पहिला बायेझिद
पहिला बायेझिद (१३५४ – ८ मार्च १४०३; ओस्मानी तुर्की: بايزيد اول,; तुर्की: Beyazıt) हा इ.स. १३८९ ते १४०२ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. पहिल्या मुरादचा मुलगा असलेला बायेझिद मुरादच्या कोसोव्होमधील मृत्यूनंतर सुलतान बनला.
१३८९ ते १३९५ दरम्यान बायेझिदने बल्गेरिया व ग्रीसवर अधिपत्य मिळवले. १३९५ साली त्याने बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी कॉंस्टॅंटिनोपोलला वेढा घातला. बायझेंटाईन सम्राट दुसऱ्या मॅन्युएलच्या मदतीसाठी हंगेरीचा सम्राट व पवित्र रोमन साम्राज्याचा सेनापती सिगिस्मंड धावून आला परंतु बायेझिदच्या सैन्याने त्याचा पराभव केला. इ.स. १४०० साली मध्य आशियातील तैमूरलंगने तुर्कांवर आक्रमण केले व अंकारा येथे झालेल्या लढाईदरम्यान बायेझिद पकडला गेला.
ओस्मानी सुलतान शत्रूकडून पकडला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. तैमूरांच्या कैदेत असतानाच बायेझिदचा १४०३ साली मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याच्या ४ मुलांमध्ये सत्तेवरून अनेक लढाया झाल्या व पुढील १० वर्षे ओस्मानी साम्राज्याला सुलतान नव्हता. ह्यामुळे साम्राज्याची वाढ खुंटली.