोत्राचे नित्य पारायण करून तेथील भगवान श्रीकृष्णाची उपासना सुरू केली. काही काळानंतर त्याला पुत्रप्राप्ती झालीही, पण,

पुंथानमच्या बाळाच्या अपघाती निधनाच्या आख्यायिका[संपादन]

पुत्रप्राप्तीच्या सुखामुळे उभयता पती-पत्‍नी अत्यंत आनंदी झाले. मुलगा दिवसामासी वाढू लागला. बाळ सहा महिन्याचा झाला तेव्हा त्याच्या अन्नप्राशनाच्या कार्यक्रमाकरिता त्यांनी एका भव्य समारंभाची आणि मेजवानीची योजना केली आणि जवळच्या तसेच दूरच्या सर्वांनाच निमंत्रण धाडले. एका भव्य खोलीत पुंथानमचे बाळ एका चटईवर झोपले होते आणि त्याच्यावर एक पांढरी स्वच्छ चादर पांघरलेली होती. झोपलेल्या बाळाजवळच स्वयंपाकी मोठ्या प्रमाणावर भात शिजवत होते. केरळ राज्यातील वहिवाटीप्रमाणे मोठमोठ्या मेजवान्यांकरिता शिजवलेला भात एका मोठ्या चटईवर ओततात, ज्याला तिथे परंबू असे म्हणतात. दुर्दैवाने, स्वयंपाक्यांपैकी कोणाचेही लक्ष झोपलेल्या बाळाकडे न गेल्याने, चटईवर उपडा केलेला भाताचा ढीग पसरून त्यामध्येच बाळ पुरले गेले. गरम भाताची आच सहन न झाल्याने गुदमरून बाळाचे थोड्याच वेळात प्राणोत्क्रमण झाले, परंतु घरच्यांपैकी कोणाच्याही ते लक्षात येऊ शकले नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अन्नप्राशनाचा शुभमुहूर्त जवळ येईतोवर पंधरा पोत्यांमधील तांदळाचा गरम भात बाळाच्या अंगावर उपडा होऊन त्याचा त्या ढिगाखाली जीव गेल्याचे कोणाच्याही लक्षात येऊ शकले नाही.

दुसऱ्या एका वदंतेनुसार अन्नप्राशनाच्या कार्यक्रमाकरिता आलेल्या सर्व स्त्रियांनी माजघरात कपडे बदलत असताना तिथेच अंधारात झोपवलेल्या बाळाच्या अंगावर सर्व वस्त्रे टाकली, ज्यांच्या ओझ्याखाली बाळ गुदमरून मरून गेले.

आणखी एका वदंतेनुसार, पाळण्यामध्ये झोपविलेल्या बाळाच्या अंगावर सर्व नातेवाईक अनवधानाने भेटवस्तू ठेवत गेल्याने त्याच्याखाली गुदमरून बाळ मरून गेले. ह्या घटनेमध्ये एकच गोष्ट महत्त्बाची आहे आणि ती म्हणजे, पुंथानमचा एकुलता एक मुलगा अगदी सहा महिन्याचा असतानाच मृत्यू पावला.

अन्नप्राशनाचा मुहूर्त जवळ येताच मुख्य पुरोहिताने बाळाला घेऊन येण्यास सांगितले. परंतु जेव्हा देवकी बाळाला घेऊन येण्यास आली, तेव्हा तिच्या प्रिय पुत्राला झोपविलेल्या जागी तिला केवळ वाफाळलेल्या गरम भाताचा एक डोंगर काय तो दिसला. नशिबाचे चक्र म्हणा, जीवन म्हणजे काय याचा अर्थसुद्धा न कळलेल्या बाळाचा जीव त्याच्याच जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग साजरा करण्याकरिता निवडलेल्या शुभमुहूर्तावरच गेला होता.

