पनामा कालवा
पनामा कालव्याचा तपशीलवार नकाशा व विविध बंधाऱ्यांची उंची | |
स्थान | पनामा 9°04′48″N 79°40′48″W / 9.08000°N 79.68000°W |
---|---|
लांबी | ७७.१ किमी (४८ मैल) |
प्रथम वापर | १५ ऑगस्ट, १९१४ |
पनामा कालवा (स्पॅनिश: Canal de Panamá) हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो. इ.स. १९१४ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.
अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये समावेश केला आहे.
इतिहास
[संपादन]पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला वळसा घालून धोकादायक मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करावा लागत असे. मध्य युगापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती. पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. पवित्र रोमन साम्राज्याच्या पहिल्या कार्लोसने १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली अमेरिकेने पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात सुवेझ कालव्याचे निर्माण करण्यात फ्रेंचांना यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला.
१८८१ साली फ्रान्सने पनामा कालव्याचे बांधकाम हाती घेतले. परंतु सुमारे २८ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व १८९० साली काम थांबले. पुढील १३ वर्षे अमेरिकेने अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर १९०४ साली राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी १९१४ साली कालव्याचे काम पूर्ण केले. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता.
चित्र दालन
[संपादन]
|
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- पनामा कॅनाल ऑथोरिटी - कालवा कसा वापरला जातो ह्याचे वर्णन
- इतिहास
- संग्रहालय