Jump to content

ग्लुकोज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ग्लुकोज[संपादन]

ग्लुकोजला ग्रेप शुगर, कॉर्न शुगर व डेक्स्ट्रोज अशीही नावे आहेत. निसर्गात ग्लुकोज द्राक्षे, मध व फळे यांमध्ये असते. रक्ताचाही तो एक घटक आहे. मधुमेह झालेल्या रोग्यांच्या रक्तात त्याचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज या नावावरून हे संयुग कार्बोहायड्रेट वर्गातील असून चवीस गोड आहे हे ध्वनित होते.

संरचना[संपादन]

उसाच्या साखरेचा रेणू एक ग्लुकोज एकक व एक फ्रुक्टोज एकक यांच्या संयोगाने बनलेला आहे. ग्लुकोजची अनेक एकके संयोगित होऊन स्टार्च व सेल्युलोज यांचे रेणू बनतात.

ग्लुकोसाइड नामक संयुगांच्या वर्गात ग्लुकोज हे अल्कोहोल किंवा फिनॉल यांच्याशी संयोग झालेल्या रूपात असते. जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याने) त्यांपासून ग्लुकोज व ती ती संयुगे निर्माण होतात.

ग्लुकोजचे दक्षिण वलनी (+) आणि वाम वलनी (-) एकाच पातळीत कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाची पातळी उजवीकडे वळविणारे व डावीकडे वळविणारे) असे दोन प्रकाशीय समघटक रेणूतील अणूंचे प्रकार व संख्या तीच पण त्यांची मांडणी भिन्न असलेले प्रकार, समघटकता] आहेत. कित्येकदा त्यांचा उल्लेख D व L ही अक्षरे प्रारंभी लावून केला जातो. तथापि ही अक्षरे कार्बोहायड्रेटांचे त्रिमितीय विन्यास (रेणूतील अणूंची अवकाशातील मांडणी) दाखविण्यासाठी वापरण्याचाही प्रघात असल्यामुळे प्रकाशीय वलन दर्शविण्यासाठी (+) व (-) या चिन्हांचा उपयोग करणे अलीकडे रूढ होत आहे [→ कार्बोहायड्रेट].

नैसर्गिक ग्लुकोज दक्षिण वलनी आहे व यावरूनच त्याला डेक्स्ट्रोज हे नाव पडले आहे. याचा त्रिमितीय विन्यासही D आहे. या लेखात हेच रूप अभिप्रेत आहे

विश्लेषण आणि रेणुभारमापन यांस अनुसरून ग्लुकोजचे रेणुसूत्र C6H12O6 असे ठरते. ॲसिटिक ॲनहायड्राइडाच्या विक्रियेने ग्लुकोजसून पेंटाॲसिटेट मिळते. ब्रोमीन जलाने ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] केल्याने ग्लुकोजपासून एक ग्लुकॉनिक (पेंटाहायड्रॉक्सिल) अम्ल मिळते. या विक्रियांवरून ग्लुकोजच्या रेणूत पाच हायड्रॉक्सिल गट (-OH) आहेत हे स्पष्ट होते. ग्लुकोजचे फेलिंग विद्रावांचे (क्युप्रिक सल्फेट, सोडियम पोटॅशियम टार्टरेट आणि सोडियम हायड्रॉक्साइड एकत्र मिसळून तयार केलेल्या ताज्या विद्रावाचे) ⇨क्षपण  होते. यावरून त्याच्या संघटनेत आल्डिहाइड गट आहे हे दिसून येते. हायड्रोसायनिक अम्लाची समावेशन विक्रिया होऊन ग्लुकोजांचे ग्लुकोजसायनोहायड्रीन बनते. त्याचे जलीय विच्छेदन केले म्हणजे जे अम्ल मिळते त्याचे हायड्रोजन आयोडाइडाने क्षपण केले म्हणजे सर्व हायड्रॉक्सिल गटांच्या जागी हायड्रोजन अणू येतात व n-हेप्टिलिक अम्ल बनते. यावरून ग्लुकोजमध्ये सहा कार्बन अणूंची शृंखला असली पाहिजे असे अनुमान निघते. हा पुरावा लक्षात घेतला म्हणजे ग्लुकोजची संरचना OH·C-CH·OH-CH·OH-CH·OH-CH·OH-CH2·OH अशी ठरते.

परंतु या विवृत शृंखला (जिची टोके एकमेकांस जोडलेली नाहीत अशा कार्बन अणूंची साखळी) सूत्राने ग्लुकोजच्या सर्व रासायनिक गुणधर्मांचे स्पष्टीकरण होत नाही. उदा., ग्लुकोज हे आल्डिहाइडांच्या सर्व विक्रिया दाखवीत नाही. मिथिल अल्कोहॉलच्या विक्रियेने त्यापासून दोन मिथिल ग्लुकोसाइडे मिळतात. त्याचप्रमाणे ग्लुकोज या जलीय विद्रावाचे प्रकाशीय वलन प्रथम असते तेवढेच राहत नाही, कालांतराने ते बदलते आणि मग स्थिरावते (प्रकाशीय वलनांतर). या गुणधर्माचे स्पष्टीकरण ग्लुकोजची वलयी (जिची टोके एकमेकांना जोडलेली आहेत अशी कार्बन अणूंची साखळी असलेली) संरचना दिल्याने होते. एका वलयी संरचनेत पाच कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांचे षट्‌पदी वलय आहे. त्याला ग्लुकोपायरॅनोज संरचना म्हणतात. दुसऱ्या वलयी संरचनेत कार्बनचे चार अणू व ऑक्सिजनचा एक अणू असलेले पंचपदी वलय आहे. या संरचनेला ग्लुकोफ्यूरॅनोज म्हणतात. वलयी संरचना झाली म्हणजे पाच कार्बन अणू असममित (ज्याला वेगवेगळे चार अणू अथवा अणुसमुच्चय जोडलेले आहेत असे) होतात. विवृत शृंखलेत चारच अणू असममित असतात. त्यामुळे ग्लुकोजची अल्फा आणि बीटा अशी दोन प्रकारची वलयी ग्लुकोसाइडे संभवतात व ती माहीत आहेत. ग्लुकोजच्या विद्रावात विवृत शृंखलारूप व ह्या वलयी संरचना समतोलावस्थेत असतात असे दिसून आले आहे.