ज्ञानप्पान[संपादन]

पुंथानमच्या स्वतःच्या जीवनात घडलेली शोकांतिकाच तो एकुलत्या एका पुत्रशोकाचे अपरिमित दुःख आणि वेदना सहन करीत असताना त्याच्या जगविख्यात "ज्ञानप्पान" ह्या रचनेस कारणीभूत ठरली. त्याने त्याच्या मृत पुत्राकरिता त्याच्या मनात असलेल्या वात्सल्याचा भगवान गुरुवायुरप्पावर (भगवान श्रीकृष्ण) वर्षाव केला, ज्याला तो "उन्नीकृष्णन्" (म्हणजे लहानगा कृष्ण) म्हणत असे. आजही आपण केरळमधील गुरुवायुरच्या प्रख्यात मंदिरामध्ये प्रभातकाली निर्माल्य सेवेच्या वेळी ह्या उन्नीकृष्णन्चे दर्शन घेऊ शकतो. स्वतःच्या जीवनात घडलेल्या शोकांतिकेच्या क्षणापासून पुंथानम गुरुवायुरच्या उन्नीकृष्णन्‌‍वर पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेऊ लागला.

त्याने गुरुवाय्रुरच्या उन्नीकृष्णन्ला स्वतःचा पुत्र मानला आणि त्या वात्सल्यभक्तिद्वारे त्याने ज्ञानप्राप्ती करून घेतली. त्याच्या ज्ञानप्राप्तीची सुरुवात "कुमार हरणम्"च्या नित्य पठणापासून सुरू झाली. असे सांगितले जाते की तो वारंवार म्हणत असे, "ही सर्व त्या भगवंताचीच लीला आहे. आज जो वैभवात लोळत आहे, तोच उद्या भुकाकंगाल होतो. जेव्हा साक्षात उन्नीकृष्णन् माझ्या हृदयात खेळत असताना, मला माझा स्वतःचा पुत्र असणे आवश्यक आहे का?" पुत्रशोकाने विव्हल झालेले असे किती बाप ह्या जगात संत पुंथानमप्रमाणे भगवंतावरील अढळ श्रद्धेमधून समाधान प्राप्त करीत असतील? परंतु असे समाधान पुंथानमला प्राप्त झाले कारण गुरुवाय्रुरप्पाच्या भक्तिने तो अंतर्बाह्य भरून गेल्याने त्या भगवंताचा एक श्रेष्ठ भक्त म्हणून गणला गेला होता. गुरुवायुरप्पाच्या भक्तिच्या प्रभावेकरून पुंथानम कित्येक दिवस गुरुवायुरच्या मंदिरातच भगवंतासमोर प्रार्थना करण्यात व्यतित करीत असे, गुरुवायुरचे मंदिर हे जणुकाही त्याचे दुसरे घरच होऊन गेले होते. पहाता पहाता त्याला त्याच्या मनाची शांति, समाधान आणि समतोलपणा त्याला पुन्हा प्राप्त झाला. मनुष्याच्या चंचल स्वभावानुसार, भक्तिरसात स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकण्याचा कितीही प्रयत्‍न करूनही पुंथानम स्वतःच्या बाळाचा मृत्यू विसरू शकला नाही. मुलाच्या मृत्यूला एक दशक उलटून गेल्यानंतरही पुंथानम स्वतःच्या एकमेव मुलाचा मृत्यु विसरू शकत नव्हता. त्याचवेळी एक चमत्कार घडला. अखेरीस पुंथानम धीरोदात्तपणे स्वतःचे वैयक्तिक दुःखाचे सत्य स्वीकारून भगवंताच्या इच्छेला पूर्णपणे शरण गेला आणि असीम दया असलेल्या गुरुवायुरच्या भगवंताने पुंथानमला बाल कृष्णाच्या दिव्य स्वरूपात म्हणजे उन्नीकृष्णन्‌‍च्या रूपात दर्शन देऊन धन्य केले. त्यावेळी त्याच्या मुखातून अचानक उद्गार बाहेर पडले, "जर बाल कृष्ण माझ्या मनात सदैव खेळत असताना, मला स्वतःचे मुल असण्याची आवश्यकता आहे का?" त्याच क्षणापासून भगवान कृष्णाने पुंथानमला "ज्ञानप्पान"ची रचना करण्याची प्रेरणा दिली. सर्व मल्याळी लोक ज्ञानप्पान या ग्रंथाला भक्तियोगाचे प्रतिक मानतात. ज्ञानप्पान या काव्यातून भगवान गुरुवायुरप्पा त्याच्या भक्तांना हे दाखवून देतो की ज्याची भगवंतावर अढळ श्रद्धा आहे अशा व्यक्तीच्या दुःखी आणि तळमळणाऱ्या आत्म्यांकडून दैवी काव्याची रचना होऊ शकते. पुंथानमच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचा शोक त्याला साध्या आणि सोप्या मल्याळम् भाषेत अनुपम अशा श्लोक रचनेस कारणीभूत ठरला.

