Jump to content

दामोदर हरी चाफेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी जून २५, इ.स. १८६९ रोजी झाला. दामोदरवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी वॉल्टर चार्ल्स रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली.

बालपण

[संपादन]

लहानपणापासूनच दामोदरला व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रमंडळींना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरी चाफेकरवासुदेव हरी चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत.

रँडचा वध

[संपादन]

पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हौदोस घातला. इंग्रजांविरूद्धात असंतोष पसरू लागला. रॅंड हा अत्यंत क्रुर, खुनशी इंग्रज अधिकारी पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. दामोदरपंतांनी रॅंडचा वध करण्याची योजना आखली. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रॅंड आणि आयर्स्टचा वध केला.

गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांनी दामोदरपंतांना पकडले. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चाफेकरांना ८ मे १८९९ रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना आणि महादेव रानडे याना १० मे १८९९ रोजी फाशी देण्यात आली.

आत्मवृत्त

[संपादन]

येरवडा तुरुंगात असताना त्यांनी आपला जीवन प्रवास आणि क्रांतीकार्याचे तपशील नमूद करणारे १०० पानी आत्मवृत्त मोडीत लिहून काढले. ते वि.गो.खोबरेकर यांनी संपादित करून मराठीत आणले. १९७४ साली ते राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या संस्थेने प्रकाशित केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त" (PDF). राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. 2016-04-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.