चार (वनस्पती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे पिकल्यावर काळ्या रंगाची होतात. ती गोड लागतात.याच्या फळात एक कठीण कवच असते. ती फोडली असता त्यातुन निघालेल्या बीला चारोळी म्हणतात.

चार, चिरंजी, चारोळी, राजदाणा, तपसप्रिय इत्यादी नावांनी ओळखले जाणारे हे झाड काजू कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड १५ ते २५ फूट उंच वाढते. पाने काजूच्या पानासारखी असून झाडाची साल काळी, करडी व ती चौकोनी आकाराच्या खवल्यांनी विभागलेली असते. हा वृक्ष ॲनाकार्डिएसी (Anacardiaceael) कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया कोचीनचाईनेसिस (Buchanania cochinchinensis) आहे

चारोळीची फळे करवंदाएवढी गोल असतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात. फळांचा गर गोड असून आत कठीण कवच असते. कवचाच्या आत गोडंबी असते. ह्या बियांनाच चारोळी म्हणतात. बिया गोल, चपट्या, नरम व चवीला काजूप्रमाणे लागतात. त्या बियांत तेल असते. बियांनाच चारोळी व झाडाला चार म्हणतात.

चारोळीच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु भारतातील विविध राज्यांत जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळून येतात. महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात चारोळी लोकप्रिय असून चारोळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील जंगलांमध्ये, महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि खानदेशमध्ये चारोळीचे वृक्ष मुबलक प्रमाणांत आढळतात. साधारण उन्हाळ्यांत ही लहान छोटी काळ्या रंगांची रुचकर फळे बाजारांत येतात.

हे सुद्धा बघा[संपादन]