प्राध्यापक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्वसाधारणपणे विद्यापीठ अथवा महाविद्यालय येथील सर्व अध्यापकांना प्राध्यापक किंवा प्रोफेसर (संक्षिप्त: प्रा. किंवा प्रो.) म्हटले जाते.

परंतु एखाद्या विद्यापीठातील अथवा महाविद्यालयातील सर्व अध्यापकांचे पद हे प्राध्यापक नसते.

विद्यापीठ अथवा महाविद्यालयातील अध्यापकांची पदे ज्येष्ठतेनुसार पुढीलप्रमाणे:

  1. प्राध्यापक
  2. सहयोगी प्राध्यापक
  3. सहाय्यक प्राध्यापक

तसेच काही ठिकाणी प्रथितयश प्राध्यापक म्हणूनदेखील निवृत्त प्राध्यापकांची नेमणूक केली जाते.

परंतु सर्वसाधारणपणे सर्वांना प्राध्यापक असेच संबोधले जाते. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतर प्राध्यापकांचे प्रत्यक्ष अध्यापन कार्य सुरू होते जे प्रथम सत्राच्या समाप्तीपूर्वीच संपते. अध्यापन कार्य पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतात आणि तद्पश्चात प्रथम सत्राची समाप्ती होते. त्यानंतर द्वितीय सत्र सुरू होईपर्यंत प्राध्यापकांना सुट्टी असते. द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर प्राध्यापकांचे अध्यापन कार्य पुनश्चः सुरू होते आणि ते पूर्ण झाल्यावर पुनश्चः विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केल्यावर शैक्षणिक वर्षाची समाप्ती होते आणि पुन्हा प्राध्यापकांची सुट्टी सुरू होते.

प्राध्यापक[संपादन]

अध्यापकांमध्ये ज्येष्ठतेनुसार प्राध्यापक हे सर्वात वरिष्ठ असतात. प्राध्यापक होण्यासाठी सहयोगी प्राध्यापक या पदावर काम केल्याचा अनुभव तसेच संशोधन केल्याचा अनुभवदेखील आवश्यक असतो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार प्राध्यापकांना आठवड्याला एकूण १४ तास अध्यापन करावे लागते ज्याचे त्यांना अत्यंत भरघोस वेतन मिळते.

सहयोगी प्राध्यापक[संपादन]

अध्यापकांमध्ये ज्येष्ठतेनुसार प्राध्यापकांनंतर सहयोगी प्राध्यापक असतात. सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम केल्याचा अनुभव तसेच संशोधन केल्याचा अनुभवदेखील आवश्यक असतो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार सहयोगी प्राध्यापकांना आठवड्याला एकूण १४ तास अध्यापन करावे लागते ज्याचे त्यांना भरघोस वेतन मिळते.

सहाय्यक प्राध्यापक[संपादन]

अध्यापकांमध्ये ज्येष्ठतेनुसार सहयोगी प्राध्यापकांनंतर सहयोगी प्राध्यापक असतात. सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी किमान ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी तसेच सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा किंवा पीएचडी पदवी या तिन्हीपैकी कोणतीही एक अर्हता धारण करणे आवश्यक असते.

सहाय्यक प्राध्यापकांचे प्रकार[संपादन]

सहाय्यक प्राध्यापकांच्या पदाचे पुढील प्रकार असतात:

१. सहाय्यक प्राध्यापक - नियमित

२. सहाय्यक प्राध्यापक - करार पद्धतीने (कंत्राटी / तदर्थ)

३. सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर (रोजंदारी)

४. सहाय्यक प्राध्यापक - अभ्यागत

५. सहाय्यक प्राध्यापक - रजाकालीन

१. सहाय्यक प्राध्यापक - नियमित[संपादन]

काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक ही नियमित (कायमस्वरूपी पदावर) केलेली असते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार सहाय्यक प्राध्यापकांना आठवड्याला एकूण १६ तास अध्यापन करावे लागते ज्याचे त्यांना शासकीय नियमानुसार चांगले वेतन मिळते. ते वयाच्या ६० वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतात.

२. सहाय्यक प्राध्यापक - करार पद्धतीने (कंत्राटी / तदर्थ)[संपादन]

काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक ही कायमस्वरूपी पद्नधतीने न करता फक्त चालू शैक्षणिक वर्षाकरिता केली जाते. सदर नेमणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होत नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी जेव्हा प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू होते तेव्हा अशा प्राध्यापकांची कंत्राटी तत्त्वावर भरती केली जाते. यांची नेमणूक शैक्षणिक वर्षामध्ये केंव्हाही झाली तरी ती त्या शैक्षणिक वर्षापुरतीच मर्यादित असते, म्हणजेच शैक्षणिक वर्ष संपले की त्यांची सेवा संपुष्टात येते. अशा प्राध्यापकांना ठराविक मासिक मेहनताना दिला जातो. अशा प्राध्यापकांचे अध्यापनाचे तास निश्चित नसतात. बहुतांशी त्यांना आठवड्याला १६ तासांपेक्षा अधिक अध्यापन करावे लागते. अशा सहाय्यक प्राध्यापकांना अल्प आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. परिणामतः महाविद्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत ते इतर कामे करतात जसे की वडापावची गाडी अथवा टॅक्सी (ओला-उबर) चालवणे इ.

३. सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर (रोजंदारी)[संपादन]

काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक ही कायमस्वरूपी अथवा कंत्राटी पद्नधतीने न करता घड्याळी तासिका तत्त्वावर केली जाते. सदर नेमणूक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच होत नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी जेव्हा प्रत्यक्ष अध्यापनाचे काम सुरू होते तेव्हा अशा प्राध्यापकांची भरती एका सत्रापुरतीच केली जाते. पहिल्या शैक्षणिक सत्रातील समाप्त होताच त्यांची सेवा संपुष्टात येते. दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा एका सत्रासाठी त्यांची नेमणूक केली जाते आणि दुसरे शैक्षणिक सत्र म्हणजेच शैक्षणिक वर्ष संपताच त्यांची सेवा संपुष्टात येते. अशा प्राध्यापकांना घड्याळी तासिका तत्त्वावर मेहनताना दिला जातो. म्हणजेच दिवसभरात त्यांनी जितके घड्याळी तास अध्यापनाचे कार्य केले आहे तेवढ्याचाच मोबदला त्यांना दिला जातो. जर एखाद्या दिवशी सुट्टी अथवा इतर काही कारणास्तव अध्यापन न झाल्यास त्या दिवसातील तासिकांचा मेहनताना त्यांना मिळत नाही. अर्थात कामाचे जितके दिवस भरतात तितक्याच दिवसांचा (म्हणजेच रोजंदारीवर) मेहनताना त्यांना दिला जातो. अशा प्राध्यापकांना आठवड्याला १६ तासांपेक्षा कमी तास अध्यापन करावे लागते. अशा सहाय्यक प्राध्यापकांना अत्यल्प आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. परिणामतः त्यांना आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी महाविद्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत अर्थार्जनासाठी इतर कामे करावी लागतात जसे की चहाची टपरी, वडापावची गाडी अथवा टॅक्सी (ओला-उबर) चालवणे, शेतमजूर म्हणून काम करणे. अशा सहाय्यक प्राध्यापकांचे दोन प्रकार पडतात: अनुदानित तत्त्वावरील आणि विना-अनुदानित तत्त्वावरील.

अ) अनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर :

महाविद्यालयातील ज्या अध्यापक पदांना शासकीय वेतन देय असते अशी पदे रिक्त असल्यास आणि त्या पदावर नियमित सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक न केल्यास तेथे नेमणूक करण्यात येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक (घड्याळी तासिका तत्त्वावर) याचे मानधन शासकीय नियमानुसार उच्चशिक्षण सहसंचालक यांचेकडून दिले जाते. सत्रसमाप्तीनंतर पूर्ण सत्राचे मानधन एकत्रित दिले जाते जे तुटपुंजे असते.

ब) अनुदानित तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर :

महाविद्यालयात जी विनानुदानित अध्यापक पदे असतात त्या ठिकाणी ती बहुतांश वेळेला सहाय्यक प्राध्यापक - घड्याळी तासिका तत्त्वावर यांची नेमणूक केली जाते. त्यांना अत्यंत तुटपुंजा मेहनताना दिला जातो.

४. सहाय्यक प्राध्यापक - अभ्यागत[संपादन]

काही सहाय्यक प्राध्यापकांची नेमणूक न होता त्यांना फक्त एखाद्या विषयाचे अध्यापन करण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि त्यांना त्या विषयासाठीचे ठराविक मानधन दिले जाते. त्या पूर्वनिर्धारित ठराविक मानधनामध्ये त्यांना सदर विषयाच्या अभ्यासक्रमाचे अध्यापन पूर्ण करावयाचे असते.

५. सहाय्यक प्राध्यापक - रजाकालीन[संपादन]

हा सहाय्यक प्राध्यापकांच्या नेमणुकीचा एक विशेष प्रकार असून एखादा नियमित सहाय्यक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / प्राध्यापक गुणवत्ता सुधार योजना कार्यक्रमांतर्गत उच्च शिक्षणासाठी दीर्घकालीन रजेवर गेला असल्यास किंवा मर्यादित कालावधीसाठी इतर उच्च पदभार स्वीकारण्यासाठी दीर्घकालीन रजेवर गेला असल्यास त्याच्या जागेवर मर्यादित कालावधीकरिता रजाकालीन सहाय्यक प्राध्यापकाची नेमणूक केली जाते. अशा प्राध्यापकाला शासकीय नियमानुसार वेतन दिले जाते.

प्रथितयश प्राध्यापक[संपादन]

काही ठिकाणी प्राध्यापक या पदावरून निवृत्त झालेल्यांना प्रथितयश प्राध्यापक म्हणून तात्पुरती (साधारणता: २ वर्षाकरिता) नेमणूक दिली जाते. अशा प्राध्यापकांना शासकीय नियमानुसार मानधन मिळते तसेच भरघोस निवृतीवेतनदेखील मिळत असते. त्यामुळे त्यांच्याकडे अतिशय आर्थिक सुबत्ता असते.

संदर्भ[संपादन]