दामोदर हरि चाफेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दामोदर चाफेकर यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी जून २५,इ.स. १८६९ रोजी झाला. लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव दामोदरवर होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील एरवडा तुरूंगात फाशी दिली.

बालपण[संपादन]

लहानपणापासूनच दामोदरला व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रमंडळींना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चाफेकरवासुदेव हरि चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत.

रँडचा वध[संपादन]

पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हौदोस घातला. इंग्रजांविरूद्धात असंतोष पसरू लागला. रँड हा अत्यंत क्रुर, खुनशी इंग्रज अधिकारी पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. दामोदरपंतांनी रँडचा वध करण्याची योजना आखली. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला.

अटक[संपादन]

गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांनी दामोदरपंतांना पकडले. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चापेककर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चापेककरांना ८ मे १८९९ रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना आणि महादेव रानड्यांना १० मे १८९९ रोजी फाशी देण्यात आली.

आत्मवृत्त[संपादन]

येरवडा तुरुंगात असताना त्यांनी आपला जीवन प्रवास आणि क्रांतीकार्याचे तपशील नमूद करणारे १०० पानी आत्मवृत्त मोडीत लिहून काढले. ते वि.गो.खोबरेकर यांनी संपादित करून मराठीत आणले.१९७४ साली ते राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या संस्थेने प्रकाशित केले.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त". राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.