जरी पुंथानमचे शिक्षण फार झाले नव्हते तरीदेखील तो काव्यरचना करू लागला. तत्कालीन पंडित, मेलपतुर नारायण भट्टाद्री संस्कृत भाषेचा त्याच्या समकालीन एक गाढा विद्वान होता. पुंथानमने आपल्या "ज्ञानप्पान" मधील चुका दुरुस्त करण्याची विनंती मेलपतुरला विनंती केली. परंतु मेलपतुरला त्याच्या विद्वत्तेचा अहंकार असल्याने प्राकृत भाषेत लेखन करणाऱ्यांना तो तुच्छ लेखत असे. त्यामुळे त्याने पुंथानमला त्याचा ग्रंथ त्याच्यासारख्याच प्राकृतात लेखन करणाऱ्या लेखकाकडून दुरुस्त करवून घेण्यास सांगितले. पुंथानमने नम्रतेने त्याची सूचना मान्य केली. त्याच रात्री मेलपतुरच्या स्वप्नात भगवान कृष्ण आला आणि म्हणाला, "माझ्या दृष्टीने पुंथानमची भक्ती तुझ्या विभक्ती(विद्वत्ते)पेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे." ह्या धक्कादायक स्वप्नामुळे, मेलपतुर ताबडतोब पुंथानमच्या घरी गेला आणि त्याने ज्ञानप्पान वाचून त्यातील चुका दुरुस्त करण्याची तयारी दाखविली. जेव्हा पुंथानमने त्याचा ग्रंथ मेलपतुरच्या हातात सोपविला तेव्हा त्याहूनही मोठा धक्का मेलपतुरला बसला. कारण, आदल्या रात्रीच भगवान गुरुवायुरप्पाने “ज्ञानप्पान”मधील चुका स्वतःच दुरुस्त केल्यामुळे त्यामध्ये मेलपतुरला एकही चूक दिसली नाही. त्याक्षणी गर्वरहित होऊन मेलपतुरने पुंथानमची मनःपूर्वक क्षमा मागितली आणि त्याच्या भक्तियोगाची प्रशंसा केली.

प्रतिपादन[संपादन]

संत पुंथानमने अखंड भगवंताचे नामस्मरण, हाच मोक्षप्राप्तीचा किंवा भगवंताशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. दृश्यपसाऱ्याने भरलेल्या ह्या भौतिक जगातील अस्तित्वाबद्दलच्या अशाश्वततेवर त्यांनी विशेष जोर दिला आणि त्यावर नामजप हा एकमेव मार्ग मोक्षमार्ग असल्याचे ठासून सांगितले. म्हणूनच त्यांच्या "ज्ञानप्पान" मधील प्रत्येक कडव्याचाची शेवट ही "कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दन" ह्या मंत्रानेच झालेली असल्याचे पाहून ह्या गोष्टीला पुष्टी मिळते. पुंथानमने मानवी जीवन, संपत्ती, गरीबी, दुःख तसेच दृश्यजगातील डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट किती क्षणभंगुर आहे ह्याचे सुंदर वर्णन केले आहे. ह्या क्षणी रस्त्याने चालत असणारा आणि आनंदोपभोग घेत असलेला मनुष्य दुसऱ्याच क्षणी मृत होऊन पडतो. हे सर्वकाही ईश्वरेच्छेनेच घडत असते. मनुष्य कितीही निरोगी आणि श्रीमंत असला तरी परमेश्वराने ठरविलेली वेळ येताच त्याच्या शरीरातील चैतन्य किंवा जीवात्मा नाहीसा होऊन, तो मृत होतो आणि त्याचे मृत शरीर सरणावर चढविले जाते. पुंथानम म्हणतात की ऐश्वर्य आणि शक्ति असलेल्या लोकांनी अत्यंत विवेकाने ह्या दोन्ही गोष्टींचा धार्मिकतेने विनियोग करावा कारण, मनुष्य येताना आणि जाताना पूर्णपणे रिकाम्या हातांनीच जातो.

