Jump to content

कोनेरू हंपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोनेरू हंपी
देश भारत ध्वज भारत
जन्म ३१ मार्च, १९८७ (1987-03-31) (वय: ३७)
गुडीवाडा, आंध्र प्रदेश
पद ग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन २६००
(क्र. २, नोव्हेंबर इ.स. २०१० महिला फिडे गुणांकन यादी)
सर्वोच्च गुणांकन २६२३ (जुलै, इ.स. २००९)

कोनेरू हंपी (तेलुगू: కోనేరు హంపీ ; रोमन लिपी: Koneru Humpy) (३१ मार्च, इ.स. १९८७ - हयात) ही तेलुगू-भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहे. जानेवारी, इ. स. २०१०मध्ये जेव्हा हिचे फिडे एलो मानांकन २६१४ झाले, त्यावेळी जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलेल्या महिलांमध्ये ज्युडिट पोल्गार हिच्यानंतर ती दुसऱ्या क्रमांकावर होती. ज्युडिट पोल्गार हिच्यानंतर २६०० एलो गुणांचा टप्पा ओलांडणारी ती जगातील दुसरी महिला ठरली.भारतीय ग्रॅंडमास्टर कोनेरू हम्पी २०१९ महिला विश्व रॅपिड चॅम्पियन बनली आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

[संपादन]

राष्ट्रीय स्तरावरील माजी बुद्धिबळ खेळाडू आणि दोन वेळा राज्यस्तरीय विजेते राहिलेले कोनेरू अशोक यांना मुलीचे नाव 'हंपी' असे ठेवले. त्यांना आशा होती की त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न तिने साकार करावे. हंपी या शब्दाचा इंग्रजी अर्थ चॅम्पियन असा आहे. रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले कोनेरू अशोक यांनी नोकरी सोडून हंपीला अगदी लहानपणापासूनच तयार करायला सुरुवात केली. अवघ्या ५ वर्षांची असल्यापासून ती बुद्धिबळाचे डावपेच शिकू लागली. तिचे वडील तिला प्रतिस्पर्धक मुलांबरोबर खेळवून मुलीची पारख करू लागले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी म्हणजेच इ. स. १९९६ मध्ये ती राष्ट्रीय चॅम्पियन बनली.[] तिला पुढे प्रगती करायची असेल तर तिचे इलो (Elo) रेटिंग वाढवणे गरजेचे होते. हे त्यांनी हेरलं त्यासाठी मात्र तिला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणे आवश्यक होते. आणि या सगळ्यासाठी येणारा खर्च, विशेषतः प्रवासाचा खर्च, हा त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. म्हणून तिने त्यावेळी बँक ऑफ बडोदाचे प्रायोजकत्व स्वीकारले. परंतु बँकेकडून मिळणारी रक्कम हीसुद्धा आंतरराष्ट्रीय प्रवासाला फारशी पुरेशी नव्हती. त्यामुळे हंपीने मग आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी २००६ मध्ये ONGC (तेल आणि नैसर्गिक वायू निगम) या सरकारी कंपनीत नोकरी पत्करली, जेणेकरून तिची प्रवास खर्चाची चिंता मिटेल आणि ते तिच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते.[] पुढे २०१४ मध्ये हंपीने दसारी अन्वेश यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि २०१७ मध्ये या दाम्पत्याला आहाना नावाचे गोंडस बाळ झाले.[] प्रसूतीनंतर ती खेळाकडे परतली, तेव्हा सातत्याने मोठे पराभव तिच्या वाट्याला आले. ती ऑलिम्पियाड, क्लासिकल जागतिक चॅम्पियनशिप आणि जागतिक जलदगती बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये हरली. याची सल तिला सतावत होती. त्यानंतर अखेर २०१९ मध्ये मॉस्को येथे झालेल्या वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत तिने जागतिक विजेतेपदाला गवसणी घालत, आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले.[] या स्पर्धेनंतर तिच्या असे लक्षात आले की वेगवान बुद्धिबळ खेळप्रकारांसाठी ती बनलेली नसून, आता तिचे मोठे लक्ष्य आहे क्लासिकल बुद्धिबळाची जागतिक चॅम्पियन होणे.[]

कारकीर्द

[संपादन]

