छिंगघाय–तिबेट रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेल्वेमार्गाचा नकाशा
डिझेल इंजिनावर चालणारी छिंगघाय–तिबेट रेल्वे

छिंगघाय–तिबेट रेल्वे (तिबेटी: མཚོ་བོད་ལྕགས་ལམ།; चीनी: 青藏铁路) ही चीन देशामधील एक रेल्वे आहे. ही रेल्वे तिबेटमधील ल्हासा शहराला छिंगहाय प्रांताच्या शीनिंग शहरासोबत जोडते. एकूण १,९५६ किमी (१,२१५ मैल) लांबीच्या ह्या रेल्वेमार्गाच्या शीनिंग ते गोलमुद दरम्यानच्या ८१५ किमी (५०६ मैल) लांबीच्या टप्प्याचे काम १९८४ साली पूर्ण झाले होते. १,१४२ किमी (७१० मैल) गोलमुद ते ल्हासा या टप्प्याचे उद्‌घाटन १ जानेवारी २००६ रोजी चिनी राष्ट्राध्यक्ष हू चिंताओ य्हांनी केले.

समुद्रसपाटीपासून ५,०७२ मी (१६,६४० फूट) उंचीवरील तांगुला खिंडीमधून वाट काढणारी छिंगघाय–तिबेट रेल्वे जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे आहे. ५,०६८ मी (१६,६२७ फूट) उंचीवर असलेले तांगुला रेल्वे स्थानक हे जगातील सर्वात उंच रेल्वे स्थानक तर ४,९०५ मी (१६,०९३ फूट) उंचीवरील १,३३८ मी (४,३९० फूट) लांबीचा फेंघूशान बोगदा हा जगातील सर्वात उंचावरील बोगदा आहे.