चेतना सिन्हा

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search

चेतना सिन्हा( जन्म: २१ मार्च १९५८, मुंबई) या महाराष्ट्राच्या माणदेश या दुष्काळी भागातील स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी काम करणाऱ्या समाजसेविका आहेत.

जडणघडण[edit]

सिन्हा यांचे बालपण मुंबई येथे गेले. त्यांचे शालेय शिक्षण मास्टर्स ट्युटोरियल हायस्कूलमध्ये झाले.त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी आणि अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली. जयप्रकाश नारायणांच्या समाजवादी विचारांकडे त्यांचा ओढा होता.आणीबाणीच्या काळात त्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांना अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता. काही काळ शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीची प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८७ मध्ये म्हसवड येथे राहणारे चळवळीतील कार्यकर्ते विजयसिंह गुरव यांच्याशी त्यांचे लग्न झाले. विजयसिंह गुरव त्यांचा एका पत्रकाराने चुकून विजय सिन्हा असा उल्लेख केला होता. हेच आडनाव त्यांना कायमचे चिकटले.

कार्य[edit]

म्हसवडसारख्या दुष्काळी भागातील स्त्रियांना स्वत:च्या रोजच्या कमाईतून काही बचत करण्यासाठी महिला बँक असावी, असे वाटत होते. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचा चेतना सिन्हा यांनी अभ्यास केला. आवश्यक भाग भांडवल जमवले. पण सर्व संचालिका निरक्षर असल्यामुळे त्यांचा बँकेचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळला.या महिलांसाठी साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले. या महिला अशिक्षित असल्या तरी त्यांना व्यवहारज्ञान आहे. हिशोब करता येतात, हे पटवून देण्यात पुढे यश आले. आणि १० ऑगस्ट १९९७ रोजी 'माणदेशी महिला सहकारी बँकेचा' शुभारंभ झाला. सिन्हा या बँकेच्या संस्थापक, अध्यक्ष आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना रोज स्वत: बँकेत येणे शक्य नसल्यामुळे 'डेली बँकिंग', 'डोअरस्टेप बँकिंग' या संकल्पना राबवून घरोघरी जाऊन पैसे गोळा करण्यात येतात. बँकेतर्फे महिलांना त्यांच्या नियंत्रणात असलेल्या उपक्रमांसाठी कर्ज दिले जाते. उदा. दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाते. डेअरी सुरु करण्यासाठी दिले जात नाही. उन्हात बसून माल विकणाऱ्या महिलांसाठी 'छत्रीसाठी बिनव्याजी कर्ज' आणि शालेय विद्यार्थिनींकरता 'सायकलसाठी बिनव्याजी कर्ज' दिले जाते.
'माणदेशी फाउंडेशन' द्वारे 'माणदेशी उद्योगिनी' या व्यवसाय प्रशिक्षण शाळेतून ५० हजार महिला प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्या आहेत.या प्रशिक्षण शाळेच्या म्हसवड,वडूज,दहिवडी,सातारा,हुबळी येथे शाखा आहेत.येथे संगणक प्रशिक्षण, शेळीमेंढीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, रेशीम उद्योग तसेच फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, पाककला, भरतकाम असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.

पुरस्कार[edit]

 • महाराष्ट्राचे राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर पुरस्कार - १९९४
 • गॉडफ्रे फिलिप्स शौर्य अमोदिनी पुरस्कार - ११ सप्टेंबर २००९
 • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार[१] - २०१४
 • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार -२०१६ [२]
 • ग्रामीण उद्योजकतेसाठी जानकीदेवी बजाज पुरस्कार
 • राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
 • नानाजी देशमुख पुरस्कार
 • लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार[३]
 • त्या येल फेलो आणि अशोका फेलो आहेत.
 • दावोस, स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या २३-२६ जानेवारी २०१८ दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या सात स्त्री अध्यक्षांपैकी एक म्हणून निवड.

संदर्भ[edit]

अनुभव मासिक डिसेंबर २०१७ अंक, पृष्ठ क्रमांक १४ ते १९, २३ जानेवारी २०१८ रोजी वाचले.

 1. ^ "Dainik Aikya - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चेतना सिन्हा सन्मानित". www.dainikaikya.com. 2018-07-23 रोजी पाहिले. 
 2. ^ "भारावलेल्या शब्दांत भिजला ‘गोदावरी गौरव’ -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2016-03-11. 2018-07-23 रोजी पाहिले. 
 3. ^ "ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर - Dainik Prabhat | DailyHunt". DailyHunt (en मजकूर). 2018-07-23 रोजी पाहिले.