न्हावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्हावी

न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली (महाला), हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.

मुंबईस पहिला न्हावीखाना (हेअर कटिंग सलून) लोणकर व बडनेरकर यांनीं काढला असे म्हणतात. नंदन कालेलकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय. गुजराथमध्ये आणि महाराष्ट्रातही हे लोक लग्न जुळविण्यांत मध्यस्थ असतात. गावभर फिरून ते लग्नाची बोलावणी करतात. ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात.

सनई-चौघड्याच्या आणि संबळीच्या आवाजात तुळजापूरच्या तुळजाभवानी या देवीपर्यंत नैवेद्य पोचविण्याची जबाबदारी ब्राह्मणांकडे असते. सनई-चौघडा न्हावी वाजवतात आणि गोंधळी संबळ. या सर्वांना कोल्हापूर संस्थानच्या वतीने मानधन सुरू असते.गणपतराव पिराजी वसईकर हे व्यवसायाने न्हावी होते. त्यांनी सनईवादनावर पुस्तकें लिहिली आहेत.

न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत. यांच्या बायका सुइणीचा धंदा करतात. ही माणसे जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हीही कामे करतात. बऱ्याच ठिकाणी लग्नघरातील स्वयंपाकाची व्यवस्था लावणे हे काम न्हावी करतात. काही ठिकाणीं तथाकथित उच्च वर्णीयांच्या जेवणावळीत न्हावी हा पाणी वाढतो. राजा महापद्मानंद नाभिक समाजाचे होते.

संत सेना न्हावी[संपादन]

प्रसिद्ध संत सेना महाराज हे न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग :

आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।

सेना न्हावी यांचे सुमारे ११० अभंग, गौळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबकमाहात्म्य आदी रचना या संकेतस्थळावर आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा[संपादन]

शिवाजी महाराजांचा मावळा जिवा महाला व शिवा कशािद हे दोघेही बलुतेदार न्हावी घराण्यातील होते. छत्रपती शिवाजी महाराजानी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाला मारून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.


संदर्भ[संपादन]

[१] [२] [३]

  1. ^ barber in india
  2. ^ barber history in india
  3. ^ न्हावी समाज