खडीकाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साडी, चोळी, परकर इत्यादींवर ठशांच्या साहाय्याने केलेले नक्षीकाम. खडीकामाने त्या त्या वस्त्राची आकर्षकता वाढते. महाराष्ट्रगुजरात या राज्यांत खडीकामाची परंपरा असून पंढरपूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नासिकसातारा इ. ठिकाणचे खडीकाम उत्कृष्ट व उच्च प्रकारचे मानले जाते. विशेषत: खडीकाम केलेली काळी चंद्रकळा महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. वस्त्रावर खडी उठविण्यासाठी फारसा खर्च येत नाही, तसेच त्याची प्रक्रियाही बरीच साधी व सोपी आहे. त्यामुळे खडीकाम कोणालाही सहज करता येते. ही खडी बहुधा काळ्या अथवा रंगीत वस्त्रांवर काढण्यात येत असून त्यासाठी जवसाचे तेल, राळ व सफेदा यांचा उपयोग करण्यात येतो.

प्रथम जवसाच्या तेलात राळ मिसळून मिश्रण तयार करतात व ते शिजवितात. नंतर त्यात सफेदा कालवून रोगण तयार करतात. हे रोगण पाचसहा दिवस तसेच झाकून ठेवतात. नंतर त्याचा उपयोग खडी काढण्यासाठी करण्यात येतो. प्रत्यक्ष खडी उठविण्यासाठी विविध आकारांच्या व नक्षीकाम असलेल्या लाकडी ठशांचा उपयोग करतात. त्यांमध्ये वरील प्रकारचे रोगण घालून व त्यावर ठशातील लाकडी दांड्याच्या साह्याने दाब देऊन खडीचे विविध छाप वस्त्रावर उठविण्यात येतात. खडीच्या या नक्षीवर कधीकधी पांढऱ्या शुभ्र अभ्रकाची वस्त्रगाळ पूड किंवा सोनेरी वर्ख पसरून वस्त्र झटकून ते वाळवितात. त्यामुळे खडीकामावर रुपेरी किंवा सोनेरी रंगाची चमक येते व ते शोभिवंत दिसू लागते. शिवाय ते उठून दिसते. वर्ख किंवा पूड यांऐवजी भिंगाच्या लहानलहान टिकल्या चिटकवूनही वस्त्राची शोभा वाढविण्यात येते. तेल व राळ यांच्या मिश्रणाऐवजी कधीकधी साखर व सरस यांच्या मिश्रणात सफेदा कालवून त्याच्या साहाय्यानेही खडीकाम करण्यात येते .