१९९६ मध्ये हंपी राष्ट्रीय चॅम्पियन बनली. त्यापाठोपाठ जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने तीन सुवर्ण पदके पटकावली – १९९७ साली दहा वर्षांखालील मुलींच्या गटात, त्यानंतर १९९८ साली बारा वर्षाखालील मुलींच्या गटात आणि २००० साली १४ वर्षांखालील मुलींच्या गटात. त्याच्याही पुढे जाऊन ती आता तरुणांसोबत स्पर्धा करू लागली. १९९९ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद तिने पटकावले. तसेच २००४ मध्ये जागतिक जुनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने संयुक्तपणे पाचवे स्थान पटकावले. २००१ मध्ये तिने वर्ल्ड जुनियर गर्ल चॅम्पियनशिप जिंकली.[] २००५ मध्ये १० बुद्धिमान महिला खेळाडूंविरुद्धच्या नॉर्थ उरलस कप स्पर्धेतही तिने बाजी मारली.[] २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय आणखी एक सुवर्णपदक तिने मिश्र सांघिक गटातही जिंकले [] त्यानंतर २०१५ला चीनमधली चेंगडू इथे भरलेल्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले.[] २०१९ मध्ये ती जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरली. त्यानंतर लगेचच जगातील दहा सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळ खेळाडूंचा समावेश असलेल्या केन्स चषक स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवले.[][१०] पुढे २०२० मध्ये पोलंडच्या मोनिका सॉक्कोविरुद्धचा टाय-ब्रेकर सामन्यात जिंकून कोनेरू हंपीने भारताला ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. इंटरनेटच्या तांत्रिक अडचणींमुळे भारताला रशियासोबतच संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आले होते.[११] त्यानंतर जुलै २०२० मध्ये पार पडलेल्या फाईड स्पीड बुद्धिबळ स्पर्धेत उपउपांत्य फेरीत, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाच्या हू यीफान या प्रतिस्पर्धीचा दारुण असा पराभव केला.[१२]

प्राप्त पुरस्कार

[संपादन]

इ. स. २००२ मध्ये वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ग्रँडमास्टर हे पद मिळवणारी हंपी इतिहासातली सर्वांत कमी वयाची महिला ठरली. हंपी ही पुरुषांचे ग्रँडमास्टर पद मिळवणारी पहिली भारतीय महिलासुद्धा ठरली. [१३]२००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये वैयक्तिक तसंच सांघिक स्पर्धांमध्ये हंपीने सुवर्ण पदके पटकावली. []२००३ मध्ये भारत सरकारकडून तिला क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २००७ मध्ये भारताचा प्रतिष्ठित नागरी पुरस्कार पद्मश्रीने तिला सन्मानित करण्यात आले. तेव्हा तिचे वय वीस वर्षेसुद्धा नव्हते.[१४]

संदर्भ :-

[संपादन]
  1. ^ a b "कोनेरू हम्पी - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2021-02-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Grandmaster Koneru Humpy learning the moves of a mother". www.telegraphindia.com. 2021-02-17 रोजी पाहिले.
  3. ^ "World number 3 Chess Player Humpy Koneru's Mantra for Navigating Passion and Motherhood: Be Present in the Moment". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  4. ^ Subrahmanyam, V. v (2019-12-29). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Hyderabad. ISSN 0971-751X.
  5. ^ "Achievements of Koneru Humpy, World junior champion". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  6. ^ "North Urals Cup: Humpy wins, Xu Yuhua second". Chess News (इंग्रजी भाषेत). 2005-07-15. 2021-02-17 रोजी पाहिले.
  7. ^ a b "BBCHindi.com". www.bbc.com. 2021-02-17 रोजी पाहिले.
  8. ^ "The Hindu" (इंग्रजी भाषेत). PTI. Chengdu (China). 2015-04-29. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
  9. ^ "The inspiring return of Koneru Humpy - ChessBase India". www.chessbase.in. 2021-02-17 रोजी पाहिले.
  10. ^ "On Chess: Humpy Koneru Is Crowned Champion In A Tightly Contested Second Edition Of The Cairns Cup". St. Louis Public Radio (इंग्रजी भाषेत). 2020-02-20. 2021-02-17 रोजी पाहिले.
  11. ^ ANI. "Koneru Humpy wins Armageddon, India reach finals of Online Chess Olympiad". BW Businessworld (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
  12. ^ Desk, F. S. (2020-07-18). "Koneru Humpy defeated world No.1 Hou Yifan in FIDE Speed Chess Championship semifinals » FirstSportz". FirstSportz (इंग्रजी भाषेत). 2021-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-17 रोजी पाहिले.
  13. ^ "Humpy beats Judit Polgar by three months". Chess News (इंग्रजी भाषेत). 2002-05-31. 2021-02-17 रोजी पाहिले.
  14. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2015-10-15. 2017-10-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2021-02-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]