ख्मेर रूज
ख्मेर रूज (ख्मेर: ខ្មែរក្រហម) हे कंबोडियामधील कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थक व कार्यकर्त्यांना दिले गेलेले नाव होते. ख्मेर रूजची स्थापना १९६८ मध्ये उत्तर व्हियेतनाममध्ये झाली. १९७५ साली व्हियेतनाम युद्ध संपल्यानंतर इ.स. १९७५ ते १९७९ दरम्यान ४४ महिने पोल पोटच्या नेतृत्वाखाली ख्मेर रूजने कंबोडियावर सत्ता गाजवली.
कार्यकाळ[संपादन]
आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात ख्मेर रूजने कंबोडियामध्ये हिंसेचे व अराजकतेचे थैमान घातले. पोल पोटने कंबोडियामधील सामाजिक पातळ्या हटवून सर्व जनतेला शेतीच्या कामास जुंपण्याचे ठरवले. ख्मेर रूजने सर्व शहरी नागरिकांना खेडेगावांत स्थलांतर करण्यास भाग पाडले. ज्या शहरी लोकांना शेतीचे काहीही ज्ञान नाही अशांना बळजबरीने शेतकरी बनवल्यामुळे कंबोडियामधील कृषी उद्योग पूर्णपणे कोलमडून पडला व भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच अन्न-पाण्याविना सलग १२ तास शेतीकाम करण्याच्या ख्मेर रूजच्या धोरणामुळे भुकमारी, रोगराई इत्यादी कारणास्तव लाखो लोक मृत्यूमुखी पडले. कोणताही छोटासा नियम मोडल्यास त्या व्यक्तीला त्वरित मारून टाकले जात असे.
तसेच ख्मेर रूजने कंबोडियामधील सर्व शाळा, माहाविद्यालये, इस्पितळे, बँका बंद केल्या व बहुसंख्य शिक्षकांची व विचारवंतांची हत्या केली. चलनास विरोध व्यक्त करून त्यांनी कंबोडियामधील सर्व नोटा जाळून टाकल्या व बँका जमीनदोस्त केल्या. ह्यामुळे कंबोडियाची अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. ख्मेर रूजने कंबोडियामधील धर्मांचे पुरते उच्चाटन करण्याचे ठरवून सर्व प्रार्थनागृहे व धर्मदायी संस्था बंद केल्या. कोणतीही व्यक्ती धर्माचे पालन करताना आढळून आल्यास ठार मारली जात असे. तसेच कंबोडियन जनतेच्या सर्व प्रकारच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर संपूर्ण बंदी आणली गेली.
ख्मेर रूजच्या तांडवामध्ये सुमारे १२ लाख ते ३० लाख कंबोडियन लोक मृत्यूमुखी पडले असवेत असा अंदाज अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केला आहे.
अस्त[संपादन]
१९७७ मध्ये सुरू झालेल्या व्हियेतनाम-कंबोडिया युद्धामध्ये १९७९ साली व्हियेतनामचा विजय झाला व ख्मेर रूजला पलायन करणे भाग पडले. त्यानंतर ख्मेर रूजचे अस्तित्व नावापुरतेच राहिले व १९९९ साली हा पक्ष संपूर्णपणे बरखास्त झाला.