जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती.

ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले.