गोळवण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?गोळवण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मालवण
जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

गोळवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. गोळवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यात वसलेले एक छोटेसे गाव. ते मालवणपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. ते सुंदर निसर्गाने नटलेले आहे. गावाच्या चारही बाजूंनी डोंगर आहे. गोळवण हे गाव मध्येच वसले आहे. म्हणून त्या गावाला ‘गोल असे वन’ म्हणजेच गोळवण असे म्हणतात. गाव बारा वाड्यांनी बनलेले आहे. रवळनाथ ही ग्रामदेवता आहे. रवळनाथाचे मंदिर गावात प्रसिद्ध आहे. ते मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे असे मानले जाते. गावात दत्त मंदिर, शेबार देव मंदिर, भावई मंदिर अशी मंदिरे आहेत. गावची लोकसंख्या अडीच हजाराच्या आसपास असावी.

गोळवण निसर्गसौंदर्याने नटलेले सुंदर असे गाव आहे. गावात तीन गावांची मिळून एकच ग्रामपंचायत आहे. ती तीन गावे म्हणजे गोळवण, कुमामे आणि डिकवल. गोळवण गावाच्या मध्यावर ग्रामपंचायत आहे. तेथे तिन्ही गावांतील लोक एकत्र येतात आणि त्या तिन्ही गावांच्या विकासासाठी हातभार लावतात. ग्रामपंचायतीच्या बाजूला पोस्ट ऑफिस आहे. गोळवण गावात दोन प्राथमिक शाळा आणि दोन अंगणवाड्या आहेत. प्राथमिक शाळा गोळवण नंबर एक पहिली ते सातवीपर्यंत आणि दुसरी प्राथमिक शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी कट्टा, कुडाळ, कणकवली आणि मालवण या ठिकाणी जातात.

गावात सर्व प्रकारचे सण, उत्सव, चालीरीती, रूढी, परंपरा जोपासल्या जातात. गणेशोत्सव हा सण सर्व सणांत मोठ्या उत्साहाने तेथे साजरा केला जातो. गावातील प्रत्येक वाडीमध्ये एक भजनी मंडळ आहे. गणपतीचे अकरा दिवस भजनी मंडळांतर्फे भजन होते. दत्तजयंतीला दत्तमंदिरात आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात शिमगोत्सव आणि नवरात्रोत्सवदेखील मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. दहीकाला हा सण सगळीकडे श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला (जन्माष्टमी) साजरा केला जातो. परंतु, गोळवण गावात दहीकाला यात्रेच्या दरम्यान, डिसेंबर-जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. दरवर्षी ‘पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ’ यांचे ‘दशावतारी नाटक’ असते. गावात दसऱ्याला आपट्याची पाने वाटतात. दसऱ्याला देवळात गावचे देव अंगात(वारी) येण्याची प्रथा आहे. दसरा ढोल वाजवून साजरा केला जातो.

गावात भावई देवीचे मंदिर आहे. त्या देवीवर लोकांची श्रद्धा आहे. पावसाळ्यात भावई देवीचा उत्सव साजरा केला जातो. तो कार्यक्रम दुपारी तीन वाजता सुरू होतो. त्यावेळीसुद्धा देवी अंगात येऊन गावकऱ्यांना दर्शन देते असे म्हणतात. त्यानंतर गावातील तरुण मातीत ‘भली भावई’ हा पारंपरिक खेळ खेळतात. ती मंडळी खेळ खेळून झाल्यावर देवीला नवसाच्या कोंबडीचा नैवेद्य देतात.

शेती हे तेथील लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. गावात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भुईमूग, ऊस, नाचणी, मका ही पिकेसुद्धा काही प्रमाणात घेतली जातात. गावांमध्ये भूजलसाठा मुबलक आहे, त्यामुळे गावात अनेक बोअरवेल आणि विहिरी आहेत. त्यांचा फायदा शेतीसाठी होतो. नारळ, केळी, पोफळी(सुपारी) या फळांचे; तसेच मोगरा, शेवंती, जाई-जुई, गुलाब या फुलझाडांची लागवड अधिक प्रमाणावर केली जाते. गावातील काही लोक कामधंद्यांसाठी मालवण, कुडाळ, गोवा, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी कार्यरत आहेत. गावात आठवडी बाजार भरत नाही. बाजार गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कट्टा, पोईप आणि विरण या गावांमध्ये अनुक्रमे बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी भरतो.

गावातील शेबार मंदिराशेजारी एक तळे आहे. ते तळे पांडवांनी एका रात्रीत बांधले अशी आख्यायिका आहे. त्या तळ्यात वर्षाचे बाराही महिने पाणीसाठा मुबलक असतो. गावात एक धबधबासुद्धा आहे. त्या धबधब्याला ‘पंजोळी’ असे म्हटले जाते. तो पावसाळ्यात दुथडी भरून वाहतो. गावात दिवसभरात एस टी सहा ते सात वेळा येते. गावातील तरुण शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत आघाडीवर आहेत.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/