चारोळी (सुकामेवा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चारोळी हा वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया लँझान आहे

चारोळी ही एक प्रकारची बी आहे. तिचा वापर मुख्यतः बासुंदीमध्ये, कुर्म्यामध्ये करतात.

चार, चिरंजी, चारोळी, राजदाणा, तपसप्रिय इत्यादी नावांनी ओळखले जाणारे हे झाड काजू कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड १५ ते २५ फूट उंच वाढते. पाने काजूच्या पानासारखी असून झाडाची साल काळी, करडी व ती चौकोनी आकाराच्या खवल्यांनी विभागलेली असते.

चारोळीची फळे करवंदाएवढी गोल असतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात. फळांचा गर गोड असून आत कठीण कवच असते. कवचाच्या आत गोडंबी असते. ह्या बियांनाच चारोळी म्हणतात. बिया गोल, चपट्या, नरम व चवीला काजूप्रमाणे लागतात. त्या बियांत तेल असते. बियांनाच चारोळी व झाडाला चार म्हणतात.

चारोळीच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु भारतातील विविध राज्यांत जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळून येतात. महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात चारोळी लोकप्रिय असून चारोळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

कर्नाटक बेळगांव जिल्ह्यातील जंगलामध्ये चारोळी मुबलक प्रमाणांत आढळतात. साधारण उन्हाळ्यांत ही लहान छोटी काळ्या रंगांची रुचकर फळं बाजारांत येतात.

अन्नघटक व प्रमाण[संपादन]

चारोळीत १७ % कार्बोहायड्रेट्रस, २२ % प्रोटीन्स, ४४ % फॅट्स (तेल), १२ % पिष्टमय पदार्थ, व ५ % साखर असते.

चारोळीच्या 'बी'चे उपयोग[संपादन]

चारोळीचा वापर मुख्यत्वे बासुंदी, आईस्क्रीम, पेढे, बर्फी, श्रीखंड, खीर व इतर दुधाच्या मिठाईच्या पदार्थांंत करतात. काजू + बदाम + खारीक + गोडंबी + चारोळी + खडीसाखर यांचे मिश्रण करून पौष्टिक सुकामेवा तयार करतात. झाडाच्या सालीपासून डिंक व टाँनिन मिळते. चारोळीच्या पानांपासून गुरांना चारा उपलब्ध होतो. चारोळीच्या 'बी'पासून तेल निघते. त्या तेलामुळे केस काळे होतात.