Jump to content

धूप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील असून महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडूकर्नाटक राज्यांतील सदाहरित वनांत आढळतो. महाराष्ट्रात हा वृक्ष तिल्लारीच्या वनांत आढळतो. लाकडासाठी धूप वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो दिवसेंदिवस दुर्र्मीळ होत चालला आहे.

आययूसीएन (The International Union for Conservation of Nature) या आंतरराष्ट्रीय संस्थेने नष्टप्राय होणाऱ्या वनस्पतींच्या यादीत धूप वृक्षाचा समावेश केला आहे. हा सदापर्णी वृक्ष आकाराने मोठा असून ४०-६० मी. उंच वाढतो. खोड गोलसर असून साल काळसर मऊ असते. कोवळ्या फांद्या व देठांवर लव असते. पाने साधी, एकाआड एक व लंबगोल असून टोकाला रुंद असतात.

या वृक्षाची फुले लहान व पांढरी असून पानांच्या बेचक्यातून आलेल्या पुष्पसंभारात येतात. फळ (बोंड) फिकट तपकिरी, तीन कप्प्यांचे व लांबट असून त्यात एक बी असते. धूप वृक्षाच्या खोडातून व जून फांद्यांतून पिवळ्या रंगाची डिंकासारखी राळ बाहेर पडते, यालाच सामान्यपणे धूप म्हणतात. याचा वापर रंग व रोगण (व्हार्निश) यांकरिता करतात. हा धूप औषधी असून जुनाट खोकला, सांधेदुखी, जुलाब इत्यादींवर देतात. यात नैसर्गिक सुगंधी द्रव्य असल्यामुळे धार्मिक विधींत धूप जाळतात. डासांचा उपद्रव टाळण्यासाठीही काही जण धूप जाळतात. या वृक्षाच्या लाकडापासून प्लायवुड तयार करतात.

धूपाच्या झाडालाच राळधूपाचा वृक्ष म्हणतात.

अन्य धूप

[संपादन]

तंत्रशास्त्रासार ऊद, तगर, कुष्ठ, शैलज, शर्करा, नागरमोथा, चंदन, वेलदोडा, तमालपत्र, नखनखी, मुशीर, जटामांसी, कापूर, ताली, सदलन और गुग्गुळ हे सोळा प्रकारचे धूप मानले गेले आहेत. यांना षोडशांग धूप म्हणतात. मदरत्न (?)च्या मते चंदन, कुष्ठ, नखल, राल, गूळ, शर्करा, नखगंध, जटामांसी यांच्या समभाग मिश्रणातून उत्तम धूप बनतो.

यांशिवाय, सहा भाग कुष्ठ, दोन भाग गूळ, तीन भाग लाख, एक पंचमांश भाग नखला, हरडा आणि राळ समभाग, एक भाग, दपै एक भाग, शिलाजित तीन कण, जिनतान, नागरमोथा चार भाग, गुग्गुळ एक भाग यांच्या मिश्रणाने अति उत्तम धूप तयार होतो. रुहिकाख्य, कण, दारुसिहृक, ऊद, सित, शंख, जातिफल, श्रीश हे धूप श्रेष्ठ समजले जातात.

पहा : अगरु