पुंथानमच्या अन्य काही रचना[संपादन]

पुंथानमच्या अन्य काही रचना, "कुमार हरणम्", "संतान गोपालम् पाना," आणि "भाषा कर्मामृतम्" ह्या होत. परंतु त्यांची सर्वश्रेष्ठ, सर्वप्रिय आणि सर्वमान्य रचना निश्चितच "ज्ञानप्पान" ही होय.

वृद्धत्व[संपादन]

शोरनूर - निलांबूर रेल्वे मार्गावर मंदिर - आख्यायिका[संपादन]

जसजसे पुंथानम वृद्ध झाले, तसतसे त्यांना गुरुवायुरपर्यंत प्रवास करून त्यांच्या इष्ट देवतेचे दर्शन करणे अवघड होऊ लागले. एकदा असेच ते गुरुवायुरच्या वारीला निघाले असताना, घरापासून काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना अत्यंत थकवा वाटून वारी सोडावी लागली. त्या क्षणी दुःखातिशयाने पुंथानमने भगवंताला कळवळून हाक मारली आणि स्वतःची असमर्थता व्यक्त केली. पुढच्याच क्षणी त्याने त्याच्या डाव्या बाजूला भगवान गुरुवायुरप्पास पाहिले. भगवंताने त्याला आशीर्वाद देऊन सांगितले, "अरे! तुला गुरुवायुरपर्यंत येण्याची आवश्यकताच नाही. तुझी पूजा स्वीकारायला मी इथेच हजर राहीन. इथेच माझे एक मंदिर बांध आणि माझी पूजा कर." भगवंताच्या आज्ञेबरहुकूम त्याच जागी एक मंदिर निर्माण करण्यात आले (हे मंदिर शोरनूर - निलांबूर रेल्वे मार्गावर, अंगडीपुरम रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे). पुंथानमच्या घरापासून मंदिरापर्यंत जाणारा एक आडरस्ता आहे. ह्या मंदिरामध्ये भगवंताने दर्शन दिलेली आणि पुंथानमने आपल्या प्रिय कृष्णाला साष्टांग नमस्कार घातलेली, अशा दोन्ही जागा आजही पहावयास मिळतात.

पुंथानम यांचा अंत - आख्यायिका[संपादन]

पुंथानम खूपच वृद्ध झाले असल्याने त्यांना कुठेही प्रवास करणे जमत नव्हते. त्यामुळे ते घरीच राहून अखंडपणे श्री भागवताचे पारायण आणि ध्यानधारणा ह्यामध्ये कालक्रमण करीत होते. त्यांना अनेकदा भगवंताचे प्रत्यक्ष रूपामध्ये दर्शन होत होते. त्यावेळी त्यांच्या बोलण्याचा घरातील मंडळींना अर्थ समजत नसे. त्यांना असे वाटले की पुंथानमला म्हातारचळ लागला असावा. एके दिवशी पुंथानम घरच्या मंडळींना म्हणाले, "उद्या वैकुंठातून विष्णूदूत आपल्या घराला भेट द्यायला येणार आहेत, तेव्हा घर स्वच्छ सारवून केळीच्या खांबांनी सजवा." पुंथानमच्या घरातील नोकरांना वाटले की मालकाला बहुतेक वेड लागले असावे. परंतु तरीदेखील मालकाच्या आज्ञेबरहुकुम त्यांनी घर सजवले. तो सुदिन उगवला. पुंथानम ध्यानधारणा आटपून विश्रांती घेत असताना त्यांना घेऊन जाण्याकरिता येत असलेले स्वर्गीय विमान त्यांना दिसले. त्यांनी ताबडतोब पत्‍नीला बोलवून विमानातून स्वतः सोबत वैकुंठाला जाण्याकरिता तयार होण्यास सांगितले. परंतु त्यांच्या पत्‍नीने त्यांच्या बोलण्याला महत्त्व न देता तिला स्वयंपाकघरात काही कामे आहेत ती आटपायची आहेत असे सांगून ती निघून गेली. त्या दोघांचे संभाषण ऐकत असलेल्या घरच्या मोलकरणीने पुंथानमला तिला त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची विनंती केली, त्यांनी आनंदाने तिला होकार दिला. स्वयंपाकघरातील कामे आटपून पुंथानमची पत्‍नी बाहेर येऊन पहाते तो तिला पुंथानम कुठेही दिसले नाहीत आणि मोलकरीण मरून पडलेली दिसली. त्या दिवसापासून संत पुंथानमला कोणीही कधीच पाहिले नाही.