चर्चा:कटिभूषणे
कटिभूषणांचा प्राथमिक प्रकार म्हणजे कमरपट्टा. पुरुषांना शस्त्रे बाळगण्यासाठी आणि स्त्रियांना कपडे सावरण्यासाठी कमरपट्ट्यांचा उपयोग होई. कालांतराने कमरपट्ट्यांना अलंकार म्हणून महत्त्व प्राप्त झाले. रोमन सैनिक आपल्या गणवेशावर कमरपट्टा बांधीत व त्यात पैसे ठेवीत. यूरोपातील स्त्रियांही बटवे, पंखे,कात्र्या बाळगण्यासाठी कमरपट्ट्यांचा उपयोग करीत.
ग्रीसमधील इथाका बेटातील थडग्यात सोन्याच्या कटिभूषणात हायसिंथ फुले कोरलेली आढळली. गॉल म्हणजे प्राचीन फ्रान्स देश. तेथील कटिभूषणांत भारतीय कटिभूषणांप्रमाणे लोंबणारी पदके व साखळ्या लावीत असल्याचा पुरावा मिळतो. गॉलमधील फ्रँक व बर्गंडी भागातील थडग्यांमध्ये जडावाचे काम केलेली चांदीची व तांब्याची कटिभूषणे आढळली आहेत. पश्चिमी प्रबोधनकालात कटिभूषणे नक्षीदार असत व त्यांच्या मध्यभागी सिंहाचे किंवा एखाद्या प्राण्याचे तोंड कोरलेले असे तर पूर्वेकडील सुमात्रा बेटातील चांदीच्या कटिभूषणांत मध्यभागी माशाच्या तोंडाचा फासा असे. आधुनिक काळात नॉर्वेतील लोकांच्या कटिभूषणांत मधोमध गोल कडे व त्याच्या दोन्ही बाजूंस चौकोनात फुलांचे विविध नमुने आढळतात. ग्रीसमध्ये गेल्या शतकात विवाहित स्त्रिया चांदीची व तांब्याची कटिभूषणे घालीत.
प्राचीन काळापासून भारतात स्त्रिया व पुरुष दोघेही कटिभूषणे वापरीत. काही धार्मिक विधींत विशिष्ट प्रकारचे कटिबंध वापरण्याची पद्धत दिसते. मौंजीबंधनात बटूला तीन पदरी कटिबंध म्हणजे मेखला किंवा करगोटा बांधीत व त्याच्यात मागे व पुढे लंगोटी अडकवीत. पुढे त्याची जागा साखळीने घेतली. या साखळ्या चांदीच्या किंवा क्वचित सोन्याच्याही असत. यांनाच पुढे बारीक घागऱ्या लावण्यात आल्या. या साखळ्याना एक वा अनेक पदर असत. गरीब लोकांत सुताचे किंवा रेशमाचे रंगीत करगोटे वापरीत. स्त्रियांच्या कमरेभोवती चांदीचा किंवा सोन्याचा कमरपट्टा असे. तो पुढील भागी फाशाने बांधला जाई. श्रीमंत स्त्रियांच्या कमरपट्ट्यात रत्ने आणि मोतीही जडविलेले असत. अशा कटिबंधांना रसना, मेखला, कांची, कमरबंध, सप्तकी इ. नावे आहेत. अशा प्रकारची विविध कटिभूषणे भारतातील जुन्या शिल्पांत आढळतात.
एक पदरी कटिभूषणास कांची म्हणत, आठ पदरीस मेखला म्हणत व सोळा पदरीस रसना म्हणत. भारतीय शिल्पांतील विविध कटिभूषणे नक्षीदार व आकर्षक आहेत. काही कटिभूषणांत खालच्या बाजूस घागऱ्या व घंटिका असत व त्यांचा चालताना मंजुळ आवाज होत असे. त्यांस पुष्कळदा मण्यांचे पायांपर्यंत लोंबणारे एक वा अनेक पदरही लावलेले असत.
अलीकडील सोन्याच्या किंवा चांदीच्या कटिबंधांत हिरवा पाचू किंवा माणकाचा पैलूदार खडा बसविलेला आढळतो. कटिभूषणांची प्रथा आता फारशी आढळत नाही. तरी खेडेगावातील लोक विशेषत: स्त्रिया व मुली लग्नासारख्या महत्त्वाच्या समारंभात सोन्या चांदीचे कमरपट्टे वापरताना दिसतात.
Start a discussion about कटिभूषणे
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve कटिभूषणे.