छिंगघाय–तिबेट रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छिंगघाय तिबेट रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
रेल्वेमार्गाचा नकाशा
डिझेल इंजिनावर चालणारी छिंगघाय–तिबेट रेल्वे

छिंगघाय–तिबेट रेल्वे (तिबेटी: མཚོ་བོད་ལྕགས་ལམ།; चीनी: 青藏铁路) ही चीन देशामधील एक रेल्वे आहे. ही रेल्वे तिबेटमधील ल्हासा शहराला छिंगहाय प्रांताच्या शीनिंग शहरासोबत जोडते. एकूण १,९५६ किमी (१,२१५ मैल) लांबीच्या ह्या रेल्वेमार्गाच्या शीनिंग ते गोलमुद दरम्यानच्या ८१५ किमी (५०६ मैल) लांबीच्या टप्प्याचे काम १९८४ साली पूर्ण झाले होते. १,१४२ किमी (७१० मैल) गोलमुद ते ल्हासा या टप्प्याचे उद्‌घाटन १ जानेवारी २००६ रोजी चिनी राष्ट्राध्यक्ष हू चिंताओ यांनी केले.

एकूण १,९५६ किमी लांबीचा हा मार्ग २००६मध्ये बांधून पूर्ण झाला. हा मार्ग तांग्गुला घाटातून जाताना ५,०७२ मी (१६,६४० फूट) उंचीवरून जातो. तेथील तांग्गुला रेल्वे स्थानक ५,०६८ मी (१६,६२७ फूट) उंचीवर असून जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. ४,९०५ मी (१६,०९३ फूट) उंचीवरील फेंघुओशान बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गावरील बोगदा आहे. या मार्गावरील ६७५ पूलांची एकूण लांबी १५९.८८ किमी आहे. सुमारे ५५० किमी लांबीचा मार्ग पर्माफ्रॉस्ट[मराठी शब्द सुचवा]वर बांधलेला आहे. या मार्गावरील गाड्यांमधून ८०० ते १,०० प्रवासी रोज प्रवास करण्याची क्षमता आहे.